पालकत्व-11. आस्तिक – नास्तिक यांचं विज्ञान

मागील भाग : पालकत्व- प्रकरण १०-गप्पांचा श्रीगणेशा

तीन वर्षांची वीहा आपल्या आजीला मारत होती. आजी म्हणाली, “असं मारायचं नाही, पाप लागतं.” वीहाची तरुण मावशी पटकन म्हणाली, “आजीला सांग, पाप लागत नाही.”

एखाद्या नास्तिकाने हा संवाद ऐकला तर तो म्हणेल, “अगदी बरोबर. पाप बीप सब झूठ है!
एखाद्या आस्तिकाने हा संवाद ऐकला तर तो म्हणेल, “या आजकालच्या मुली! कळत तर काही नाही आणि चालल्या आम्हाला शिकवायला! लागतंच मुळी पाप.”

एकाच छपराखाली राहणारे आस्तिक, नास्तिक आणि अ‍ॅग्नॉस्टिक (देव आहे याबद्दल मनात संभ्रम असणारे आणि म्हणून कुठल्याही एका बाजूला न झुकता, परिस्थितीनुरूप देवाचं अस्तित्व मान्य करणारे पण तरीही खूप देव देव न करणारे) हे आताशा भारतातल्या अनेक शहरांमध्ये सापडतात. 

देव आहे आणिदेव नाही त्यामुळे जे काही आहे ते मलाच करायचंय अशा दोन टोकाच्या भूमिकांची आयुष्यं दिसायलाही खूप वेगळी असतात. अशा माणसांच्या मिश्र गटात जन्माला आलेल्या मुलांसाठी ही संभ्रमात टाकणारी परिस्थिती असू शकते. पण त्यामुळे पालकांची जबाबदारी अधिकच वाढते.

वीहाच्या प्रसंगामध्ये पाप पुण्याच्या संकल्पनांकडे बघताना मूळ मुद्दा बाजूलाच राहिला. आजीला मारलं तर पाप नाही लागणार एक वेळ, पण असं लहानांनी मोठ्यांना आणि मोठ्यांनी लहानांना (हे तितकंच महत्त्वाचं आहे! आणि हा एका पूर्ण लेखाचा विषय आहे.) मारलेले चालणार आहे का आपल्याला? आणि तसं जर चालणार नसेल तर त्या प्रसंगात प्रथम लक्ष द्यायची गोष्ट होती, ती वीहाचं आजीला मारणं. पाप पुण्याबद्दल नंतर परत गप्पांमधून बोलायला हवं कदाचित. असेही काही प्रसंग असतील, जिथे इतर कशाकडे लक्ष द्यायची आवश्यकता नाही. पण पाप-पुण्याबद्दल बोललं जातंय अशावेळी तोच मुख्य मुद्दा हाताळला पाहिजे.

अगदी लहान असतानाच्या माझ्याबद्दलच्या दोन गोष्टी माझ्या आजूबाजूच्या अनेकांनी मला अनेकदा सांगितल्या आहेत. आणि त्या ऐकताना मला आजही गंमतच वाटते. म्हणे मी घरातून बाहेर पडले की वाटेत येणार्‍या प्रत्येक मंडळाच्या गणपतीला नमस्कार केल्याशिवाय पुढे हलायचीच नाही. आणि तोही जाता जाता केला असा नमस्कार नव्हे. नीट थांबून, चपला काढून, मूर्ती न्याहाळत नमस्कार. तरी बरं आजपेक्षा तेव्हा निश्चितच गणपती मंडळं कमी होती. आणि मला घेऊन जाणार्‍या मोठ्या माणसांच्या चिकाटीचं कौतुकच करायला हवं. 

कदाचित तेव्हाची मंडळी आस्तिक असल्याने, माझं कौतुक वाटून ते मला हे सर्व साग्रसंगीत पार पाडू द्यायचे. दुसरी अशीच गंमतीची गोष्ट म्हणजे गणपती बघायला गेल्यावर प्रत्येक मांडवातल्या देखाव्यापेक्षा माझं लक्ष गणपतीकडे अधिक. मोठ्या देखाव्यामुळे कोपर्‍यात गेलेला गणपती माझ्या नजरेस पडेपर्यंत मला चैन नसायची म्हणे.

भक्तिभावपूर्ण आस्तिकतेपासून आत्तापर्यंतच्या तर्कशुद्ध नास्तिकतेपर्यंतचा माझा प्रवास माझ्यासाठी सुद्धा विस्मयकारक आहे. अतिशय धार्मिक (रूढार्थाने) आई आणि अ‍ॅग्नॉस्टिक बाबा या पालकत्वाच्या मिश्रणातून तयार झालेलं माझं नास्तिक उत्पादन खूप काही सांगून जातं. अशी उदाहरणं आजूबाजूला खूप सापडतील. नास्तिकांची संख्या वाढत असली तरीही आस्तिकांची संख्या कमी झालेली नाही. ती आजही भरपूर आहे. त्याच्या जोडीला अ‍ॅग्नॉस्टिकही वाढलेत.

आपलं मूल आस्तिक व्हावं का नास्तिक याची काही अटकळ पालकांच्या मनात असू शकते. सर्वसाधारणपणे, आपण जसे आहोत तसंच मुलांनी व्हावं अशी वाटणारी पालकमंडळी जास्त सापडतील, अगदी दोन्हीही बाजूला. पण मुलांचं आयुष्य पालकांपुरतं मर्यादित नसल्याने, समाजातल्या इतर अनेक गोष्टींचा परिणाम होत आपलं मूल घडणार आहे. हे जसं इतर अनेक गोष्टींमध्ये खरं आहे तसंच आस्तिक-नास्तिकतेच्या मूल्यपट्टीवरही तेवढंच खरं आहे.

नास्तिकतेत नकारात्मकता नसून खूपच सकारात्मक विचार आहे अशी माझी आणि अनेक नास्तिकांची धारणा आहे. त्यातली तर्कशुद्धता, खोलात जाऊन विचार करणे, प्रत्येक गोष्टीचे तुकडे तुकडे करून समजून घेणे आणि त्या तुकड्यांमधून निर्माण होणार्‍या पूर्णत्वाचाही सखोल अभ्यास करणे या सगळ्याचा पालक म्हणून आपल्या वागण्यावर होणारा परिणाम आणि म्हणून आपल्या वागण्या बोलण्यातून मुलांवर होणारा परिणाम स्वागतार्ह आहे.

यातूनच अनेक प्रश्नांची उत्तरे बदलतात. उदाहरणार्थ आपल्याकडे बाळ आईच्या पोटातून आल्याचं सहजासहजी सांगितलं जात नाही. पूर्वी बाप्पा बाळाला पाठवायचा, आता ती हॉस्पिटलमधून घरी येतात. असं का बरं? आजूबाजूला वेगवेगळ्या वयोगटातील बाळं, पोट वाढत जाणार्‍या गर्भवती स्त्रिया, त्यांना झालेली बाळं असं दाखवणं, त्याबद्दल बोलणं हे बोलू लागलेल्या बाळांबरोबर सहजच शक्य असतं. बाळ किंवा कोणीही ज्या व्यक्तिला आपली आई म्हणतं त्या व्यक्तिच्या पोटातून ते बाहेर आलेलं असतं ह्या सर्वसाधारण नियमापर्यंत पोहोचू शकणारी अडीच तीन वर्षांची बाळं मी पाहिली आहेत. तेव्हा खरी उत्तरं देणं शक्य नसतं असं अजिबातच नाही. फक्त आपल्याला ती द्यायची आहेत की नाहीत हे आपल्याला स्पष्ट हवं. आणि खरी उत्तरं द्यायची म्हणजे लांबलचक उत्तरं द्यायची असंही अजिबातच नाही. अतिशय सोपी आणि छोटी करून देता येऊ शकतात. किंबहुना उत्तराची लांबी आणि पाल्याचं वय यांचा धन सहसंबंध (पॉझिटिव्ह को-रीलेशन) असावा असं दिसतंय. (टीनेजमध्ये कदाचित जरा आलेख वर खाली होईल!) कधी कधी लगेच नाही सुचलं उत्तर किंवा मुळातच माहित नसेल तर आपल्याच मुलांना, “मला हे माहित नाही, विचार करून थोड्या वेळानं सांगते/तो” असं म्हणण्यात लाज ती काय!

एकविसाव्या शतकात जेव्हा सगळंच सायंटिफिक असण्याची फॅशन आहे तेव्हा आपलं पालकत्वही पुरेसं सायंटिफिक आहे ना याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आणि हा सायन्स नावाचा देव मागच्या 100-200 वर्षांत जन्माला आल्यामुळे त्याला कुठली फुलं लागतात आणि कुठला नैवेद्य चालतो हे आपल्या मागच्या पिढ्यांना पुरेसं माहित असेलच असं नाही. त्यात अर्थातच त्यांची काहीच चूक नाही. पण म्हणजे मुळातून अभ्यास करणं, समजून घेणं, प्रश्न विचारणं आणि आपल्याला पडत नसले तरीही आपल्या मुलांना पडणार्‍या प्रश्नांना न थांबवता आपला अभ्यास चालू ठेवणं याला पर्याय नाही.

प्रीती ओ.


No comments:

Post a Comment