‘‘माझी पहिली वारी’’’


दि. ७ जुलैला मी पहिल्यांदा ज्ञानेश्वर महाराज पालखीबरोबर दिंडीचा अनुभव घेतला.  IT दिंडी नावाच्या ग्रुपमध्ये आम्ही चौघे, म्हणजे मी, माझी वहिनी, Dr. Rohini Sathaye, चुलत बहीण (वर्षा) आणि तिचा नवरा (विवेक) रजिस्टर झालो. पहाटे ३:३० वाजता आम्हाला सहकार नगरच्या रिलॅक्स कॉर्नरवरून पिकअप  केलं गेलं. सव्वापाच  वाजता आळंदीजवळ असलेल्या ‘‘होली बेसिल’’ नावाच्या एका हॉटेलमध्ये थांबलो. तिथं नाश्त्याची सोय केली होती
(स्वखर्चाने). रजिस्ट्रेशन  हे पुणे ते होली बेसिलपर्यंत ट्रान्सपोर्टचं होतं. मूल्य 400 रुपये. 


ग्रुपबरोबर जाण्याचा फायदा म्हणजे त्यांनी ठरवलेली ठिकाणं. आपल्याला काही शोधायला लागत नाही. नाश्त्याला ‘‘होली बेसिल’’, दुपारच्या जेवण्याला ‘‘गंगाधाम कॉम्प्लेक्स’’ खडकी रोडवरह्या जागा चांगल्या होत्या. हे कॉम्प्लेक्स खरोखरी मोठ्ठं होतं त्यामुळे तिथल्या पार्किंगमध्ये दिंडीतील सर्व जण व्यवस्थित बसू शकले.
सकाळी नाश्ता झाल्यावर साधारण 7:45 च्या सुमारास ज्ञानोबा माऊलींची पालखी येताना दिसली. त्याआधी दिंडीत भजनं, गाणी ह्याचा कार्यक्रम झाला.
माझ्यासमोर एकच प्रश्न होता की आळंदी ते चतु:शृंगी चालणं मी पूर्ण करू शकेन का?
कारण असं की माझे पाय फ्लॅट फूट आहेत, लांब अंतर चालायला खूप त्रास होतो.
पालखीचं दर्शन घेऊन पुढे चालायला सुरुवात केली.
सुरवातीला प्रचंड उत्साहात होतो. पाहिले 3 तास इतर वारकाऱ्यांबरोबर, दिंडीतल्या लोकांबरोबर अगदी मजेत, भरभर गेले. मग जाणवायला लागलं की हे काही वाटतं तसं सोपं नाहीये. पण त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जात राहिलो. वाटेत ठिकठिकाणी विविध लोकांनी  चहा, केळी, biscuits, चिक्की, इत्यादी गोष्टींची सोय वारकाऱ्यांसाठी केली होती. त्यामुळे आता चहा कुठे मिळेल ह्याचा प्रश्न नव्हता. बरोबर खाण्याचं सगळं घेतलं होतं, पण सॅकमधून काढून खावंसं वाटलंच नाही. इतर वारकाऱ्यांबरोबर चालताना भान राहिलाच नाही. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या चवीचे चहा मिळत गेले, ते पीत गेलो. दमायला झालं ते फक्त पालांना! मजल दरमजल करत मी 2:20 ला जेवणाच्या ठिकाणी पोचलो. 1 तास 20 मिनिट उशिरा.  साधारण 1 च्या सुमारास आम्हाला जेवण्याच्या ठिकाणी पोचायचं होतं.
पाय आता खरोखरी बोलत होते,  वेदना खूप होत होत्या पण जिद्द काही सोडली नव्हती.

पालखी नंतर डेक्कन कॉलेजकडे वळून संगमवाडीवरून जंगली महाराज रोडवर येणार होती. आम्ही डावीकडे न जाता बॉम्बे sappers च्या म्हणजे होळकर पुलावरून रेंज हिल्सच्या दिशेने जायचं ठरवलं, कारण तिथूनच आम्हाला परत येताना रिक्षा, uber, ola मिळणार होत्या. शेवटी 5:15 च्या सुमार एक रिक्षा मिळाली, जी आम्हाला चौघांना घेऊन जायला तयार नव्हती. त्यामुळे एकटाच मी त्यात बसलो. बाकीच्यांना एकाच एरिया मध्ये जायचं त्यांनी असल्याने दुसरी रिक्षा केली. रिक्षामध्ये बसल्यावर जे हुश्य झालं ते शब्दात सांगणं शक्यच नाही.

पण एवढंच सांगू शकतो की पांडुरंगाच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने मी माझा पहिल्या वारीचा प्रवास पूर्ण केला!!!
‘‘पांडुरंग पांडुरंग!’’


                          श्री नरेन साठये


1 comment:

  1. Good first experience Naren.
    Wish I do this Wari next year

    ReplyDelete