बकेट लिस्ट

काही दिवसांपूर्वी मल्टिप्लेक्समध्ये जाऊन घरच्यांच्या आग्रहाखातर आणि "रोम मध्ये रोमनांसारखे राहावे" या उक्तीनुसार बकेट लिस्ट बघितला. उगाच खोटं कशाला बोला, पण एकेकाळी जिने हिंदी सिनेसृष्टीवर (आणि आमच्या हृदयांवर) राज्य केले, ती माधुरी मराठीत बोलते कशी, दिसते कशी, ही उत्सुकता आम्हालाही होतीच. त्यामुळे पडत्या फळाची आज्ञा मानून आम्हीपण आढेवेढे न घेता हा सिनेमा बघायला पटकन तयार झालो. सिनेमाची कथा दोन-तीन वाक्यात सांगता येईल अशी आणि एवढीच. सर्वसाधारण गृहिणी असलेल्या माधुरी 'मधू'ला हृदय प्रत्यारोपणाच्या शल्यक्रियेत (सोप्या शब्दात "हार्ट ट्रान्सप्लांटमध्ये") सई देशपांडे नावाच्या तरुणीचे हृदय दान मिळते. ही सई कोण, या उत्सुकतेपोटी शोध घेतला असता सईची बकेटलिस्ट मधूच्या हाती लागते. तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चाळिशीतली मधू विशीतल्या सईच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्याचा विडा उचलते, आणि ओघात मधूला स्वत्वाची जाणीव होते, अशी ही छोटी सिम्पल गोष्ट.

सिनेमाचे आकर्षण निश्चितच माधुरी. पण जमेच्या बाजू म्हणजे वंदना गुप्ते, इला भाटे, सुमित राघवन, दिलीप प्रभावळकर, शुभा खोटे या कसलेल्या कलाकारांचा अभिनय. वजेच्या बाजूमध्ये, अविश्वसनीय वाटेल, पण माधुरीचा अभिनय आणि तिची संवादफेक. हिंदीमध्ये ग्लॅमरस भूमिका करण्याची सवय असलेल्या माधुरीला आपण सर्वसाधारण गृहिणी आहोत हे भासवणे मुळीच जमले नाही, आणि हिंदी संवादात माहीर असलेल्या तिने मराठीत देखील संवादांतून भाव व्यक्त करायचा असतो हे लक्षात कसे ठेवले नाही, याचेच आश्चर्य. थोडा दिग्दर्शकाचा नवखेपणा जाणवला, कारण माधुरी ही मुळात दिग्दर्शकाची नायिका आहे, त्यामुळे तो संस्कार झाला की नाही माहीत नाही. संपादन (एडिटिंग) देखील थोडे ढिसाळ झालेले वाटले. पण मूळचा नागपूरकर असलेल्या दिग्दर्शक तेजस देऊसकरचे ह्या चित्रपटाबद्दल अभिनंदन.

कदाचित ही कथा सचिन कुंडलकरच्या हाती लागली असती, तर अजून मजा आली असती, असं उगाच वाटून गेलं. सचिन कुंडलकरचा 'वजनदार' बघितलाय का (नसेल तर जरूर बघा). एका अत्यंत सरळ आणि जवळपास 'बकेट लिस्ट' च्याच धर्तीच्या पिक्चरमध्ये सई ताम्हणकरकडून अप्रतिम अभिनय काढून घेतलाय त्याने, आणि संपादनात मात्र मस्त कसलंय. किंवा माधुरी ऐवजी ऊर्मिला कानिटकर किंवा सोनाली कुलकर्णी (सिनिअर) असत्या तर, असाही विचार मनाला चाटून गेला. नाही म्हणायला दोन गाण्यांत आणि त्यातही शेवटल्या गाण्यातील नृत्याच्या स्टेप्स मध्ये आमची जुनी माधुरी दिसलीच. पिटातल्या प्रेक्षकांच्या अपेक्षेने सांगायचे तर, असेच एक दोन गाणे अजून असते, तर पैसे वसूल झाले असते, असेही वाटले. दुसरे सांगायचे (किंवा कन्फेस करायचे) ते असे की, माधुरीबाई आम्ही शाळा कॉलेजमध्ये असतांना ज्याला नागपुरी भाषेत माहोल खिचणे” असे म्हणतात, त्या कॅटेगरीच्या अभिनेत्री. आणि सुमित राघवन म्हणजे जवळपास आमच्याच वयाचा आणि आमच्यातीलच वाटणारा दूरदर्शनवरील फास्टर फेणे. त्यामुळे सुमितला पिक्चरमध्ये आणि पंचवीस-तीस वर्षांनी का होईना, पण माधुरीचा नवरा होण्याचा चान्स मिळाला म्हणजे शुद्ध मराठी (अर्थात पुणेरी) भाषेत "पोराने नशीब काढलं" किंवा नागपुरी अशुद्ध हिंदी-मराठीत "पोट्टेकी बम ऐश है बावा" वाल्या भावना ! आता राहता राहिला प्रश्न, हा चित्रपट मल्टिप्लेक्समध्ये जाऊन बघण्यासारखा आहे का, तर माधुरीला मराठीत बोलताना पाहण्याची आणि ऐकण्याची इच्छा असेल आणि नवीन दिग्दर्शकाला प्रोत्साहन द्यायचे, तर जरूर बघावा. नाहीतर झी मराठी जिंदाबाद म्हणावे आणि शांतपणे वाट पहावी.
मात्र घरी आल्यावर आमच्या कुमारवयात येऊ घातलेल्या (किंवा आजकालच्या प्रथेप्रमाणे टीनएजच्या आगमनाचा वाढदिवस करतात त्या वयात आलेल्या) कन्येशी या विषयावर बोलणे झाले आणि त्यातून विचारांचा एक ओघ आला. आमच्या कन्येला म्हणजे धनश्रीला विचारले की तू त्या सईप्रमाणे बकेट लिस्ट लिहिणार का, तर सरळ हो म्हणाली. मी जरा उडालोच, कारण त्या सिनेमात बकेट लिस्ट मध्ये लिहिलेले काही आयटम्स आपल्या पोरीने टाळले तर बरे (किंवा केलं तर आम्हाला सांगू तरी नका), अश्या ढंगाचे होते (आमची चाळीशी उलटलीय आता, समझा करो). पण नक्की काय म्हणते ते तरी समजून घेऊ या म्हणून विचारले की काय लिहिणार मग ? तर कन्येनी सांगितले की सिनेमात दाखवलेल्या बकेट लिस्टमधील काही गोष्टी फक्त एकदा करण्यापुरत्या ठीक आहेत, पण त्यातून खूप काही निष्पन्न होईल किंवा खूप व्हॅल्यू एडिशन होईल, असे वाटत नाही.
आजकाल बकेट लिस्टमध्ये बऱ्याच गोष्टी सहसा कुटुंबीय किंवा समाज नावे ठेवील का, मग नक्कीच करून बघू, या धर्तीच्या असतात. किंवा आपल्याला एखादी गोष्ट करायला भीती वाटते का मग भीती घालवून करून बघू, अश्या प्रकारच्या. अर्थात त्याबद्दल आक्षेप मुळीच नाही आणि त्या गोष्टींना करणाऱ्याच्या दृष्टीने मोल नक्कीच आहे, पण ते केले, सिनेमात दाखवले त्याप्रमाणे पबमध्ये दारू पिऊन गोंधळ घातला आणि पोलीस कस्टडीत एक रात्र घालवून बकेट लिस्ट पूर्ण केली, तरी मग पुढे काय हा प्रश्न उरतोच. मग एक नवीन बकेट लिस्ट, नवी डेडलाईन, नवे थ्रिल आणि गोष्ट क्रमशः वेताळाच्या कथेप्रमाणे सुरूच. बरं, अश्या बकेट लिस्टमध्ये लहान लहान गोष्टी असतात (म्हणजे असाव्यात) ज्या पूर्ण व्हायला वेळ आणि धाडस एवढे असले तरी पुरे. पण सर्व खंड फिरून यावे किंवा युरोप पालथा घालावा असे त्यात टाकावे म्हणाल तर तेवढे पैसे जमवायला अनेक वर्षे मन मोडून मेहनत करायला जाऊ द्यावी लागणार. त्यातही काही वाईट नाही, पण ततः किम, यापलीकडे काय, हा प्रश्न आहेच.
वयाने सज्ञान झाल्यावरच्या बकेट लिस्ट तर शब्दशः पाचवीलाच पूजलेल्या. आजकाल तर मूल झाल्यानंतर पाच दिवसांची वाट पाहणे दूरच, तर त्याआधीच आईच्या पोटात असतांना पालकांनी आपले येऊ घातलेले मूल कुठे शिकणार आणि काय करणार याची यादी तयार ठेवली असते. शिक्षण झाल्यावर चांगली नोकरी, मग लग्न, घर, गाडी, परदेशप्रवास किंवा वास्तव्य, नोकरीतले प्रमोशन, त्यासाठीची धडपड आणि नसत्या उचापती, हे सर्व कुठल्याही बकेट लिस्टच्या मुस्काटात मारेल आणि अख्ख आयुष्य वाया घालवेल, अश्या लिस्टा आहेत. ततः किम इथेही आहेच (आद्य शंकराचार्यांनी हा प्रश्न उगाच नाही विचारला). ह्या बकेट लिस्ट पूर्ण केल्यावर एक रात्र समाधानाची झोप लागणार, इतर रात्रींचे काय?
तर अश्या भौतिक प्रगतीच्या गोष्टी होण्यासाठी योग्य प्रयत्न करणे ठीक पण बकेट लिस्ट मध्ये त्यांना टाकून आयुष्य अस्वस्थतेत घालवणे ठीक नाही. बरं मग अजून काय असावे बकेट लिस्टमध्ये? स्वयं अनुशासनाच्या गोष्टी का नसाव्यात? सिग्नल पाळणे का नसावे बकेट लिस्ट मध्ये ? कचरा न करणे व कचरा दिसल्यास स्वच्छ करणे का नसावे? सामाजिक ठिकाणीही पंखे, दिवे बरोबर बंद करणे का नसावे? इतरांच्या आयुष्यात आनंद देणाऱ्या गोष्टी कराव्या, हे का नसावे? आमटे कुटुंबीय किंवा डॉ बंग पती-पत्नी, ह्यांनी त्यांच्या बकेट लिस्ट साठी त्यांचे आयुष्य वेचले, ते फार मोठे आहेत, आपल्याला तसं काही झेपणार नाही. पण महिन्यातून एकदा अनाथालयाला भेट देणे किंवा त्यांत शिकवणे का जमणार नाही? वृद्धाश्रमाला भेट देणे आणि तिथे गप्पा मारणे? श्रमदान का करू नये? अश्या गोष्टींचीही बकेट लिस्ट असू शकते हे कोण शिकवणार आम्हाला? पण खरंच हे शिकवावं लागतं का हो?

ह्या गोष्टींची जर आम्ही बकेट लिस्ट बनवली, तर त्यात थ्रिल किती ते माहीत नाही, पण समाधान मात्र जरूर आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःसोबत वेळ घालवणे आणि स्वतःला ओळखणे. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात वाचनाचा छंद असेलेलेही किती पुस्तके वाचतात? किती लोक आपला गाण्याचा छंद जोपासतात? वेळ नाही मान्य, पण आठवड्यातून एक-दोनदा का काढू नये वेळ? सकाळी उठून जॉगिंग, व्यायाम किंवा योग का करू नये? आणि या गोष्टी करत नाही आहोत तर बकेट-लिस्ट मध्ये का टाकू नये, म्हणजे त्या गोष्टी होतील ? स्वतःला ओळखणे म्हणजे "मी कोण" या प्रश्नाच्या उत्तरात कितीतरी जन्मही अपुरे पडतील, पण हा प्रश्न बकेट लिस्ट मध्ये टाकता येईल का? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे खरंच माहीत नाहीत (आणि मीदेखील हे सर्व केलेले नाही), पण हे सर्व शक्य आहे असे वाटते. अश्या बकेट लिस्ट सर्वांनी वागवल्या तर किती पूर्ण होतील त्याची कल्पना नाही, पण तणाव, नैराश्य ह्या गोष्टी दूर होऊन आजचा मानसोपचार तज्ज्ञांकडे भरीस आलेला पूर ओसरेल, आणि आपलेच आयुष्य आपल्याला आनंदी वाटेल एवढे तर नक्कीच. मग करायची का अशी बकेट लिस्ट?

रवींद्र केसकर


3 comments:

  1. Professional writing - look forward to more of such articles. Well done, Ravindra.

    ReplyDelete
  2. उत्तम लेखन प्रा. केसकर !! अजून येऊ द्या

    ReplyDelete