मैं तो खेलुन्गी..


आठवण आहे श्रीमती शोभाताई गुर्टू यांच्या एका मैफलीची... मैफल होती दादरच्या छबिलदासमध्ये. साथीला संवादिनीवर पं. पुरुषोत्तम वालावलकर आणि तबल्यावर निजामुद्दीन खांसाहेब. माझं भाग्य असं की शोभाताई आणि निजामुद्दीन खां यांची अनेक रेकॉर्डिंग्स मी त्यांच्या अगदी जवळ बसून लाईव्ह ऐकू शकलो. दोघे बुजुर्ग कलाकार... दर्द असो, वाट पाहणं असो, रंग खेळणं असो तो ठुमरी, दादऱ्यातून मांडावा तर शोभाताईंनीच. आणि गायक मुखड्याकडे आला की हव्या त्या लयीत आपली वाट करून घेऊन लग्गी लावावी तर खांसाहेबांनीच. आणि मग तो रंग इतका चढत जातो की श्रोत्यांचे फक्त डोळे वहात राहातात.


सुरुवातीला निजामुद्दीन खांसाहेब प्रेक्षकांत समोर बसलेले होते. टीबीतून नुकतेच बरे झाल्याने त्यांना वाजवायला डॉक्टरांनी परवानगी दिली नव्हती. शोभाताईंनी आलाप घेऊन षड्जावर येत होरी-गारा या प्रकारातलं "मैं तो खेलुन्गी उनहीसे होरी गुईयां..." हा मुखडा गायला सुरुवात केली. 

मैं तो खेलुन्गी उनहीसे होरी गुईयां
मोहे गले लगाये बरजोरी
पैयाँ परु री बाह दबोई
लैके अबीर गुलाल कुमकुम
वो तो रंग की पिचकारी गुईयां
मैं तो खेलुन्गी उनहीसे होरी गुईयां

ठुमरीतली नायिका सखीजवळ हट्ट मांडते आहे की मी फक्त "त्यांच्या" बरोबरच म्हणजे कृष्णाबरोबर होळी खेळेन. मला बळजबरी जवळ घेतो, पाया पडू गेले तर हात पिरगाळतो. अबीर, गुलाल आणि कुमकुम घेऊन शिवाय पिचकारीसुद्धा... पण मी होळी खेळेन फक्त "त्यांच्या" बरोबरच... हा सरळ सरळ अर्थ. पण या दोन दिग्गज कलाकारांमध्ये मला जे सुंदर नातं दिसलं तेही असंच...  शोभाताई जणू खांसाहेबांना ही होरी रंगवण्यासाठी स्टेजवर बोलावत होत्या. शेवटी न राहावून निजामुद्दीन खांसाहेब हातातली काठी ठेऊन उठले आणि स्टेजवर तबल्यावर जाऊन बसले... त्यानंतर जो रंग खेळाला गेला तो आपण सर्वांनी ऐकू या.... सात मात्रांचा ठेका असूनही तो शेवटी केहेराव्यात नेऊन, सगळ्यावर कडी म्हणजे तबल्यावर "लखनऊ की नजाकत" ज्याला म्हणतात तीही यात ऐकायला मिळते.


खांसाहेबांचा रियाझ त्यांच्या घरी जाऊन, त्यांच्यासमोर बसून ऐकण्याचा योग अनेकदा आला...  माहीमच्या दर्ग्यामागे तांबट आळीमध्ये राहात. घराच्या दाराबाहेर पितळ्याच्या भांड्यांना ठोके देण्याचं काम चालू असे आणि खांसाहेबांचा रियाझी हात त्या सगळ्यावर आवाज देत फिरत राही... छोटासा तुकडा घेऊन त्याचा रियाझ अशा लयीमधे चाले जी आपल्याला मनातल्या मनातही पकडणं अवघड वाटे.  आणि त्यावर ते म्हणत "और दो घंटे बैठूंगा तो इस को आसमान में फेंक दूँगा." असो... त्याबद्दल नंतर कधीतरी लिहीन... असे दिग्गज कलाकार क्वचितच होतात, ज्यांची  कलाच  त्यांचं अस्तित्व बनून राहाते. जरूर ऐका...

या होरीमुळे अनेक गाणी डोळ्यासमोर तरळायला लागली. आपल्याकडे सिनेसृष्टी ही तर खास करून गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. कोणत्या सीनमधून गाणं सुरू होईल किंवा गाण्यासाठी सीन कसा मोल्ड करतील हे सांगता येत नाही. साधारण १९५७ पासूनची सिनेसृष्टीतली  होळीची गाणी बघितली...
१९५७ - होली आई रे कन्हाई रंग छलके सुना दे जरा बांसुरी...
१९७० - आज ना छोडेंगे बस हमजोली खेलेंगे हम होली...
१९७५ - होली के दिन दिल खिल जाते है रंगो मे रंग मिल जाते हैं...
१९८१ - रंग बरसे भीगे चुनरवाली रंग बरसे...
१९८५ - सात रंग मे खेल रही है दिलवालोंकी टोली रे...
१९९३ - अंग से अंग लगाना सजन हमें ऐसे रंग लगाना...
२००३ - होली खेले रघुबीरा...
२००५ - डू मी अ फेवर लेट्स प्ले होली, रंगोमे है प्यार की बोली...
२०१३ - बलम पिचकारी जो तूने मुझे मारी तो सीधीसाधी छोरी शराबी हो गई...
२०१७ - तुझपे टिकी है मेरी नॉटी नज़रिया, तुझको बना कर के ले जाएँगे बद्री की दुल्हनिया...

आता एक गंमत लक्षात येते का?... एकंदरीत जसजसा काळ पुढे सरत गेलाय तसं "कान्हाने" या खेळातून अंग काढून घेतलेलं दिसतं. आणि मनात रंगून जायची होळी फक्त आणि फक्त शरीराला भिजवणारी होत गेलेली स्पष्ट दिसते. माध्यमं (नाटक, चित्रपट इ.) ही समाजाचा आरसा असतात त्यामुळे कोणत्याही कलेचं बदलत गेलेलं रूप काय दर्शवतं याचा विचार प्रत्येकाने करायला हवा... नाही का?


संदीप लिमये



No comments:

Post a Comment