सती


"म्हणजे तू सुद्धा 'सती' परंपरेचं समर्थन करतोयस?
 तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं" ती म्हणाली.
"तुला माझा पॉईंट नाही कळला." मी लगेच रिसेट मोड मधे गेलो. 'पद्मावत' पाहून परत येतानाचं हे संभाषण! 

एखादा सिनेमा, नाटक, किंवा पुस्तक यावर आमची नेहमीच चर्चा होत असते. कोणीही दुसऱ्याला आपला मुद्दा पटवण्याचा प्रयत्न करत नाही. पण आज मॅडम जरा aggressive होत्या.

"ओके, मग पटवून दे. I give you second chance." ती म्हणाली.
"तिने सती जाणं ह्यात दोन गोष्टी होत्या. 
पहिलं म्हणजे तिचं रतन सिंगवरचं नितांत प्रेम, आणि दुसरं महत्वाचं म्हणजे खिलजीच्या अहंकाराला चिरडणं, त्याला हरवणं."  -मी.

"हरवणं? न लढता?अब्रू वाचवायची असेल तर आत्महत्या करा, असा रोख आहे त्या शेवटाचा!!
ती सुरुवातीला एक लढवय्यी राजकन्या दाखवली आहे. मग शेवटी ती का नाही लढली? 
लढून मरणं तिला जास्त मानाचं झालं नसतं का?"  -ती.

"कदाचित असं म्हणता येईल की तिचं युद्ध हे खिलजीच्या तिला पाहण्याच्या इच्छेविरुद्ध होतं. त्याला सामोरं जाणं म्हणजे त्याची इच्छापूर्ती होणं. हे तिला होऊ द्यायचं नव्हतं. सगळीच युद्धं लढून जिंकायची नसतात."  -मी.

"हो. पण तिच्या जाण्याने खिलजीच्या वृत्तीत काही फरक पडला असेल का?" ... 
तुला वाटतं, मी जर त्या वेळी जॉब चेंज केला असता तर त्या हलकटाच्या वागणूकीत फरक पडला असता? नाही!! 

मी सेक्शुअल हॅरेसमेंट केस लढले आणि त्याला माझ्या डोळ्यांदेखत हाकलून देण्यात आलं तेव्हाच मी खरं जिंकले.
तिच्या डोळ्यात तिरस्कार आणि अभिमान दोन्ही दिसत होते. 
पाच वर्षांपूर्वीची जखम पुन्हा छेडली गेली होती..
खरंच, स्त्रीच्या अपमानाचं सूड हे एकच उत्तर असतं, आणि त्या राक्षसाचा डोळ्यांदेखत  पराभव हा एकमेव विजयमार्ग असतो, हे माझ्या लक्षात आलं. 
मी पुढे कोणताही युक्तीवाद करता, तिचा हात हातात घेऊन ड्राईव्ह करत राहिलो.

मानस

No comments:

Post a Comment