मारवा


“Wrinkles should merely indicate where smiles have been.”
– Mark Twain 
संध्याकाळ. वाऱ्याच्या झुळुकीसरशी खिडकीवरचे पडदे आतल्या दिशेने हलकेच झेपावतायत. बाहेरच्या झाडांच्या लांब सावल्या खोलीत पसरलेल्या. खरं तर दिव्याची आवश्यकता नसली तरी चालेल, इतका प्रकाश. शोकेसमधले सर्व पुरस्कार-मानचिन्हे उन्हाच्या एकाच तीरिपीने उजळून गेलेले. धुपाचा मंद सुगंध खोलीत भरून राहिलाय. त्या प्रशस्त खोलीत आपल्या स्वतःभोवती तेजाचं एक वर्तुळ करून समई जळते आहे. समईच्या शेजारी स्वच्छ पांढरी बेडशीट घातलेली एक चौकोनी गादी. त्यावर भिंतीला टेकून दोन उश्या. गादीसमोर एक सुंदर गालिचा. गालिच्यावर एक तानपुरा आडवा ठेवलेला. बराच वेळ कुणाची तरी वाट बघत असल्यासारखा. फेरीवाले, कुकरच्या शिट्ट्या, कावळे, मोटारींचे हॉर्न, रेडियो, टीव्ही ही सर्व मंडळी आपापल्या कामात.

खोलीचं दार उघडून ताई आत येतात. दार लावतात. भिंतीवरील आपल्या गुरुजींच्या तसबिरीला नमस्कार करतात. शांतपणे आपल्या नेहमीच्या आसनावर – त्या चौकोनी गादीवर- येऊन बसतात. समोरचा तानपुरा आपल्याकडे घेतात. नमस्कार करतात आणि तंबोऱ्याच्या तारा छेडतात. ताई षड्ज लावतात. तंबोऱ्याचा ध्वनी आणि ताईंचा षड्ज यांच्या मिलापामुळे ती वास्तू आता मायावी भासू लागते. सभोवतालचे सर्व आवाज आता जणू त्या मायावी गुहेत लोप पावतात. ताई पुढचा स्वर लावतात इतक्यात बेल वाजते. ‘गायत्री असणार’ ताई मनातल्या मनात म्हणतात आणि त्यांची आलापी चालू ठेवतात. बहुदा काशीबाई दरवाजा उघडतात. गायत्री आत येते. ताईंच्या पाया पडते. त्यांच्या समोर बसते. आलापी घेत घेत ताई ‘पाणी हवंय का?’ असं खुणेनेच विचारतात. गायत्री खुणेनेच ‘नको’ म्हणते. गायत्री उठते. कोपऱ्यातला तंबोरा घेऊन येते. आलाप, ताना यांचं बोट धरून ताई ‘मारवा’ नावाच्या जंगलात जातात. लाखो लोक ताईंचं गाणं ऐकायला अक्षरशः जान निछावर करतात आणि आपण तर रोज इतक्या जवळून ताईंना ऐकतो! नुसत्या विचारानेच गायत्री मोहरून जाते. ताईंच्या मागून गायत्रीही त्या जंगलात शिरू लागते. तिला जमेल तसं, अडखळत. पण ताई ‘त्या जंगलात’ झरझर चालत राहतात. खूप वेळ. गर्द जंगलात मधेच सिमेंटचा रस्ता दिसावा आणि रसभंग व्हावा तशा ताई गाताना मधेच थांबतात. तंबोरा खाली ठेवतात. आता बहुदा ताई काहीतरी बोलणार म्हणून गायत्री तशीच बसून राहते. ताई मात्र काही न जागीच उभ्या राहतात. ‘उद्या ये’ असं सांगून निघून जातात. गायत्री नाईलाजाने उठते आणि तिचा तंबोरा होता तिथे ठेवते. ताईंच्या रिकाम्या आसनाला नमस्कार करून निघून जाते.
ताई स्वयंपाक खोलीत येतात. तिथे ‘हा’ सगळा पसारा आणि सूनबाई गायब. त्या पसाऱ्यातच काशीबाई काम करत असतात.
सुमा कुठाय?’ ताई विचारतात.
म्हाईत न्हाई कुठं…रात्री येते म्हणाल्या..’ पालकाचं देठ मोडत काशीबाई म्हणतात.
डोक्यात सणक गेल्यासारख्या ताई बाहेरच्या हॉल मध्ये येतात. तिथे त्यांचा नातू कोचावर पहुडलेला. समोर टीव्ही चालू. त्यावर इंग्रजी गाणी. नातू मोबाईलमध्ये. स्मार्टफोनवरची त्याची सराईतपणे धावणारी बोटं बघून ताईंच्या मनात येतं..’नीलची हीच बोटं हार्मोनियम किंवा सारंगीवर चालली असती तर?…’
नील, आई कुठाय?
तिच्या फ्रेंडसबरोबर शॉपिंगला गेलीय. बाहेरच जेवून येणारेत. आजी आज ‘थर्टी फर्स्ट’ आहे ना!’ मोबाईलपासून एक मिलीमीटरही लांब न पाहता नील म्हणतो.
आज थर्टी फर्स्ट डिसेंबर आहे?’ ताई आश्चर्याने विचारतात. आपण आता तारखा देखील विसरू लागलो याचं आश्चर्य.
आणि बाबा?’
बाबाचा शो आहे आज. तो रात्री येईल तेव्हा येईल.’ ताई एक लांब सुस्कारा सोडतात.
नीलवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. तो प्रचंड स्पीडने टाईप करत राहतो.
आणि आज थर्टी फर्स्ट असून तू घरी कसा? आणि काय रे?…नील मी तुझ्याशी बोलत्ये…’
आम्ही नताशाच्या घरी भेटतोय.’
तुम्ही मुलं-मुली एकत्र राहणार? आणि तिचे आई बाप?’
चिल आजी! नताशाचे पेरेंट्स बॉदर नाही करत…व्हाय शुड यू?
त्या रात्री, का माहित नाही, झोप लागत नाही. बारा वाजून गेलेले असतात. ताई घरच्या बाल्कनीमध्ये आरामखुर्चीत येऊन बसतात. एकविसावा मजला. समोर अथांग समुद्र. डिसेंबरची बोचरी थंडी. ताई अंगावर शाल पांघरून घेतात. स्वतःचा स्मार्टफोन पाहतात. त्यांच्या काही निवडक चाहत्यांनी नव्या वर्षाच्या शुभेच्छा पाठवलेल्या असतात. पूर्वी इतक्या शुभेच्छा यायच्या की ते काम त्यांच्या पीएना करावं लागे. आता शुभेच्छांच्या संख्येलाही गळती लागली. आता पीएचीही गरज पडत नाही. रस्त्यावर नव्या वर्षाच्या स्वागताचा जल्लोष सुरू असतो. बाहेर सगळीकडे रोषणाई आणि घरात काळोख. ताई मान वळवून आपल्या अलिशान घराकडे पुन्हा पुन्हा पाहत राहतात. घरातली ती जीवघेणी शांतता त्यांना नकोशी वाटते. ‘नाव, पैसा, प्रसिद्धी, परदेश दौरे, मान-सन्मान, चाहत्यांची गर्दी…एकेकाळी हे सगळं सगळं मिळालं. पण आता कुठेतरी एकटं वाटतं. आपल्याला ऐकणारे कमी झाले. आवाज पूर्वीसारखा लागत नाही. आणि आपल्याच घरात आपली किंमत?’ नुसत्या विचारानेच ताई बेचैन होतात. खूप वेळ समोर दिसणाऱ्या त्या समुद्राकडे पाहत राहतात. इतक्यात बेल वाजते.
बेल? इतक्या अवेळी? चावीने दरवाजा उघडून नील आत येतो. एकटाच नाही. त्याच्या मागून त्याची अख्खी गँग! चित्र-विचित्र, पूर्ण-अपूर्ण पोषाख, केसांचं तर विचारूच नका! जोरात हल्लागुल्ला करत पोरं ताईंसमोर येऊन उभी राहतात. एक ब्लॅक फॉरेस्ट केक ताईंसमोर ठेवतात. त्या गँगमधल्या अनेकांसाठी त्या ‘ताई’ नसतात. फक्त नीलची ‘ग्रँडमा’ असतात.
हॅप्पी न्यू इयर आजी!’ नील ताईंकडे पाहत म्हणतो आणि केक कापायला प्लास्टिकची सुरी देतो. काही क्षण ताईंना काही उमगतच नाही. अनेक वर्षांनी ताई चक्क लाजतात! आपल्या ओंजळीत स्वतःचा चेहरा लपवतात. ताई केक कापतात तशी पोरं जल्लोष करतात. एक पोरगी पुढे होऊन ताईंना केक भरवते. भरवता भरवता केकचं क्रीम ताईंच्या नाकाला आणि सुरकुतलेल्या गालांवर लावते. हास्याची एक लकेर येते. पोरं आपापले सेल्फी घेण्यात मश्गुल असताना एक मुलगी ताईंजवळ येते. तिचा एकंदरीत पेहराव पाहून ताई दचकतात. ती चक्क ताईंच्या पाया पडते. ‘मेरे दादाजी आपके फॅन है | आपके गाने युट्यूब पर कहा मिलते है, वो ‘मैने’ उन्हे दिखाया | You are truly a great singer!’
मुलं निघून गेल्यावर ताई पुन्हा बाल्कनीत येतात. कितीतरी वेळ मघाचचा तो एक मंतरलेला क्षण त्यांच्या मनात रुंजी घालत राहतो. You are truly a great singer!’. किती वर्षांनी कुणीतरी आपल्याला हे म्हणालं! ताईंना जुनं-पुराणं काय काय आठवत राहतं. गाण्याची आवड नसलेलं ताईंचं घर, गाण्यासाठी घरातून पळून जाणं, बुवा-खाँसाहेबांसारखे लाभलेले गुरुजन, कोरस गायन, मग स्वतःची पहिली सोलो रेकॉर्ड, परदेश दौरे, लग्न, मुलांची बालपणं, आपल्या जयंताने गायकच झालं पाहिजे म्हणून त्याला आवड नसताना हट्टापायी शिकवलेलं गाणं, क्लासिकल गायक म्हणून जयंताचं अपयश..जयंता गायक म्हणून आपल्या स्तरावर पोहोचू शकला नाही म्हणून, कुठेतरी खोलवर, आपल्याला होत असलेला एक सूक्ष्म आनंद…लोकांची बदललेली अभिरुची आणि मग गायिका म्हणून सुरु झालेला आपला डीक्लाईन!
इतका वेळ गॅलरीत फेऱ्या मारणाऱ्या ताई अस्वस्थ होतात आणि आरामखुर्चीत येऊन बसतात. अथांग समुद्राकडे पाहत राहतात. संध्याकाळी अधुरा राहिलेला ‘मारवा’ ताईंच्या गळ्यात येऊ पाहतो. गळ्यात मारवा घोळत असतानाच ताईंचे डोळे एकाएकी चमकतात. आपल्या नकळत गळ्यातून पुढली तान यावी, इतक्या अभावितपणे ताई आपल्याच विचारांत गढून जातात…
मारवा दिवसाच्या उतरत्या प्रहरात, संध्याकाळी गायला जातो. म्हणून त्याबद्दल ‘मारवा’ कधी तक्रार नाही करत. उलट त्याला स्वतःची ग्रेस असते आणि ऐकणाऱ्याला तो घायाळ करतो. खाँसाहेब म्हणायचे, बेटी तुम बस्स, दिल खोल के गाओ! बाकी सब उपरवाले पे छोड दो! तसाच मस्तपैकी दिल खोल के ‘मारवा’ गायचा. तो गाताना जो आनंद मिळतो तेच सत्य! बाकी सगळं सगळं फोल आहे. क्षणिक आहे! नील आणि त्याच्या मित्र-मैत्रिणींसारखं. त्यांचं प्रेम, त्यांचा राग, त्यांची श्रद्धास्थानं, त्यांची टेक्नोलॉजी..आणि त्या पोरीनं केलेलं कौतुक?…. हो तेही क्षणिकच! आयुष्यातले प्रहर बदलत राहणार. त्या त्या प्रहरातला राग ‘आपण’ निवडायचा आणि बस्स …’दिल खोल के’ गायचा!
नमकीन डोळ्यांनी ताई समुद्राकडे बघत राहतात…खाँसाहेबांच्या आठवणींची गाज ऐकत! पहाटेच्या चारची बोचरी थंडी. थर्टी फर्स्टचा लोकांचा जल्लोष आता थंडावलाय. ताई बाल्कनीतच डोळे मिटून शांत बसल्या आहेत. मारव्याची आणि ब्लॅक फॉरेस्ट केकची चव ताईंच्या जिभेवर अजून आहे.
आता रोषणाई बाहेरही आहे…आणि आतही!

नविन काळे


No comments:

Post a Comment