श्रीमंत


वेळ होती संध्याकाळची,
पाखरे घरी परतायची.
घामेजलेली,दमलेली,
पावले टाकत निग्रहाने,
ती परत निघालेली.

भरगच्च कामाचा दिवस,
मीटिंग्स, मेल्स, फ़ोन्स,
यांचे अविरत आक्रमण झेलत,
सरला होता जड़,जड़ होत,
हलका, सहज श्वासही नव्हता सापडत!


अवती भवती नजर फिरवली तिने,
तर किती, किती जीव दिसले निवांत,
कोणी बसले आहे शांत,
कोणी गप्पा रंगवत मग्न,
नाहीच कशाची भ्रांत!

बाल गोपाळ खेळ रंगवत,
कोणी तरुणी हौसेने मिरवत,
कोणी हास्य विनोद करत,
जसे काही हिला खिजवत,
बघ, बघ, तूच एक वेळ हाताशी नसलेली!


कुठूनसा आला सुगंध,
शिजतोय ताजा वरणभात,
शेवटचे कधी बरे,
मनापासून रांधुन केला स्वयंपाक?
नको ती मोजदाद नि हिशोब!


घरानजिकच्या वाटेवर एक कच्ची झोपड़ी,
बाहेर चूल पेटलेली.
चिरुन ताजी भाजी शिजवायला ठेवलेली,
एक गरीब कष्टकरी स्वतःतच दंगलेली!
धुवट कपड़े घालून पाने मांडून बसलेली!


ती स्वतःच्या इमारती जवळ पोचते
न राहवून मागे बघते,
मनासारखे बनवून वाढ़ायला घेतलेली,
ती साधीसुधी मजूर स्त्री,
तिला त्या क्षणी सर्वात श्रीमंत भासते!!


अनिता मराठे


No comments:

Post a Comment