जाने कहाँ गये वो दिन

 

वेळ रात्री नऊ साडेनऊची. घराघरांमधल्या हॉलमधे टीव्ही मालिकांचे घाणे टाकत असतो. बथ्थड डोक्याच्या मठ्ठ मराठी मालिका.. कपिल शर्माचा कॉमेडी शो, हवा येऊ द्या.. असं काही तरी चाललेलं असतं. माणसं बायकांचं, बायका माणसांचं सोंग घेऊन प्रेक्षकांचं मन रमवण्याचा प्रयत्न करत असतात. ढॅन ढॅन करत जाहिराती अंगावर येऊन कोसळत असतात. त्या सगळ्या गचक्यात जेवणं उरकणं चालू असतं. कोणी एकीकडे मोबाईलमधे डोकं खूपसून दूर कोणाशी तरी चॅट करत असतं. त्या नादात ताटात काय चाटतोय त्याचं भान नसतं. हे झालं आताच्या काळातलं चित्र.



साधारण पन्नासएक वर्षांपूर्वी मध्यमवर्गीय घरांमधे रात्रीचं चित्र कसं असायचं बरं?

सुट्टीत, उन्हाळ्यात किंवा असंच कोणी टूम काढली की तिन्हीसांजेला मुलांची अंगत पंगत व्हायची. आपापल्या घरून ताटं घेऊन मुलं कोणाच्या तरी अंगणात किंवा गच्चीत जमायची. हसत खेळत पाखरांची पंगत उठायची. कधी जेवणानंतर लगेच मामाचं पत्र सुरू व्हायचं. नदी की पहाड... डबा ऐसपैस.. अरिंग मिरिंग लोंगा तिरिंग...गाई गोपी उतरला राजा... भोज्जा...नऊ साडेनऊ म्हणजे तर झोपायची वेळ असायची त्यावेळी.. आठ-साडेआठलाच अंथरूणं टाकणे नावाचा कार्यक्रम सुरू व्हायचा.

गाद्या घालून झाल्या की मच्छरदाण्या लावणे. पण त्या आधी मुलांच्या कोलांटउड्या व्हायच्या. हा कार्यक्रम साधारणपणे कोणी मोठ्या माणसाने डरकाळी वजा इशारा देईपर्यंत चाले. मग मच्छरदाणी प्रकरण सुरू होई.  मच्छरदाण्यांची ठराविक दोरी ठराविक खिळ्यांनाच बांधावी लागायची. त्यामुळे ज्याचं काम त्यालाच करावं लागायचं. असं कोणीही आलं आणि मच्छरदाणी बांधली असा मामला नसायचा. मच्छरदाणी बांधली की आपलं सगळं सामानसुमान घेऊन मच्छरदाणीत शिरावं लागायचं. मग सारखं आत बाहेर करता यायचं नाही. कारण मग डास आत घुसायचे. तरी झोपण्यापूर्वी एखादा डास शिरलेलाच असायचा. मग प्रत्येक जण आपापल्या मच्छरदाणीत रांगत टाळ्या पिटतोय असं दृष्य दिसायचं.

पण रात्रीची खरी मजा तर उन्हाळ्यात असायची.. गच्चीवर झोपण्याची. रोडच्या कडेला असलेल्या ओट्यावर पण बिनधास्तपणे झोपायचे लोक. अंगणातही झोपायचे. पण गच्चीवरचा मामला काही औरच. बऱ्याचदा माळवदाची घरे असत. जिना वगैरे असेलच असंही नसायचं. एखादी मोडकीशी शिडी असायची. मोठाली पोरं अंथरूणं वर न्यायची. बारकाली पोरं त्यांना मदत करायची. मोठी माणसं .. महिला वर्ग खालचं कडीकुलपं बघून शेवटाला येत. तोपर्यंत वर अंथरूणं पडलेली असत. कधी पोरं संध्याकाळीच अंथरूणं घालून ठेवत. रात्रीपर्यंत ती गार पडलेली असत.

ट्रांझिस्टर्स तेव्हा नविनच आलेले होते. मग ठराविक स्टेशनं लावली जात. विविध भारतीवर, सिलोनवर जुण्या गाण्यांचा कार्यक्रम ,भुले बिसरे गीत, बेला के फूल वगैरेअसायचे.. रफीचा मधाळ आवाज, 'खोया खोया चांद' म्हणत आकाशातल्या चांदला थबकायला भाग पाडायचा. किशोर... सुधा मल्होत्रा, 'कश्ती का खामोश सफर' घडवायचे. त्या काळच्या निवेदकांच्या आवाजातही वेगळाच खानदानी ठहराव असायचा..शब्दांची लडिवाळ नाजूक बोटं जणू  झोपेची जादू करताहेत असे त्यांचे निवेदन असायचे.  वातावरणातल्या शांततेचा लहेजा सांभाळून त्यांचं ऩिवेदन चालायचं.. गाणी ऐकता ऐकता कधी निद्रादेवी कवळायची कळायचं पण नाही.

आता रफी, रेडीओ, खोया खोया चांद.. कश्ती का खामोश सफर.. सगळंच खामोशीच्या पडद्याआड गेलं. गच्चीवर झोपणं, अंथरूणं घालणं, तांब्या भांडं, ओडोमॉस घेऊन...  ट्रांझिस्टर घेऊन वर जाणं, आकाशाकडे बघत पूरवैया अनुभवत  रेडिओ ऐकणं, व्याधाचं नक्षत्र शोधणं.. चंद्राच्या डागांमधे ससा-हरीण शोधणं... सगळं वेडगळपणाचं वाटावं इतकं विज्ञानाने लोकांना शहाणं करून सोडलं आहे.

नवनविन शोधांनी माणसाची आयुष्याची लांबी वाढली पण त्यातली खोली हरवली.  लोकसंख्या भरभर वाढली. अंगण तेवढंच राहिले आणि त्याचे हकदार वाढले.    ऐंशीच्या दशकात आधी टीव्ही ने माणसं गिळली. नंतर मोबाईलने.  दोघांनी मिळून मुलांचं तर बालपणच खाऊन टाकलं. सुरूवातीली टीव्हीचा एकच चॅनल होता. तोही संध्याकाळी पाचला सुरू व्हायचा, पण आख्खा वाडा, बिल्डींग त्याच्यासमोर एकवटायची. तल्लीन व्हायची. आता शेकडो चॅनल्स आले, तरीही मन रमत नाही. रिमोट घेऊन, 'घे पुढं.. घे मागं'..असं तासभर करावं तरी दर्जेदार म्हणावं असं काही सापडत नाही. सज्जन लोकांऐवजी दुर्जन पात्रांची चलती आली. परोपकारी लोकांना कोणी विचारेनासं झालं आणि ज्याच्या अंगी जास्त उपद्रव मूल्य, त्याला दहशतीपोटी का होईना .. जास्त मान, अशी वेळ आली...सगळ्यांमधे एकप्रकारचं चिबावलेपण आलं. जुन्या शांत जगरहाटीचा ठहराव सगळा वाहून गेला.



चटणी भाकरी जाऊन पिझ्झा पास्ता आला. घरी आया बायांनी निगुतीनं केलेल्या शेवया गेल्या आणि 'टू मिनिट नुडल्स' आल्या. दिवाळी दसऱ्याला घर माणसांनी भरायचं. आता प्रत्येकाला नियतीने वेगवेगळ्या खुंटीवर टांगून टाकलं.  पैसा खूप आला पण सुख-समाधान मात्र हरवलं. जाहिरातींनी माणसं हावरट बनवली. शोभेच्या वस्तू... सामानाने घरं भरली..पण कोठीची खोली रिकामी झाली. स्पर्धा, अहंकार ह्यांनी माणुसकी.. जगण्यातला आनंद हिरावून घेतला. चंद्राला भाऊ मानणाऱ्या बायका आणि चंद्राला मामा म्हणणारी पोरं हळू हळू नामशेष झाली. त्याच चंद्रावर आता प्लॉट्सची विक्रीपण सुरू झाली.

काळाने सगळ्यांमधली हळवी नाती पुसून टाकली. आणि निव्वळ चौकस चिकित्सक पिढी जन्माला आली. मार्कांच्या शर्यतीत माहितीचा पूर आला..  ज्ञान मात्र कुठे तरी तोंड लपवून बसलं. पैसे कमवायला शिकवणारे कारखाने उभे राहिले, पण जगणं शिकवणारं कोणी राहिलं नाही..    यंत्रयुगाने माणसाचा वेळ वाचेल अशी यंत्रे तर दिली पण जगण्यातली फुरसतच हरवून गेली..

अशा वेळी आपसूकच मनात येतं..    दिल ढुंढता.. है.. फिर  वही... फुरसतके रातदिन...


नीलिमा क्षत्रिय




No comments:

Post a Comment