पालकत्व - प्रकरण १०-गप्पांचा श्रीगणेशा


 “अडलंय माझं खेटर!” कावळा म्हणाला.
पुस्तकातली ती ओळ वाचताना माझी जीभ प्रत्येक वेळी अडखळत होती. अडीच वर्षांच्या सुहृदच्या सध्याच्या आवडत्या पुस्तकातलं, ‘कपिलेने घेतला झोकामधलं ते वाक्य. हे पुस्तक सध्या दिवसातून किमान दोनदा तरी वाचून होत असेल. म्हणजे ही ओळ तो रोज दोनदा ऐकणार. आणि जसं जसं अनेकदा पुस्तक वाचून व्हायला लागतं तसं तसं अनेक मुलांना परिच्छेदाचा पहिला शब्द सांगितला की पुरे होतं. पुढचं सगळं ते घडा घडा बोलून टाकतात. (“पाठांतर करा रे”,  असं त्यांच्या मागे लागावं लागत नाही.) याला सुहृदही अपवाद नाही. 
फक्त पुस्तक वाचतानाच म्हणतात असं नाही तर त्यांच्या दिनक्रमामध्ये जिथे कुठे त्यांना मनसोक्त बडबड करायला मिळते तिथे तिथे ते ऐकलेलं, वाचलेलं (वाचून दाखवलेलं) शब्द, वाक्य, वाक्प्रचार म्हणून बघत राहतात. आणि मग प्रत्यक्ष संवादामध्ये वापरून बघतात. बरोबर वापरला किंवा चुकीचा वापरला तरी अनपेक्षित किंवा नवीन शब्द म्हणून मोठ्यांची काहीतरी प्रतिक्रिया मिळते. त्यातून ते बोध घेऊन अजून पुढे तो पक्का करतात. भाषा शिकण्यातला हा प्रवास फारच स्तिमित करणारा असतो.
माझी जीभ अडखळण्याचं कारण असं होतं की हा वाक्प्रचार सुहृदने चुकूनही प्रत्यक्ष संवादामध्ये वापरलेला मला आवडणार नव्हता. माझ्यासाठी हे व असे काही वाक्प्रचार प्रत्यक्ष संवादामधून वर्ज्य असले तरी भाषा म्हणून ते माहीत असणं गरजेचंही आहे. (न जाणो पुढे जाऊन तो लेखक होईल आणि त्याला एखाद्या पात्राच्या तोंडी ते द्यावं वाटेल!) ह्याच शब्दांना धरून बसावं असं माझं म्हणणं अजिबातच नाही. पण जवळपास प्रत्येक भाषेत असे शब्द आहेत जे मोठ्यांनी समजून उमजून (कधी कधी न समजताही!) वापरलेले चालतील, पण लहानांनी वापरलेले चालणार नाही अशी पालकांची आणि समाजाचीही अपेक्षा असते.
अशी अपेक्षा असेल तर आपणच आहोत आपल्या मुलांच्या भाषेचे शिल्पकार! त्यांनी जे बोलू नये असं वाटतं ते आपणही बोलून चालणार नाही. पुस्तकातले असे नको असलेले शब्द पुस्तकापुरतेच मर्यादित राहिले, त्यांना प्रोत्साहन नाही मिळाले की ते मुलांच्याही पॅसिव्ह (माहीत आहेत, कळतात, पण वापरले जात नाहीत अशा) शब्दसंग्रहामध्ये राहतात. याउलट जे शब्द नेहेमी वापरले जातात ते त्यांच्या अ‍ॅक्टिव्ह (रोजच्या वापरात, बोलण्यात) शब्दसंग्रहामध्ये येतात.   

सगळ्याच संस्कृतींमध्ये घडणार्‍या सगळ्याच गोष्टी योग्यच असतात असं नाही, तसंच सगळ्याच गोष्टी कालबाह्य असतात असंही नाही, अशा एका निरीक्षणाला मी पोहोचलेय. 
भारतीय पालकत्वामध्ये घडत असलेल्या अनेक गोष्टी संशोधनाअंती योग्य, बाळाच्या आणि आईच्या दृष्टीने हितकारक सिद्ध झाल्या आहेत हे पालकत्वाचा अभ्यास करताना वाचनात आलं. तशाच बाळासाठी अयोग्य ठरणार्‍या पण जवळपास अनेक बाळांबाबतीत, आईबाबतीत घडणार्‍या गोष्टीही समोर येत आहेत. वेगवेगळे मुद्दे घेऊन बोलताना या गोष्टींचा अनेक ठिकाणी उल्लेख झाला आहेच. आजचा विषय भाषेभोवती फिरणार आहे.
आपल्याकडे अगदी तान्ह्या बाळाशीदेखील खूप गप्पा मारणार्‍या आज्ज्या,मावश्या, आया असतात. ह्या गप्पा मारण्याला खूप महत्त्व आहे. आणि चालत्या बोलत्या खर्‍या खुर्‍या चेहर्‍याने (टिव्ही, कॉम्प्युटर, मोबाईल यांवर नव्हे) हावभावांसह हे करणं याला शारीरिक गरजांनंतरची पहिली महत्त्वाची गरज म्हणायला हरकत नाही. 
माणूस ह्या प्राण्यामध्ये भाषा उत्क्रांत झाल्यामुळे सगळी गणितंच बदलली. भाषा, भाव-भावना, संवाद या सगळ्या गोष्टी आपल्या प्राथमिक कौशल्यांमध्ये मोडाव्या इतक्या महत्त्वाच्या ठरतात. या गप्पा आपल्या प्रौढांच्या बोलण्याच्या वेगाने मारल्या जातच नाहीत. एकच एक गोष्ट अनेकदा आणि अगदी संथ गतीने म्हटली जात असते. अशा प्रकारच्या बोलण्याला पालकांची भाषा म्हणून Parentese (पेरेंटीज) असं म्हणतात. हे इथवर ठीक चाललंय आपलं. आता या गप्पांमध्ये काय नसावं? तर बोबडं बोलणं! कारण बाळ जसंच्या तसं शिकतंय आपलं पाहून! त्यामुळे आपण बोबडं बोललो तर तेही बोबडं बोलेल. बोबडे बोल सुरुवातीला ऐकायला आवडत असले तरी नंतर त्यात सुधारणा घडवून आणणं खूप कठीण वाटू शकतं, ठरू शकतं.
या गप्पांमध्ये अर्थातच नकारात्मक भावनांना स्थान नाही. आपला रुद्रावतार, दुःखी चेहरा लहान मुलांना घाबरवून टाकू शकतो. तेव्हा अगदी सुरुवातीच्या काळात तरी अशा गोष्टी बाळासमोर न घडण्याची काळजी जरूर घ्यायला हवी. आपण काही हे मुद्दाम करू असंही नाही. पण अनेकदा घरातली भांडणं बाळांसाठी थोपवून धरता येत नाहीत. प्रौढ म्हणून ती आपली जबाबदारीही आहे आणि तेवढं कौशल्य आपल्या अंगी यावं यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करायला हवा.

भीती ही गोष्ट खूप उपजतच आपल्यामध्ये आहे. जैविक विश्वामध्ये तगून राहण्याचा तो एक भाग आहे. लहान मुलांमध्येही ती असतेच. वेगवेगळ्या वयोगटानुसार वेगवेगळ्या गोष्टींची. त्यामुळे अस्तित्वात नसलेल्या बागुलबुवाची अजून भर घालायची गरजच नाही. आणि गंमत म्हणजे अशा अनेक गोष्टींचे बागुलबुवे 2 ते 5 वर्षांच्या मुलांच्या मनात तयार होतच असतात. सोप्या भाषेत त्याला नाईट्मेअर (nightmare) म्हणतात. 

मेंदूच्या वाढीचा भाग म्हणून हे घडणारच असतं. मग आपल्या नसत्या भीतींचं ओझं लहानग्यांवर का टाका? आणि ज्या गोष्टींची भीती वाटते आहे त्याबद्दल, “त्याला काय घाबरायचं”, “घाबरट कुठला” असं म्हणून तर अजिबातच हिणवू नये. भीती वाटणं हे खूप स्वाभाविक आहे आणि ती सर्वप्रथम मान्यच करायला पाहिजे. त्याबद्दल अधिक बोलायला हवं. शक्य असेल तर दाखवायला हवं.
रद्दी विकत घ्यायला येणार्‍या माणसाचा पेंपSSSS सुहृदला घाबरवून सोडायचा. एकदा प्रत्यक्ष पाहिल्यावर मात्र त्याची भीती कमी झाली. कुकरची शिट्टी, कोकीळेचा कर्णकर्कश्श आवाज, बुलेटसारख्या बाईकची रात्री अपरात्री ऐकू येणारी फटफट, फटाके, अगदी जवळून आलेला मोराचा मेटालिक मियॉंव अशा अनेक गोष्टींची भीती आली आणि गेली. सध्या मनीमाऊ चालू आहे!
आपल्याकडे अजून एक खेळ गंमत म्हणून खेळतात, बाळ आणि त्याच्या आईसोबत किंवा अगदी जवळच्या व्यक्तीसोबत... बाळाच्या आईला जवळ घेऊन म्हणायचं, ‘आई माझी... हा खेळ खेळून तयार आणि मोठी झालेली मुलं कदाचित अजून वेगळी प्रतिक्रिया देतील, पण नुकतीच बोलायला लागलेली आणि प्रौढांच्या जगामधलं खरं-खोटं कळू न लागलेली छोटी रडवी होतात. ही भावनिक घालमेल घडवून आणून आपण नेमकं काय साधतो हे मला अजून कळालं नाहीये, पण ते जे काही साधत असू ते मुलांना वाटणार्‍या इनसिक्युरिटी (insecurity) पेक्षा मोठं असेल का असा प्रश्न पडतो.
अजून एक खूप महत्त्वाचा शब्द खूप लहान असतानाच शिकवून टाकण्याची आपल्याला घाई झालेली असते, तो म्हणजे नाही’. मुलांसाठीच्या नाहीच्या याद्या इतक्या मोठ्या असतात आपल्या. पण या सततच्या ‘नाही’चा काही चांगला परिणाम होत नाही त्यांच्यावर. मोठ्यांनासुद्धा कुठे आवडतं सारखं नाही म्हटलेलं! मग याला पर्याय काय! संवादकला! 
काही गोष्टींना नाही म्हणणं सुरक्षिततेच्या दृष्टीने गरजेचं असतं. पण या ‘नाही’सोबत सोप्या शब्दातली कारणमीमांसा आली तर मुलांना तो नाही मान्य करणं सोपं जातं. कधी कधी दुसरे सोपे, सुरक्षित पर्याय देणं शक्य असतं. कधी चक्क लक्ष दुसरीकडे वळवून ती गोष्ट तात्पुरती का होईना विसरायला लावणं. मग विचार करायला थोडा वेळ मिळाला की अजून काही तरी नवं सुचू शकतं आणि करता येऊ शकतं.
“आपण काय बोलतो” यातून मुलं जेवढं शिकणार आहेत त्याहून खूप कमी ती आपण “त्यांना काय सांगतो” यातून शिकणार आहेत. तेव्हा त्यांना “सांगायला” जाण्याऐवजी “आपल्या बोलण्या”वर लक्ष केंद्रित करू या! 
प्रीती ओ.


No comments:

Post a Comment