आम्रभात



साहित्य:-

तांदूळ १ वाटी शक्यतो आख्खा  असावा. (बासमती /कोलम / आंबेमोहोर )
साखर १/२ वाटी
हापूस आंब्याचा आमरस २ वाट्या
आंब्याच्या चौकोनी फोडी १/४ वाटी
लवंगा
तूप १/४ वाटी
मीठ १ चमचा
पाणी गरजेनुसार
वेलदोडा पूड, केशर (ऐच्छिक) आवडत असल्यास घालणे ...हापूस आंब्याची मूळची चवही छान लागते.
सुकामेव्याचे काप

कृती :-

तांदूळ स्वच्छ धुवून निथळून घ्यावेत. प्रथम एका पातेल्यात पाणी घेऊन गरम करण्यास ठेवावे. दुसऱ्या एका मोठया जाड बुडाच्या पातेल्यात दोन चमचे तूप घालून मंद गॅस करून ठेवावे. त्यात तूप तापल्यावर दोन लवंगा आणि निथळलेले तांदूळ घालून थोडेसे भाजून घ्यावेत. आधण आलेले पाणी त्यामध्ये ओतावे .भात शिजवताना पाण्याचे प्रमाण कमी असावे. साधारण तांदूळ बुडतील इतपतच पाणी घालावे. थोडेसे मीठ घालून व्यवस्थित हलवून वर झाकण घालावे. भात छान मोकळा होईल असा शिजवून घ्यावा. 
आता त्यात हापूस आंब्याचा आमरस २ वाट्या आणि साखर अर्धी वाटी घालून मंद आचेवर ठेवून अधून मधून हलक्या हाताने हलवत राहावे. भाताची शिते मोडू नये. 
भात छान अळून आला की परत वरून थोडे तूप आणि आंब्याच्या फोडी घालाव्यात. हवी असल्यास वेलदोडा पूड, केशर घालून एकदा हलवून गॅस बंद करावा. वाटीला तूप लावून त्यात आधी सुक्यामेव्याचे काप घालून वरून भात घालून छान दाबून मूद पाडावी. गरमागरम आम्रभाताची मेजवानी सोबत लोणच्याची फोड आणि  तळलेले पापड घेऊन मस्तपैकी ताव मारावा.

©सौ. श्वेता मोघे साठये


1 comment: