कल्पनेहून उंच अशी एक दहीहंडी!



आज गोपाळकाला.
सकाळीच माझा मुलगा म्हणाला, बाबा दहीहंडी बघायला जाऊ या.
हल्ली गर्दी नको वाटते. चार लोकांच्या गप्पांच्या मैफिलीत गप्पांची आवड नसलेला कुणी पाचवा आला तरी जिथे गर्दी वाटते, अशात गोविंदाची गर्दी म्हणजे टू मच! मी आधी नको म्हटलं. मग म्हटलं तू जाऊन ये मित्रांसोबत. पण मुलगा मीच यावं असा फारच हट्ट करू लागला. मनात आलं, मोबाईलवर खेळायला न मागता बाहेर जाऊन दहीहंडी बघायला जाऊ या म्हणतोय! Not bad!
आम्ही स्कूटरवरून निघालो. दहीहंडीचा एक माहोल तयार होतोय, हे आजूबाजूच्या झेंडे लावलेल्या बाईकधारी गोविंदांकडे पाहून जाणवत होतं. नेहमी जिथे हंडी लागते त्या परिसरात जाण्याच्या मार्गावर होतो. मनात आलं, अरेरे! आज गर्दीमुळे इथला रस्ता बंद असणार. उगीच स्कूटर घेऊन आलो. याच विचारात आम्ही तिथे पोहोचलो. रस्ता बंद केलाच नव्हता. गर्दी देखील नव्हती. कानाचे पडदे फाडणारा डीजे नाही. फ्लेक्स नाहीत. माणसांचा कोलाहल नाही. सजवून वर लटकवलेली हंडी नाही. गोविंदा पथकांचे कौतुक करणाऱ्या राजकारणी मंडळींनी तो उंचावर बांधलेला भव्य मंडप नाही... टोटल शांतता! 
इतक्या वर्षात दहीहंडीच्या दिवशी हे असं पहिल्यांदाच घडत होतं. झालं काय? कुणी गेलं वगैरे का? पण तसा आजूबाजूला बोर्ड वगैरे सुद्धा नव्हता. हल्लीच्या बातम्यांच्या भाषेत सांगायचं तरजनजीवन सुरळीत सुरू होतं’! मुलगा हिरमुसला होता. म्हणाला, दुसरीकडे जाऊ या. मी म्हटलं थांब. आपण आधी इथे नसलेल्या दहीहंडीची चौकशी करू या. स्कूटर तशीच फिरवली. जी राजकीय पार्टी ही दहीहंडी आयोजित करते, त्या ऑफिसमध्ये गेलो. सदैव लोकांनी भरलेल्या ऑफिसमध्ये आज चक्क एकच माणूस स्वतःच्या मोबाईलवर काहीतरी बघत बसला होता.
आज हंडी नाही इथे?’
मोबाईलमधून मान बाहेर काढत तो उठला आणि
आम्हा दोघांसाठी खुर्ची घेऊन आला.
नाही. यावर्षी साहेबांनी हंडी साजरी न करण्याचा निर्णय घेतलाय.
का?’
साहेब म्हणाले, या
वर्षीची हंडी वेगळ्या पद्धतीने साजरी करू या. दहीहंडी फोडण्यात आणि त्याच्या नियोजनात एवढी प्रचंड युवा शक्ती वाया जात आहे, त्या शक्तीचा सदुपयोग कर असं साहेबांना त्यांच्या गुरूंनी सांगितलं. साहेबांनी आमची मीटिंग घेतली.
कुणाला काही सुचत नव्हतं. कारण इतक्या वर्षांची परंपरा मोडायचं डेरिंग कुठून येणार

आमच्यात एक टीचर होत्या. त्या म्हणाल्या, आपण या सगळ्या गोविंदाना घेऊन मुंबई जवळच्या एका आदिवासी पाड्यात जाऊ या. त्यांना तिथे गोविंदाच्या दिवशी श्रमदान करायला सांगू या. बाईंच्या प्रस्तावाला सर्वांनी विरोध केला. साहेब म्हणाले, माझ्या गुरूंशी बोलतो आणि सांगतो. साहेबांच्या गुरूंना ही कल्पना आवडली. त्यांनी साहेबांना तसं करायचा आदेश दिला आणि साहेबांना त्याचं महत्त्व पटवून दिलं. साहेबांनी ही कल्पना उचलून धरली. साहेब स्वतः एकशे वीस तरुण पोरांना घेऊन आज एका आदिवासी पाड्यामध्ये जाऊन काम करतायत. 
आज तिथे एक कच्चा रस्ता पक्का होणार आहे. एक विहीर खोदायचे काम होणार आहे. काही गोविंदा तिथल्या मुलांसाठी स्वयंपाक करणार आहेत. काही तरुण तिथल्या तळ्यातील कचरा साफ करणार आहेत. आमचे सगळे कार्यकर्ते आज तिथेच आहेत. ऑफिस सांभाळायला कोणीतरी हवं म्हणून मला ऑफिसमध्ये बसवलंय. साहेबांच्या या निर्णयामुळे आमच्या पार्टीतले काही लोक नाराज झालेत असं कळलंय. साहेब म्हणालेत पुढचं पुढे बघू !
हे खूपच सॉलिड आहे! पण हे करायला गोविंदा तयार कसे झाले?’
साहेबांनी इथल्या दुकानदारांना एकत्र केलं. दरवर्षी गोविंदासाठी जी वर्गणी देता तशी तुम्ही या कामाला द्या असं सांगून त्यांचं मन वळवलं. साहेबांनी स्वतःचे पन्नास हजार घातले. चांगले पैसे जमले. त्यातील दीड लाख रुपये आम्ही गोविंदा पथकाला बक्षीस म्हणून देणार. उरलेले पैसे त्या पाड्यातील शाळेला.
शिवाय, अशी वेगळी दहीहंडी साजरी करून एक वेगळा आदर्श घालून दिल्याबद्दल या सर्व पोरांचा सत्कार करण्याचं साहेबांनी प्रॉमिस दिलंय!
एक वेगळी सकारात्मकता घेऊन मी त्या पार्टीच्या ऑफिसमधून बाहेर पडलो.
स्कूटरवर बसण्याआधी मी खिशातून मोबाईल काढला आणि साहेबांना एक अभिनंदनाचा मेसेज पाठवला. साहेब भले या कृतीचंपोलिटिकल मायलेजघेतील. घेऊ देत बापडे! पण आपल्या पारंपरिक सणांना एका नव्या दृष्टीने बघायचं धाडस त्यांनी दाखवलं. 
भले ही कल्पना त्यांची नसेल, त्यांच्या गुरूंची असेल; पण तरी ती मनावर घेत अमलात आणायचं त्यांनी धाडस दाखवलं. आजच्या युवा शक्तीला विधायक मार्गाकडे वळवलं! साहेबांना दहीहंडी उत्सवाचं मर्म कळलं! हेही नसे थोडके!
————-
तुम्हाला कसं वाटलं हे सगळं वाचून ?
दहीहंडी उत्सवाची अशी काही फँटसी होऊ शकेल का? या विचारात मी देखील आहे.
एका प्रचंड गर्दीचा कण होऊन मी आत्ता माझ्या मुलासोबत उभा आहे.
डीजेच्या आवाजाने माझ्या शरीराचा प्रत्येक कण धडधडतोय.
बटबटीत भेसूर भडक फ्लेक्सने आसमंत भरून गेलाय. आजूबाजूचे वीस एक हजार गोविंदा सतत भिजत राहावेत यासाठी चाहुबाजूला पाण्याचे टँकर्स सज्ज आहेत. आजूबाजूला अटलजी, शहीद जवान यांचे भलेमोठेश्रद्धांजली कट-आऊटस्लावून मोठ्या शिताफीने त्यांनाही यात खेचलंय.आदरणीय साहेबएका मोठ्या व्यासपीठावर सर्व गोविंदांना माईकवरून शुभेच्छा देण्यात मग्न आहेत. 

विजेत्या पथकाला आज पाच लाखांचे बक्षीस मिळेल अशी घोषणा त्यांनी नुकतीच केलीय. मघाशी सलामी दिलेल्या पथकाने पुन्हा एकदा नऊ थर उभारलेत. सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना एका लहान मुलाने हंडी फोडलीयआणि एकच जल्लोष झालाय. डीजेने आवाजाचा कळस गाठलाय..
खुद्द साहेब माईकवरून सर्वांचे अभिनंदन करतायत. टँकर्सला लावलेले पाईप्स गर्दीला चिंब भिजवतायत.
त्या पाण्याचे काही शिंतोडे आता आमच्यावर देखील पडलेत. इतकं ठरवूनही मी काही कोरडा राहू शकलो नाही !  
वीस हजार संख्येच्या युवाशक्तीचा उन्माद आता आमच्याभोवती बेहोष होऊन नाचतोय….
….या देशातील जनजीवन सुरळीत सुरू आहे !
नविन काळे

No comments:

Post a Comment