१३ जुलै २०१८ ला माझी आई शालिनी हे जग सोडून गेली. त्याला या १३ जुलैला एक वर्ष होईल. त्या निमित्ताने मी लिहिलेल्या तिच्या आठवणी सोबत पाठवीत आहे. या आठवणी जरी व्यक्तिगत असल्या तरीही ज्या कुणीही आपली आई किंवा वडील गमाविलें आहेत, त्याला नक्कीच या आठवणी मनाला भिडून जातील!
तिचा शेवटचा बराच काळ बंगलोर ला गेला व तिने मित्रमंडळ स्मरणिकेत बरेच लेखन केले होते. तिची तीन पुस्तके पण प्रकाशित झाली होती.
********************************************************************
आई (कै. शलिनी चिंचवडकर) |
कै. शालिनी
चिंचवडकर
जन्म
- ११/०१/१९३७ अकोला मृत्यू - १३/०७/२०१८ बंगलोर
शिक्षण -
बि.ए.बी.एड.
नोकरी - परतवाडा
(जि. अमरावती) येथील मुनिसिपल हायस्कूल सेवानिवृत्त शिक्षिका
प्रकाशित
पुस्तके -
१) मायाबाजार (काव्यसंग्रह) प्रपंच प्रकाशन, पुणे
(प्रस्तावना - राम शेवाळकर)
२) अक्षरवेल
(काव्यसंग्रह) प्रपंच प्रकाशन, पुणे (प्रस्तावना - विजया जहागीरदार)
३) शून्यातून विश्व (कथासंग्रह) स्नेहवर्धन प्रकाशन,
पुणे (प्रस्तावना - शैलजा काळे)
प्रकाशित
साहित्य -
१) ललना, माहेर, गृहलक्ष्मी, सासरमाहेर,वसंत, गंधाली,
सा. सकाळ ई. अनेक मासिके आणि दिवाळी अंकातून विविध लेखन
२) महाराष्ट्र मंडळ बंगलोर तर्फे प्रकाशित स.न.वि.वि.
मध्ये अनेक रचना प्रसिध्द
३) अनेक एकांकिका आणि नाटिका
पुरस्कार
-
१) ना. घ.
देशपांडे काव्यस्पर्धा मेहकर, द्वितीय पुरस्कार
२) महाराष्ट्र
मंडळ बंगलोर , तृतीय पुरस्कार
३) पत्रकार संघ अंजनगाव, द्वितीय पुरस्कार
४) अनेक प्रशस्ती पत्रके प्राप्त
इतर उल्लेखनीय
-
१) आकाशवाणी नागपूर च्या वनिताविश्व कार्यक्रमात काव्यवाचन
२) अमरावती जिल्हा साहित्य समेलनात काव्यवाचन आणि कथाकथन
३) विदर्भ साहित्य संमेलन, परतवाडा मध्ये सहभाग
४) बंगलोर येथील ज्येष्ठ नागरिक सन्घ आणि इतर ठिकाणी
कथाकथन
५) मा. सुरेश भट यांच्या प्रेरणेने गजल लेखन
********************************************************************
"भैय्या,
भैय्या," एकदम केविलवाण्या हाका ऐकू आल्या आणि मी झोपेतून खडबडून जागा झालो. घड्याळात
बघितले तर रात्रीचा दीड वाजला होता.
लगबगीने
आईच्या खोलीकडे गेलो आणि लाईट लावला. पण तिथे कुणीच नव्हते. तिची रिकामी कॉट माझ्याकडे
टक्कपणे बघत होती. मला एकदम भरून आलं. म्हणजे हा भासच होता तर!
गेल्या
काही दिवसांपासून हा प्रसंग अनेकदा घडला होता. पण त्या वेळी फरक एवढाच होता की आई होती. तिने आवाज दिला की मी खडबडून जागा व्हायचो, तिच्या
खोलीकडे लगबगीने जायचो. मंद दिव्याच्या उजेडात तिचा कृश देह दिसतही नसायचा, पण ती मला
हाक निश्चितच देत होती. तिला विचारले की काय
पाहिजे, काय झालंय, तर कधीतरी ती उत्तर द्यायची, पण बहुतेक वेळा नुसतीच बघत राहायची.
मग मी तिचा हात हातात घेऊन काही मिनिटे तिथे थांबायचो. तो स्पर्श तिला कदाचित आश्वासक
वाटायचा. मग ती काही वेळाने झोपी जायची.
शेवटचे काही महिने आईसाठी फारच वाईट गेलेत. पॅरॅलिसिसच्या
पहिल्या आघातातून ती बऱ्यापैकी सावरली होती. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आशावादाच्या जोरावर
तिने पहिला आघात सहन केला. त्या आघातानंतरही तिचा तल्लख मेंदू शाबूत राहिला. तिचा फिजिओथेरपिस्ट
तिला अनेक प्रश्न विचारायचा, तिची गम्मत करायचा, पण ती त्याला समर्पक उत्तरे द्यायची.
तिची विनोदबुद्धी शाबूत होती. पण त्या आघातात तिचा उजवा हात कमजोर झाला होता, त्यामुळे
ती लिहू किंवा वाचू शकत नव्हती. गेली अनेक वर्षे ती खरं तर वाचन आणि लेखनामुळेच जिवंत
होती. बाहेर जाणे तर कधीचेच बंद झाले होते, पण तिचे लेखन अखंड सुरूच होते. ती खूप उच्च
दर्जाचे लेखन करायची असेही नाही, पण ती स्वतःच्या खडतर आयुष्यातील अनुभवावरून आणि आजूबाजूच्या
लोकांच्या आयुष्यातील प्रसंगांवरून कथा/कविता लिहायची. साहित्य प्रकाशित झाले की तिला
खूप आनंद व्हायचा. मी ऑफिसमधून घरी आलो की ती माझी वाटच पाहत असायची. लगेच मला सांगायची
आणि मासिक वाचायला द्यायची. साहित्यामुळे तिच्या आयुष्यातील शेवटचा काळ बराचसा सुसह्य
झाला.
पहिल्या
आघातानंतर ती हळूहळू वॉकरच्या मदतीने चालू पण लागली होती, पण तिला सतत मदत लागे. त्यामुळे
आम्ही एक बाईपण कामासाठी ठेवली होती. ती बाई म्हणजेच अम्मा पुढे तिच्या आयुष्यातील
एक अविभाज्य अंगच बनली. ती अम्माची अगदी आतुरतेने वाट बघायची आणि तिला यायला थोडा जरी
वेळ झालातरी आम्हाला तिला फोन करायला सांगायची.
पण
दुर्दैवाने तिला जानेवारीमध्ये दुसरा अटॅक आला आणि तो तिला पार लोळागोळाच करून गेला.
तिचे शेवटचे काही महिने मग बेडवरच गेलेत.
आंघोळीला
नेणे किंवा डॉक्टरकडे नेणेपण फार कठीण होऊन गेले. पण माझी पत्नी नंदा आणि अम्माने तिची
खूपच काळजी घेतली. तिला अगदी जेवण भरवण्यापासून तिची सेवा केली. तिच्या बोलण्यावरही
परिणाम झाला होता. बोलायला थोडा त्रास व्हायचा. पण ती बोलायची, आलेल्या सगळ्यांना ओळखायची.
पण हळूहळू मेंदूवरील ताबा कमी कमी होत होता.
तशातच
मला जूनच्या सुरुवातीला ऑफिसच्या कामाने लंडनला जावे लागले. खरेतर तिला या अवस्थेत
सोडून जाण्याची माझी इच्छा नव्हती, पण जाणे भागच होते. हिंमत करून तिला विचारले की
जाऊ का? खरंतर तिचीही इच्छाच नव्हती, पण सगळी परिस्थिती सांगितल्यावर ती तयार झाली,
पण लवकर ये असं म्हणाली. २ जूनला अगदी पहाटेच
मी घरून निघालो. आई झोपली होती म्हणून तिला उठवले नाही, तिचा निरोप मी रात्रीच घेतला
होता. आता वाटते की तिला उठवले असते तर बरे झाले असते, शेवटची भेट झाली असती.
लंडनहूनही
मी अगदी नियमाने रोजच सकाळी घरी फोन करत असे.
फोनवरून पत्नीला आईच्या प्रकृतीबद्दल विचारायचो. ती मला सगळे सविस्तर सांगायची,
कधीकधी व्हिडीओ कॉल लावून दाखवायची. पण बहुतेक वेळा आई झोपलेलीच असे, कधीतरी माझ्याकडे
बघायची. एकदा ती व्हीलचेअर वर बसलेली मला दिसली, त्या वेळी माझ्याकडे बघून हसली आणि
मला म्हणाली की लवकर ये. मला वाटते तिच्याशी झालेले ते माझे शेवटचेच बोलणे असेल.
पत्नी
मला नियमितपणे माहिती द्यायची, त्यावरून आईची परिस्थिती काही चांगली नव्हतीच. हळूहळू
तब्येत खराबच होत होती. जास्तीतजास्त वेळ ती झोपूनच राहायची, बोलणे पण जवळजवळ बंदच
झाले होते. आयुष्यभर सतत उत्साहाने बोलत राहणाऱ्या आईला असे पाहणे म्हणजे खूपच वेदनादायक
होते. तिचा शेवटचा प्रवास सुरू झाला आहे हे सगळ्यांनाच कळत होते.
मी
तिला भेटायला जायचे नियोजन करीतच होतो. तसेच तिच्या डॉक्टरांच्या मी सतत संपर्कात होतो.
असे वाटत होते की ती अजून काही दिवस तरी काढेल, पण तसे व्हायचे नव्हते. एक दिवस सकाळी चार वाजताच माझा मोबाईल खणाणला. बातमी चांगली नव्हती. आईला श्वास घ्यायला त्रास
होत होता. तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. सुदैवाने लहान भाऊ आदल्या दिवशीच
तिथे पोहोचला होता, त्यामुळे तो हजर होता. तिला यापूर्वीही अनेकदा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट
केले होते आणि प्रत्येक वेळी ती सुखरूप परत आली होती. त्यामुळे कुठेतरी मनात आशा होती
की ती यातून परत येईल. पण तो दिवस वेगळा होता,
त्या दिवशी आई घरून गेली ती परत आलीच नाही. तो दिवस तिच्या आयुष्यातील शेवटचा दिवस
ठरला. बातमी कळल्याबरोबर मी निघायची तयारी केली. डोळ्यात सतत पाणी येत होते आणि आईची
अनेक रूपे डोळ्यासमोर येत होती.
लहानपणापासून
आई म्हणजे आम्हा भावंडांचे सर्वस्वच होती. तिने आमच्यावर अपार माया केली. कुठलाही प्रसंग
असो, आई आमच्या बरोबर हजर असे. कुठलेही संकट येवो, आई आमच्या मदतीला धावून येई. ती
अनेक वर्षे माझ्यासोबतच राहिली आणि मी पण तिच्या प्रत्येक आजारपणात तिच्या सोबत होतो.
पण आता वाईट याचेच वाटते की तिच्या आयुष्यातील शेवटच्या, सगळ्यात मोठ्या जीवनमरणाचा
लढ्यात मात्र मी तिच्या सोबत नव्हतो.
या
जगात आलेल्या प्रत्येकी व्यक्तीला एक दिवस जावेच लागते, हे सगळे ठीक असले तरी असे वाटते
की ती जायच्या आधी, एकदातरी तिची भेट झाली असती तर फार बरे झाले असते. तिचा प्रेमळ
हात पाठीवरून फिरला असता, तिच्या चेहऱ्यावर भेटीचे समाधान पाहिले असते तर मग आयुष्यात
कायमची रुखरुख राहिली नसती. पण ती न बोलता,
न भेटताच, अगदी चटका लावून निघून गेली. अगदी कायमचीच! तिच्याजवळ थांबायला वेळ नव्हता. पण माणसाला हे कळले
असते तर मग अजून काय हवे होते?
तिला
विसरणे तर शक्यच नाही! आयुष्यातील प्रत्येक क्षणी, प्रत्येक प्रसंगी आईची आठवण येईल
यात शंकाच नाही! आता तिचा तो प्रेमळ फोटोच नेहमी सोबत करीत राहील. तिच्या डोळ्यातले
ते प्रेमळ, आश्वासक भाव सांगत राहतील की काळजी करू नकोस! माझे आशीर्वाद नेहमीच तुम्हा
सगळ्यांसोबत आहेत!
खरेतर
ती आहे ही गोष्ट आम्ही गृहीतच धरली होती! आणि असे वाटत होते की ती नेहमीच आमच्या सोबत
राहील. पण आता कळतेय की आपण कुठल्याही व्यक्तीला किंवा काळाला गृहीत धरायला नको. गेलेला
काळ किंवा व्यक्ती पुन्हा कधीच परत येत नाहीत.
शेवटी
काळापुढे आपण किती हतबल असतो याची जाणीव होते आणि किशोरचे खालील गाणे किती खरे वाटू
लागते -
जिंदगीके
सफरमे गुजर जाते हैं जो मकाम
वो
फिर नही आते, वो फिर नही आते!
उम्रभर
चाहे कोई पुकारा करे उनका नाम
वो
फिर नही आते, वो फिर नही आते...
No comments:
Post a Comment