Sunday, September 30, 2018

कट्टा - ऑक्टोबर २०१८नमस्कार! 

भरपूर उत्साहात गणेशोत्सव साजरा करून, देवीच्या आगमनाच्या तयारीला सगळे सिद्ध झाले आहेत. मित्रमंडळ कट्टाही काही थोड्या बदलांसकट वाचकांच्या भेटीला आला आहे.

या महिन्यापासून काही नवीन लेखक आपल्या भेटीला येणार आहेत. त्याच प्रमाणे काही लेखमाला सुरू करण्यात येणार आहेत. जसे ‘पालकत्व’ याविषयावरील मालिका. हा एक सतत नवा राहणारा विषय आहे. बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे हे मुले आणि पालक यांच्या समोरील आव्हान असते. या मालिकेतून सर्व वयोगटातल्या पालकांना काहीतरी मिळेल अशी आशा आहे.

‘लढा GBS शी’ ही आशीर्वाद आचरेकरची लेखमाला सगळ्यांना आवडेल, प्रेरणा देईल यात मला शंका वाटत नाही. आपल्या मित्रमंडळातल्या एका मित्राने ज्या धैर्याने या अनोख्या आजाराला तोंड दिले ते वाचून त्याचे नक्कीच कौतुक वाटेल. श्वेता साठे ही काही पारंपारिक पदार्थांच्या कृती सांगणार आहे. कधी कधी काही आठवणीही सांगणार आहे. प्रवरा लिमये ही गायिका आणि संगीतकार मैत्रीण. तिनेही कट्ट्यासाठी स्वतः संगीत दिलेली एक कविता दिली आहे.

त्याचप्रमाणे बंगलोरातील विविध क्षेत्रातील प्रतिभावान लोकांनाही कट्ट्यात आपले विचार मांडायला सांगण्याचा विचार आहे.
कट्ट्याचे नवे रूप वाचकांना आवडेल असे वाटते. आपल्या काही नव्या कल्पना असल्यास त्याही संपादक मंडळाकडे जरूर मांडाव्यात.

- कट्टा संपादन समिती