थांबणं

 


अर्पिचा फोन आला सकाळीच...नऊ साडे नऊ म्हणजे यावेळी तिची अगदी लगीनघाई उडालेली असते. मी जरा आश्चर्यांनेच फोन घेतला...काय बाई? आज काय दांडी मारलीस की काय काँलेजला? की लेक्चर्स उशीरा आहेत? इतक्या सकाळी फोन केलास म्हणून विचारलं ग!

अग हो..हो..मी रिझाईन केलंय.. दोन महिने झाले..अजुन पाच सहा वर्षे होती. पण स्वेच्छानिवृत्ती घेतली. हल्ली बरेचदा वाटत होतं...योग्य वेळी योग्य ठिकाणी उभं राहून सारी संसार कर्तव्ये पार पाडली. घरापासून बँकेपर्यंत आणि मुलांपासून घरातल्या वृद्धांपर्यंत अर्थिक, शारीरिक, मानसिक ताकद पुरवण्यासाठी उभीच राहीले. मात्र आता ठरवलंय थांबायचं...हो, थांबायचंय मला. शेवटी कशामागे आणि किती धावायचं हे जर मीच ठरवलेलं होतं, तर कुठं थांबायला हवंय हे ही मला समजायलाच हवं..हो ना?

मला गाणं शिकायचंय..मी क्लास जाँईन करतेय तो. पेंटीग पण माझं अर्धवट राहून गेलंय. त्या रंगरेषेत ही आता थोडं रमायचंय. फार काही मोठी कलाकार म्हणुन मला नाही मिरवायचं ग, पण माझ्यासाठी मला हे सगळं करायचंय.

आणि केलं तर हे सगळं आताच.त्यासाठी मी काही सोडलंय ही जाणीव ओली आहे तोवरच नव्या स्वप्नांचा पाठपुरावा करायला हुरुप येईल. आपला आतला आवाज आपल्यालाच ऐकायला हवाय. बाहेरुन येऊन कोणी दस्तक देत नसतं ग!...

खरंच कुठे थांबायचं हे कळायला हवंय माणसाला. कुणीतरी येऊन थांबवण्याआधी कळायला हवंय. आजपर्यंत काय केलंय यापेक्षा काय करायचं राहीलं आहे असा विचार केला की राहुन गेलेल्या गोष्टींची भलीमोठी यादी पुढ्यात येऊन बसते. केलेल्या कर्तव्यकर्मातून समाधान घेत, राहुन गेलेल्या गोष्टींचा आनंद घेणं मग उमेदीनं होतं. कसल्याही ओझ्याशिवाय टिपलेले हे क्षण म्हणजे माणसाच्या सकारात्मक जीवनाची गुरुकिल्लीच जणू!



शेजारच्या काकूंनी पण सून घरात आल्यानंतर वर्ष दोन वर्षात संसारातली निवृत्ती घोषित केली. स्वतःला जबाबदारीतून मुक्त केलं आणि सुनेला संसाराची जबाबदारी स्विकारण्यास तू आता योग्य आहेस हा विश्वास ही दिला. जगण्यातल्या इतर अंगांना स्पर्श करायचा असेल, अनुभवाच्या कक्षा रुंदावयाच्या असतील तर  थांबणं, उसंत घेणं आवश्यकच आहे. 'मी'आहे म्हणून इथं काहीच घडत नाही. तिथलं आपलं योगदान संपलं की नव्या इच्छा, नव्या स्वप्नांना डोळ्यात घेतलं पाहीजे, तरच जगणं प्रवाही होईल.

प्रवाही आणि डबकं यातला फरक समजण्या इतकं शहाणपण जवळ असेल, तर जगणं अधिक सुंदर होईल. आनंद माझ्याकडे येणार नाही, मला आनंदाकडे वेळ काढुन जायला हवं. स्वतःला आणि मिळणाऱ्या आनंदालाही मला सन्मानित करायला हवं...हे तेंव्हाच होईल जेंव्हा सुरवात आणि थांबण्याची योग्य वेळ साधली जाईल.

सौ विदुला जोगळेकर



No comments:

Post a Comment