ख्रिसमस गिफ्ट


"चल रे. असं कसं करतील ते?" मी म्हणालो.
"अरे हे NGO वाले मधल्यामधे पैसे कमावतात. तू उद्या जो चेक देणार त्यातले किती पैसे त्यांना पोचणार काय माहीत. तू गेलायस कधी  बघायला?" शेखर म्हणाला.
आमच्या टी-टाईम मधील आजचे हे बोलणे डोक्यात रेंगाळत राहिले. खरंच, गेली तीन वर्षं ख्रिसमसला ह्या मुलींच्या अनाथाश्रमाला चेक देतोय. काहीसं मेकॅनिकल झाल्यासारखं वाटतंय. या वर्षी जाऊन बघू तरी, काय आहे ही संस्था.
चोवीस डिसेंबरला हाफ डे घेऊन मी "स्वांतना" संस्थेत गेलो. शहराच्या गजबजाटापासून जरा लांब होतं. दुपारची वेळ होती. आवार शांत होता. त्यांच्या मेन लॉबीमधे एक ख्रिसमस ट्री सजवून ठेवलेलं होतं. त्याच्या खाली काही भेटी ठेवलेल्या. बहुतेक जमा झालेल्या रकमेने विकत घेतलेल्या. तिथे काही पत्रं ठेवलेली. मुलींनी सँटाला लिहीलेली असावीत. मी त्यातलं एक पत्र उघडलं..
चित्र: गुगल इमेजेस 

x
"डिअर सँटा, तू दरवर्षी आम्हाला मस्त गिफ्ट्स देतोस. पण कध्धीच आमच्या बरोबर खेळायला येत नाहीस. कोण्णीच येत नाही. फक्त गिफ्टस येतात. यावर्षी तू खेळायला ये, आणि बिझी असशील तर कुणाला तरी पाठव. आम्हाला कंटाळा येतो." पुढलं मला नीट वाचता येत नव्हतं. डोळयांच्या कडा पाणावल्या होत्या. तेवढ्यात मागून कोणीतरी हात धरला. एक चार-पाच वर्षांची बाहुली होती. दुसऱ्याच क्षणी आत पाहून मोठयाने ओरडली, "डेझी, सी. सँटा रेड युअर विश. ही सेंट अ फ्रेंड टू प्ले". ती रांगत आत गेली.
तिथल्या संचालिका सिस्टर मेरीन बाहेर आल्या. मला पाहून हसून म्हणाल्या, "Son,you gave the biggest gift to my girls. your precious time."
पुढले दीड-दोन तास मी तिथे पेंटींग, क्राफ्ट, बाहुल्या, भातुकली.. त्या मुली जो हट्ट करतील ते खेळलो. मला काहीच कसं नीट येत नाही हे बघून त्या खिदळत होत्या. तेवढ्यात "प्रेयरटाईम " अशी सिस्टरची हाक आली. मी ही निघालो.
पण तिथून निघताना एक जाणवलं. आजवरचं माझं ही बेस्ट ख्रिसमस गिफ्ट मी मनात साठवून परत जात होतो.

मानस

No comments:

Post a Comment