अनपेक्षित भेट


माझ्यासारख्या प्रवासात झोप न लागणाऱ्या, वाचन न करणाऱ्या मंडळींसाठी सहप्रवासी हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. कसा वेळ घालवायचा, असा प्रश्न माझ्यासमोर नव्हता. टीव्ही न बघता, एखादा फोनवर असलेला गेम न खेळता कसा वेळ घालवायचा हा मुद्दा होता. एखादं लहान मूल असलेली स्त्री शेजारी असेल तर प्रश्नच मिटतो. सगळा वेळ मनोरंजनाची हमी असते. अगदी तान्ह्या बाळापासून तर आठ-दहा वर्षांची मुलं तुम्हाला गुंतवून ठेवू शकतात, हे मी अनेकदा अनुभवलं आहे.
विमानाने आकाशात झेप घेतली. शेजारची बाई गाढ झोपेत. माणूस मासिकात नजर खुपसून. मी आपला वेळ कसा जाईल, असा मनात विचार करत होते. तोच त्या माणसाने मला ‘तुम्ही घरी निघालात का?’, असा प्रश्न केला. मी हो म्हटल्यावर त्यानेमी मुलीकडे निघालो आहे. माझ्या नातवाचा पाचवा वाढदिवस आहे,’ असं सांगितलं. ‘वा! त्याला माझ्याकडूनही शुभेच्छा सांगा.’ मी म्हणालेमी पहिल्यांदाच भेटणार आहे त्याला.’ तो म्हणाला. तो कुठे नोकरी करतो, काय काम करतो अशी कोणतीही चौकशी मी केली नव्हती. अमेरिकेत नातवंडं अगदी शेवटी म्हणजे आजी-आजोबा मरणाच्या दारात असतात तेव्हाच भेटतात, तेही पहिल्यांदा, हे मला माहिती होतं. त्याच्या चेहऱ्यावर थोडा ताण जाणवत होता.
‘‘नातावालाच नाही, मी मुलीलाही गेल्या वीस वर्षांत भेटलो नाहीये, पहिल्यांदा भेटणार आहे.’’ त्याने माहिती दिली.
तो थोडासा थांबला.
माझ्या तोंडून नकळत ‘‘‘ओह" असं निघून गेलं होतं.
नवरा-बायको लवकरच विभक्त झाले असतील आणि त्यामुळे कदाचित मुलीची भेट झाली नसावी, असं माझ्या मनात आलं. पण मुलीला न भेटण्याचं असं काय कारण असेल, हा प्रश्न माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असावा.


‘‘मी १५ वर्षं तुरुंगात होतो. तुरुंगातच राहणार हे पक्कं झालं तेव्हा बायको वेगळी झाली. मुलगी तिच्याकडेच. मुलीशी फोनवर बोललो होतो, पण भेट नव्हती, माझी सुटका झाल्यावरही.’’


‘‘काय?’’ मी मनातल्या मनात जरा मोठ्यानेच म्हटलं. पण माझ्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसलंच असावं.


‘‘मी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगली आहे. जरा जास्तच. भूतकाळ विसरायचा प्रयत्न करतो आहे. मला लिहायला आवडतं. माझी दोन पुस्तकं लवकरच प्रकाशित होतील.’’ त्यानं एका दमात मला सांगितलं. त्याचं कार्डही माझ्यापुढे केलं.
मला त्या वेळी त्याच अभिनंदन करावं, त्याला शुभेच्छा द्याव्यात हे सुचलं नाही. मनात मोठा कल्लोळ सुरू होता. याने नेमकं काय केलं असेल? चोरी, मारामारी, मोठा दरोडा, बलात्कार यापेक्षा कोणते गुन्हे असतील, कशाची शिक्षा एवढी असेल तेसुद्धा माहिती नाही मला. त्यानंतर हा माणूस बाहेर पडलाय. त्याचं आयुष्य आता कसं आहे? तो काय करतो?
किंबहुना आपण अनेकांना रोज भेटतो. त्यातले कोण कोण काय काय गुन्हे करत असतात? काहींना शिक्षा होते, काही तसेच मोकळे राहतात आणि गुन्हा इतरांच्या वा कायद्याच्या ध्यानातही येत नाही. काय करतो आपण त्या सर्वांशी संवाद साधतो तेव्हा? शहरातल्या गुन्हेगारी जास्त असलेल्या भागातही जातो. पण तुरुंगात जाऊन आलेली व्यक्ती माझ्या शेजारी बसली आहे, माझ्याशी बोलते आहे असं स्वप्नही कधी पडलं नव्हतं.


तो त्याच्या पुस्तकाविषयी थोडं बोलला. तुरुंगात असताना तो एक न्यूजलेटर चालवत असे, त्याविषयी त्याने माहिती दिली. पुस्तकं वाचनाची आवड कशी निर्माण झाली, गुन्हेगारांच्या पुनर्वसनासाठी तो काय करतो, ते त्यानं सांगितलं.
पुढचे दोन-अडीच तास त्याचे शब्द मनात घुमत होते.
‘‘मी गुन्हा केला हे मान्य करायलाच खूप काळ लागला. मग भयानक लाजिरवाणं वाटायला लागलं. दोन तरुण मुलांचा जीव गेला होता. इतर हानी खूप झाली होती. असं काही घडणं नेहमीचंच होतं. पण मी त्या मुलांच्या आईशी बोललो. ती मला विसरणं शक्य नव्हतं, तिने मला माफ करावं अशी अपेक्षाच नव्हती, पण तिला माझ्यावर सूड उगवावा असं वाटलं नव्हतं. त्याउलट माझं आयुष्य चांगलं जावं, मी त्या जगात पुन्हा अडकू नये याकरता प्रार्थना करेन असं ती म्हणाली होती. मी तिची खूप टर उडवली होती सुरुवातीला. जणू शंभर बायकांनी अशी प्रार्थना केली तर जगातली गुन्हेगारीच संपणार होती! पण जसा जसा जास्त विचार केला तसे तिचे विचार समजले. माझ्या जगण्याचा उद्देश उमगला. त्या आईसारखं वागता येईल का मला? हा प्रश्न माझ्यासमोर होता. शत्रुत्व पत्करणं सोपं आहे. त्यापुढे जाऊन सकारात्मक विचार करणं खरंच अवघड.
---
त्याने माझ्या घरी कोणकोण असतं, अशी जुजबी चौकशी केली. माझी मुलं एखादा खेळ खेळतात का असंही विचारलं. साधारण पाच-सहा वर्षांचे मुलगे नक्की काय करतात? मुलं कशी वागतात हे त्याला जाणून घ्यायचं होतं. नुसती पुस्तकं वाचून, एखाद्या बागेत खेळणारी मुलं बघून किंवा टीव्हीवर मुलांचे कार्यक्रम बघून आपल्या नातवाशी कसं खेळायचं ते कळलं नाही, असं तो म्हणाला होता.
किती मोठं अंतर पार केलं होतं त्याने? अक्षरओळख करून घेण्यापासून, स्वतंत्र लेखन आणि संवादाची कला आत्मसात केली होती. त्याने एक वेगळं जग अनुभवलं होतंतुरुंगात. तरीही वडील असतात, वडिलांनी काय करायचं असतं, आजोबांनी काय करायचं असतं ते सगळं अनुभवलंच नाही याची खंत होती, पण नातवाला ते अनुभवता येतं आहे याबद्दलचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर होता.
--
गुन्हेगारीच्या  चक्रात अडकल्यावर अनेकांचं आयुष्य खरोखर तुरुंग आणि नवा गुन्हा यामध्ये जातं. ती माणसं निगरगट्ट असतात किंवा होतात. परिस्थिती आणि पोटचा प्रश्न यात सर्व तत्त्वं कोलमडतात. आजूबाजूची माणसं जे करतात त्याचा पगडा असतो. हे सर्व गुन्हेगारीचं जग आपण कधी न पाहिलेलं आहे. किंबहुना त्या जगाशी आपला कधी संपर्कच येऊ नये म्हणून अनेक माणसं मनातल्या मनात प्रार्थना करत असतात. आपल्याला त्या जगाविषयी कुतूहल असतं, आकर्षण असतं हे मात्र तितकंच खरं आहे, पण त्या जगण्याची किंमत मोजणं सोपं नाही. त्या जगण्यापासून दूर जाणं तर अशक्यच.
मी विचार करत होते.
गुन्हेगार आहेत म्हणजे नावालाही माणुसकी नसते? जे गुन्हेगार नसतात त्यांच्यात किती असते माणुसकी? पण आपल्या समाजव्यवस्थेत काही घटना पुसता येत नाहीत. तुरुंगवास ही त्यापैकी एक.


माणसाला जिवाभावाचं माणूस नसणं ही मला सर्वात मोठी शिक्षा वाटते. एकांतवास असावा पण सक्तीचा नाही असं म्हणतात. माझा सहप्रवासी त्याच्या आयुष्यातली १५ वर्षं पुन्हा मिळवू शकणार नव्हता.

----
विमान खाली उतरणार होतं. मी त्याला शुभेच्छा दिल्या, नातवाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दे, असं पुन्हा म्हणाले. एक छोटासा प्रवास, अनेपेक्षितपणे खूप काही देऊन गेला होता.
सोनाली जोशी



No comments:

Post a Comment