रूबरू रोशनी!


सौ. रश्मी भुरे मुंबईच्या SIES कॉलेजमध्ये मुख्यत्वे पोलिटिकल सायन्स हा विषय शिकवतात. त्यांचा एक दिवस फोन आला. आमच्या कॉलेजच्या मुलांची राळेगणसिद्धी-हिवरेबाजार’ (अहमदनगर) ट्रीप कराल का?’ मी म्हटलं, जरूर! ठरवाठरवीच्या दोन तीन मिटींग्स झाल्या. तारीख ठरली. १२ आणि १३ सप्टेंबर. ही ठिकाणं म्हणजे सिंगापूर-युरोप सारखी प्रचलित नाहीत ! त्यामुळे अशा ठिकाणी मुलांना जाण्यासाठी तयार करायचं हे तसं जिकरीचं काम. पण भुरे मॅडम मुलांहून उत्साही. त्या पोरांच्या मागे लागल्या. म्हणायला त्यांच्या अभ्यासात मॉडेल व्हिलेजम्हणून या गावांचा परामर्श घेतला जातो. पण ते सगळं पुस्तकापुरतं. आता तर (स्वतःचे पैसे देऊन) मुंबईपासून ३०० किलोमीटर प्रवास करून ही गावं बघायला जायचं, म्हणजे टू मच ! मॅडमनी धीर सोडला नाही. शेवटी हो-नाही म्हणत १३ मुलं-मुली तयार झाले. त्यात फिलोसॉफीच्या काही मुलांचीही भर पडली. सहलीच्या दिवशी फायनल नंबर पंधराझाला. १२ विद्यार्थी व तीन शिक्षक. त्यांच्यासोबत मी आणि माझा मित्र आशय महाजन.
बस सुरु झाली. शेवटी मुलंच ती. तीन चार जणांचा अपवाद सोडल्यास सर्व मुले मागच्या सीटवर जाऊन बसली. सर्वांच्या कानात हेडफोन्स, अनेकांच्या हातात आयफोन्स. जोडीला ब्ल्यू टूथ स्पीकर. मोठ्या आवाजात (आम्हाला माहित नसलेली, न कळणारी) इंग्लिश गाणी सुरु. प्रत्येक जण आपापल्या जगात हरवलेला. न्याहारीचा ब्रेक येईपर्यंत हेच चित्र. मनात आलं, आता आपल्याला पिचवर उतरायला लागेल. हे असंच पूर्ण सहलीत सुरु राहिलं तर काही खरं नाही. न्याहारी झाली. पुन्हा बस सुरु झाली. सगळ्यांना म्हटलं, एक गेम खेळूया. एका खोक्यात काही चिठ्ठ्या होत्या. त्या उघडायच्या आधी प्रत्येकाने आपलं नाव सांगायचं आणि स्वतःचं स्वप्नसांगायचं. चिट्ठी उघडायची. त्यात एक शब्द असेल. त्या शब्दाला धरून फक्त चार वाक्य बोलायची. मग त्या शब्दाशी संबंधित काही आठवण असेल तर ती सांगायची. त्यावरून एखादं गाणं आठवलं तर ते म्हणायचं. गेम सुरु झाला आणि मुलांना त्यातली मजा कळू लागली. हसणं खिदळणं,एकमेकांची टांग खेचणं सुरूच होतं. मागे बसलेले सगळे पुढे आले. (हेही नसे थोडके !) बसमध्ये कोंडाळं तयार झालं. मुलं फसफसून बोलू लागली. विशेषतः स्वतःच्या स्वप्नांविषयी बोलताना मुलं कुठेतरी अंतर्मुख झाल्यासारखी वाटली. मिथिलाला राजकारणात यायचं होतं. कार्तिकला साऊंड इंजिनियर व्हायचं होतं. आलाप आपचा समर्थक होता. दीपा आज पहिल्यांदाच घरापासून इतक्या लांबच्या ट्रीपला आली होती. मृदुलाला स्टेशनवर सोडायला तिचे बाबा आले होते. खूप मजा करून ये आणि जाशील तिथून खूप काही घेऊनये’, असं सांगणाऱ्या बाबांविषयी अभिमानाने बोलताना मृदुला हळवी झाली होती. शिक्षकांनीही आपापली स्वप्नं शेअर केली. मुलांमधलं आणि शिक्षकांमधील नातंही खूप लोभस होतं. आदराची लक्ष्मणरेषा कुठेही न ओलांडता मुलं अधूनमधून शिक्षकांचीही खिल्ली उडवत होती. पण सगळं कसं खेळीमेळीच्या वातावरणात.
राळेगणसिद्धीमध्ये पोहोचलो. जेवणाची व्यवस्था तिथल्याच एका स्थानिक हॉटेलमध्ये केलेली. काही शोबाजी नाही. नुसती टेबले टाकलेली. तिथे बसताना पोरांचे चेहरे पाहण्यासारखे झालेले. मुंबईच्या बाहेरचं ग्रामीण जीवन कधीही न अनुभवलेली विशीतली ती पोरं. त्यांच्या मूक प्रतिक्रिया स्वाभाविक पण मला सरावाच्या झालेल्या. गरम गरम जेवण आलं. साधंच जेवण पण अत्यंत मनापासून केलेलं आणि चविष्ट. जेवण झाल्यावर काही मुलं मुली स्वतःहून म्हणाली, ‘food was really awesome !’ माझा जीव भांड्यात. मग गावातले प्रकल्प बघायला बाहेर पडलो. सोबतीला शेख नावाचा एक तरुण स्मार्ट पोरगा. हा इथला अधिकृत गाईड. मी सहलीच्या निमित्ताने अनेकदा या गावात येत असतो. पण तरीही गावाबद्दल ऐकताना कंटाळा येत नाही. शेख सांगत होता.. संपूर्ण गाव रसातळाला गेलेलं. दारूच्या भट्ट्या, गुंडगिरी, बेकारी, गरिबी. किसन बाबुराव हजारे हा एकेकाळी सैन्यात काम करणारा मुलगा गावात परत आला ते एक स्वप्न घेऊनच. झालेलं असं की, किसन आर्मीतला जो ट्रक चालवत असे त्यावर शत्रूचा हल्ला झाला. सगळे सैनिक गेले पण हा वाचला. जगण्यात काही राम राहिला नाही, म्हणून आत्महत्या करायला निघाला. गाडीखाली जीव द्यायचं ठरलं. स्टेशनवर विवेकानंदांचं एक पुस्तक हाती आलं. पुस्तक चाळताना आयुष्याचं मर्म उलगडत गेलं. ट्रकमध्ये आपण एकटे जगलो यामागे काही ईश्वरी संकेत असावा. नियतीला माझ्याकडून काहीतरी घ्यायचं असावं. तो तरुण आपल्या गावात परतला. गावाला नवसंजीवनी देण्याचा निर्धार त्या तरुणाने केला. कामाला सुरुवात झाली. सुरुवातीला विरोध झाला. तरीही तो तरुण काम करत राहिला. नशाबंदी-कुऱ्हाडबंदी-चराईबंदी-नसबंदी ही शस्त्रे हातात घेऊन गावाचा कायापालट केला. आज गाव पाहायला वर्षातून लाखभर लोक येतात. त्या तरुणाला आता सगळे अण्णाम्हणतात अण्णा हजारे!

लोकपाल आंदोलनानंतर अण्णा देशभर पसरले. पूर्वी अण्णा गावात कुठेही सहज भेटायचे. आता अंगरक्षकाशिवाय फिरता येत नाही. अण्णा आमच्या मुलांना भेटले. अगदी तासभर गप्पा मारल्या मुलांशी. मुलांच्या प्रश्नांना मोकळेपणाने उत्तरे दिली. अण्णा देवळातल्या एका खोलीत राहतात. स्वतःचे घर नाही. कुटुंब नाही. बँक खाते नाही. बक्षिसे, पारितोषिके यातून मिळालेला सगळा पैसा गावाला दिलाय. त्याचा ट्रस्ट केलाय. अण्णांनी आमच्याशी बोलताना मुलांना चांगले संस्कार आणि शुद्ध चारित्र्याचे महत्व सांगितले. गावातली सेंद्रिय शेतीचे प्रयोग, नापास मुलांचे हॉस्टेल, अडीच कोटी पाण्याचा साठा असलेले शेततळे, पाणी साठवण्याच्या विविध पद्धती, राळेगणचा सचित्र इतिहास दर्शवणारे व अप्रतिम पद्धतीने उभारलेले मिडिया सेंटरहे सगळं मुलांनी जवळून अनुभवलं. कोणीही न सांगता मुलांनी तिथल्या नागरिकांशी गप्पा मारल्या. दुकानदारांशी संवाद साधला.
राळेगण मधला एक अनुभव सांगतो. आपल्या विषयाशी प्रत्यक्ष संबंध नसलेला. पण तरीही वाचल्यावर एक नवीन उमेद येईल असे वाटले म्हणून मुद्दाम शेअर करतोय. आम्ही होतो त्या दिवशी अण्णांना भेटायला इस्त्रायल देशाचे भारतीय राजदूत आले होते. त्या दोघांची आतल्या खोलीत भेट सुरु असताना राजदुतांचा एक अंगरक्षक आमच्या शेजारी येऊन बसला. टिपिकल सफारी वगैरे घातलेला. तो मराठीच होता. राज्य शासनाने नेमलेला. इकडचं तिकडचं बोलणं झाल्यावर एका माणसाने त्याला विचारलं, ‘इतक्या स्ट्रेसफुल आणि रिस्की कामाचा कंटाळा येत नाही का?’ त्या पोलिसाने जे उत्तर दिलं ते प्रत्येकाने आपापल्या कामाच्या जागी लिहून ठेवावं. कंटाळा कुठल्या कुठे निघून जाईल. तो पोलीस म्हणाला,’ हातात हळदकुंकू घेऊन पोलिसात याअसं आमंत्रण घेऊन सरकार आमच्या घरी आलं नव्हतं. पोलिसात जायचा चॉइस आमचा होता.इतकं म्हणून तो पोलीस उठला. आणि आमच्याकडे बघून प्रसन्न चेहऱ्याने म्हणाला,’नेहमी खूष राहायचं!  आम्ही सगळे अवाक ! क्या अॅटीट्युड है बॉस!
आता इथून पोहोचायचं होतं, ‘स्नेहालयमध्ये. स्नेहालय ही डॉ गिरीश कुलकर्णी यांनी सुरु केलेली नगर मधील संस्था. पिडीत मुलांसाठी काम करणारी. वेश्यांची मुलं, एचआयव्ही बाधित मुलं, अनाथ-बेवारस मुलं..यांच्यासाठी काम करते. कुलकर्णी सर मुलांशी संवाद साधणार होते. म्हणून त्यांना भेटायला स्नेहांकुरमध्ये गेलो. ही स्नेहालयचीच एक शाखा. रात्रीचे साडेनऊ वाजलेले. जेवणं व्हायची होती. पहाटे चारपासून जागी असलेली मुलं स्वाभाविकपणे दमलेली होती. भुकेलेली होती. मी कसंबसं मुलांना म्हटलं..बसमधून उतरुया. गिरीश सरांना तुमच्याशी बोलायचंय’. मुलं पोलिटिकल सायन्सची आणि गिरीश सर पोलिटिकल सायन्सचे HoD.  त्यामुळे गिरीश सरांना मुलांना भेटण्यात अधिक स्वारस्य. मला टेन्शन. मुलं नीट ऐकतील का ? गिरीश सर अप्रतिम बोलले. निघताना मुलं म्हणाली, आणखी बोलले असते तरी आम्ही आनंदाने बसलो असतो.  मुलांनी दत्तक केंद्राला भेट दिली. टाकून दिलेलीगोंडस बाळं पाहून ही मुलं गलबलून गेली. बसमध्ये चढताना एक मुलगी म्हणाली..thank you sir for giving us this opportunity…! मी बसमध्ये मुलांशी बोलायला उभा राहिलो तेव्हा रात्रीचे सव्वा दहा झाले होते. काकुळतीच्या स्वरात मी म्हटलं, ‘Sorry guys..I know you are very tired and hungry..’ मी काही बोलणार इतक्यात एक मुलगा मागून म्हणाला – ‘सर, ये सब देखनेके बाद भूख मर गयी !
ट्रीप संपवून दोन दिवसांनी मी घरी येतो. दमून बिछान्यावर अंग झोकून देतो. पण झोप येत नाही. डोळे मिटले तरी या तरुण पोरांचे चेहरे आठवत राहतात. किती पटकन जजकरतोय आपण या पिढीला ! की त्यांना संवेदनशील व्हायचा अवसरच देत नाही आपण ? स्वतःचे रॉक बँडअसलेली ही मुलं परतीच्या प्रवासात अंताक्षरी न खेळता काय काय पाहिलं, काय काय शिकलो याची उजळणी करत राहतात. दिवसभर दमून सुद्धा रात्री एक वाजेपर्यंत गप्पा मारत बसतात..आणि विषय काय? पुढचा देश कसा असेल, सध्याचे नेते, आजची मिडिया, जागतिक अर्थकारणअसं बरंच काही. स्नेहालयमध्ये एक जेवण वाढायला सातवी आठवीतली मुलगी आहे. तिला मुलांनी थँक युम्हटलं तर ती रागावली. कारण विचारल्यावर ती चिमुरडी म्हणाली, ‘आप सब लोग हम बच्चों के लिए इतना कुछ करते है..क्या हम आपके लिए इतना भी नहीं कर सकते ? इसमें थँक युकी क्या जरुरत है?’ या मुलीचा स्वाभिमान पाहून ही तरुण पोरं स्पीचलेस. विशेष म्हणजे, आपण जे पाहिलं त्यातली अमुक दोन गोष्टी आवडल्या आणि तमुक एक गोष्ट आवडली नाही, हे ते स्पष्टपणे सांगू शकतात. इमेल, फेसबुक हे आता त्यांच्यासाठी आदिम झालंय. या विशाल सोशल मिडीयाच्या एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर ही मुलं सहजी जातात. त्यांचा हा वेग थक्क करणारा आहे. ते चुका करायला घाबरत नाहीत. मग ते नाते असो वा करियर. त्यांच्या विचित्र केशरचना, बिनधास्त वेशभूषा, धेडगुजरी भाषा, बेधडक विधाने करणारी जीभ या सर्व पसाऱ्याला बाजूला सारून त्यांच्यात वाहणारा संवेदनशीलतेचा झरा शोधायचाय. तो तिथे वाहतोच आहे, अनंत काळापासून. आपल्याला तो त्यांच्यातला झरा केवळ जपायचाय नाही तर ते पाणी योग्य ठिकाणी वळवायचंय. नाहीतर त्या झऱ्याचं डबकं होईल. सोन्यासारखी तरुण पिढी हातातून निघून जाईल.
SIES कॉलेजचे उत्साही शिक्षक, राळेगणमध्ये भेटलेला पोलीस, स्नेहालय मधली ती चिमुरडी, गिरीश सरांनी दिलेला अब नही तो कब, मै नही तो कौनहा मंत्र, सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन घडवलेला हिवरेबाजारनावाचा चमत्कार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या सगळ्यावर मनापासून चिंतन करणारी ती SIES मधली तरुणाई ! सगळं सगळं डोळ्यासमोरून जातंय. प्रवासामुळे अंग दुखतंय. पण मनावरची मरगळ पार उडून गेलीय. आता काही तक्रारी उरल्या नाहीत, काही मागण्या नाहीत. सगळं अस्तित्व विलक्षण कृतज्ञतेने भरून गेलंय. आणि झोप तरी कशी लागेल? एक शुभंकर प्रकाश मनात भरून राहिलाय……रूबरू रोशनी!

                             नवीन काळे




No comments:

Post a Comment