मधले पान


कट्ट्यात 'मधले पान' हे द्यावेसे वाटले, कारण अनेक घडामोडी आजूबाजूला घडत असतात, त्यांची दखल घेणे आवश्यक असते. त्याबद्दल वाचकांनी विचार करावा असे वाटते.

जून महिना तसाही धामधुमीचा असतो. पाऊस येत असतो, मुलांच्या शाळा सुरु झालेल्या असतात. सगळ्यांची लगबग सुरु होते. मे महिन्यातील सुट्टीने, प्रवासाने आळसावलेले सगळेजण पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतात. 
ह्या वर्षी आपल्या नव्या सरकारचा शपथविधी ही ३० मे ला पार पडला. काही जुने चेहेरे पडद्याआड गेले तर नवे चेहेरे उदयास आले. यातील एक नाव सगळ्यांनाच धक्का देऊन गेले. ते म्हणजे श्री. एस. जयशंकर यांचे. भारतीय विदेश सेवेतील एक अनुभवी व्यक्ती! भारताचे माजी परराष्ट्र सचिव. त्यांना प्रधानमंत्रींनी एकदम परराष्ट्र मंत्री पद बहाल केले. श्री. मनमोहन सिंग यांच्यानंतर असे मानाचे मंत्रीपद मिळालेले ते दुसरे नोकरशहा. त्यांच्या कारकिर्दीला शुभेच्छा. त्यांचा अनुभव नव्या सरकारला नक्कीच उपयोगी पडेल.
सरकारचा शपथविधी होऊन नव्या खासदारांनी संसदेतही शपथा घेतल्या. मात्र ह्यावेळी झालेली धर्माशी निगडीत घोषणाबाजी मात्र शोभादायक नव्हती. 

संसद हे घटनेचे मंदिर आहे. आपल्या भारतीय घटनेचा जयजयकार तिथे अपेक्षित आहे. ह्या पार्श्वभूमीवर ज्या सौजन्याने आणि आदराने संसदेतील बंगालच्या तरुण महिला खासदारांनी, नुसरत जहाँ रुही जैन आणि मिमी चक्रबर्ती यांनी शपथ घेतली ते पाहून एका सुखद झुळूकेचा प्रत्यय सदस्यांना आला असेल.
प. बंगालमधील डॉक्टरांवरील झालेला हल्ला हा माणुसकीला काळिमा फासणारा होता. पण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काहीही कारण नसताना जो आडमुठेपणा दाखवला, त्यामुळे या संपाला वेगळे वळण मिळाले. ह्या संपाचे पडसाद देशभर उमटले. 
ह्या निमित्ताने मला महाराष्ट्रात व देशातही काही ठिकाणी पोलिसांवर झालेले हल्ले आठवले. दुर्दैवाने पोलिसांच्या समर्थनार्थ कोणतीही संस्था उतरली नाही. पण अशा तऱ्हेने सरकारी कर्मचाऱ्यांवर हात उगारणे, हिंसा करणे हे सुसंस्कृत समाजाचे लक्षण नव्हे.
ज्ञानपीठ पारितोषिक विजेते प्रसिध्द नाटककार गिरीश कर्नाड यांचे निधन हा कलाजगतातील सगळ्यांनाच धक्का होता. चित्रपट, दूरदर्शन, रंगमंच, लेखन आणि अभिनय अशा अनेक क्षेत्रांशी ते जोडलेले होते. मराठी नाटकांवर त्यांचे मनापासून प्रेम होते. आपल्याआधी विजय तेंडुलकरांना नाटककार म्हणून ज्ञानपीठ पुरस्कार मिळायला हवा होता हे त्यांनी प्रांजळपणे सांगितले होते. 
कर्नाड महोत्सव बंगलोर  :तुघलक 
सादरकर्ते :महाराष्ट्र मंडळ 

अनेक मानसन्मान लाभलेले आणि परखड राजकीय मते असलेले कर्नाड यांचे जाणे हे एक मोठी पोकळी निर्माण करून गेले. कोंकणी ही माझी मातृभाषा असली तरी लिहिताना मला सगळे काही आधी कानडीतून सुचते असे ते म्हणत. कानडी, मराठी, इंग्रजी, हिंदी सर्व भाषात त्यांना रस होता. आणि ह्या सर्व भाषातून त्यांनी कामेही केली. एकूणच भारतीय नाट्यक्षेत्रावर प्रभाव पाडणारा एक समर्थ नाट्यकर्मी आपल्याला सोडून गेला.        

 ह्याच महिन्यात क्रिकेटची विश्वचषक सपर्धा सुरु झाली आहे. ह्यावेळेला हे सामने IPL च्या धर्तीवर घेण्यात येणार आहेत. त्यामुळे सामन्यागणिक गुणांचा तक्ता बदलत आहे. 


फ्रेंच टेनिस स्पर्धेत राफेल नदाल विजयी झाला. गेली काही वर्षे नदाल, फेडरर आणि जोकोविच हे तीन खेळाडूच मुख्यत्वेकरून सर्व महत्वाच्या टेनिस स्पर्धातील विजेतेपद पटकावत आहेत. ह्या खेळाडूंच्या मक्तेदारीमुळे टेनिसचे घड्याळ जणू थबकल्यासारखे झाले आहे.

टेनिस प्रमाणेच भारतीय राजकारणातही भाजपाची मक्तेदारी सुरु झाली आहे असे अनेकांना वाटत आहे. सव्वाशे वर्ष जुना पक्ष आपली अधोगती रोखू शकत नाही ही खरोखरच काळजीची बाब आहे. आणि विखुरलेल्या छोट्या पक्षात भाजपाला टक्कर देण्याची शक्ती नाही हे ही तितकेच खरे.

आंतरराष्ट्रीय राजकारण ट्रम्प यांच्या विविध वक्तव्यांनी दुमदुमत आहे. अमेरिकेत राष्ट्रपतीपदासाठी चुरशीची स्पर्धा सुरु झाली ह्याचाच हा परिणाम आहे असेही काही जणांचे मत आहे.
सध्यातरी इतकेच!!!!!!!
स्नेहा केतकर


3 comments: