आई-गॉर्की-पुस्तक परिक्षण



मध्यंतरी रशियन भाषेतून मराठीत भाषांतरित झालेली एक कादंबरी वाचनात आली. ‘विठ्ठल हडप’ यांची ‘आई ही कादंबरी. ‘मॅक्सिम गॉर्की’ यांच्या ‘मदरया मूळ रशियन कादंबरीवरून अनुवादित झालेली.

रशियन ललित साहित्याविषयी असे वाचनात आले आहे की ते एकूणच वास्तववादी असते. कथानक काल्पनिक असू शकते पण कथेतील शब्द समर्थनीय असावेत असा तिथे कटाक्ष असतो.रशिया मध्ये टॅालस्टॅाय, पुष्किन, ऐतमातव, मॅक्सिम गॉर्की असे अनेक नामवंत लेखक होऊन गेले. कादंबरी क्षेत्रात ‘मदर ला अक्षय्य स्थान आहे. गॉर्की यांचे खरे नाव ‘अलेक्सेई माक्सिमोविच पेश्कोव्ह’. लहानपणातच पोरके झालेले गॉर्की कष्टाची कामे करत रशियाभर हिंडले. तिथेच त्यांना श्रमिकांच्या दुःखाचा जवळून परिचय झाला. १८९२ ला वृत्तपत्रात काम करत असताना त्यांनी ‘गॉर्की’ हे टोपणनाव घेतले. गॉर्की चा अर्थ कडवट अथवा कडू. १८९८ ला लिहिलेले ‘निबंध व गोष्टी या पुस्तकाने ते प्रसिद्ध लेखक बनले. ‘समाजवादी सत्यवाद किंवा वास्तववाद हे त्यांच्यामुळे साहित्यिकांचे वाड्ग्मय़ीन तत्वज्ञान होऊन बसले.

'मदर'ची अनेक भाषांत भाषांतरे झाली. ‘विभावरी’,‘वादळ’ या सारख्या कादंबऱ्या, ‘झाशीची राणी आणि सत्तावन सालच्या बंडाचे ऐतिहासिक कार्य’ असे चरित्र प्रबंध अशी अनेक पुस्तके लिहिणारे विठ्ठल हडप यांनी १९४१ साली 'मदर' चे रुपांतर केले ‘आई मध्ये. आई हा विषय सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा. परंतु,मराठीत ‘आई असे भाषांतर होण्यामागे राजकीय, सामाजिक कारणे व प्रेरणा होत्या असे हडप यांनी म्हटले आहे.
रशियात राज्यक्रांती होऊन तेथे लोकराज्य स्थापन होण्यापूर्वी झार बादशहाचे राज्य होते.  हृदयशून्य, रक्ताने बरबटलेले, जाचक अशा राज्याचे भीषण पण सत्य चित्रण या कादंबरीत पहायला मिळते. क्रांतीच्या अर्थात स्वातंत्र्यप्राप्तीच्या तयारीसाठी सर्व जनता कशी असंख्य हालअपेष्टा भोगत प्रयत्नशील राहते ते दिसते. समाजवादी चळवळीत गरीब, लहान-थोर, बुद्धीजीवी मध्यम वर्ग, शेतकरी, सुखवस्तु, वरच्या वर्गातील स्त्रिया अशी सर्वजण एकत्र लढताना दिसून येतात. अन्ना किरिलोवना व तिचा मुलगा प्योत्र झलोमोव ह्या खऱ्या जीवनातल्या व्यक्तिरेखांना नजरेसमोर ठेवून रशियन क्रांतीच्या पार्श्वभूमीवर १९०७ साली गॉर्की यांनी ही कादंबरी लिहिली. गॉर्की स्वतः चळवळीचे सदस्य होते. कादंबरीत मात्र त्यांनी त्यांची नावे बदलली.
गळ्यात बांधल्या गेलेल्या दारुड्या नवऱ्याकडून रोज रोज मार खाणारी कादंबरीची नायिका मरण येत नाही म्हणून जिवंत राहिलेली असते. नवरा मेल्यावर, तिचा मुलगा वडिलांच्या पावलावर पाऊल टाकतो न टाकतो तोच सुधारतो. सत्य आणि स्वातंत्र्य यांचा पाईक बनतो. साध्यासुध्या, भीतीने दडपून गेलेल्या, अशिक्षित अशा स्त्रीचे रुपांतर एका साक्षर, निर्भय, जाणीवेच्या कक्षा रुंदावलेल्या अशा स्त्रीमध्ये झालेले या पुस्तकात दिसून येते.

तिचा मुलगा स्वतःला समाजवादी चळवळीत झोकून देतो. घरी बैठका घेवू लागतो. वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील लोक, त्यांची संभाषणे यामुळे तिच्या कानावर नवनवीन विचार-शब्द पडत असतात. पुस्तकामध्ये एक छान वाक्य आहे– “कार्यकारणभावाने स्वतःला प्रकाशित करून घेतले तरच आजूबाजूला पसरलेल्या काळोखात लोक आपल्याला पाहू शकतील.” या अशा विचारांनी आईला धीर येऊ लागतो. ती धीट बनू लागते. वाचायला शिकण्याची उर्मी तिच्यामध्ये येते.

क्रांतिकारकांनी लग्न करायचे म्हणजे दोघांनाही गैरसोय आणि ज्या कार्याला त्यांनी वाहून घेतलेले असते त्या कार्याचीही गैरसोय अशा विचारसरणीच्या मुलाचा, या आईला एकीकडे अभिमान वाटत असतो तर एकीकडे तिच्या स्त्री सुलभ मनाला वाईटही वाटत असते. मुलगा तुरुंगात गेल्यावर कारखान्यात गुप्तपणे पत्रके पोचवण्याची जबाबदारी ती शिताफीने झेलते.  शहरातल्या पेपरच्या कार्यालयात चिठ्या पोहोचविण्याचे काम असो, किंवा दुसऱ्या गावात पुस्तके पोहोचविण्याचे काम असो, पोलिसांना चुकवत ती चळवळीला आपला हातभार लावत असते. आणि एके दिवशी आपल्या मुलाचा न्यायालयातल्या तेजस्वी भाषणाचा संदेश लोकांना देता देता स्वतः कैदही होऊन जाते. त्यावेळचे तिचे भाषण पुस्तकात फारच परिणामकारकरित्या लिहिले आहे.

पुस्तक खरेच वाचनीय आहे. रशियन टीकाकारांनी या पुस्तकाचा गौरव केला आहे. परंतु, त्यांना जो दोष आढळला तो म्हणजे, लेखन परिणामकारक करण्याचा गॉर्कीनी जो जाणीवपूर्वक प्रयत्न केला त्याच्यामुळे भावविवशता निर्माण झाली. कलात्मकतेशी एकजीव न होणारे भाष्य निर्माण झाले, जे त्यांना खटकले. भाषांतरात भाषेवरची पकड, भाषेचा योग्य वापर याला महत्त्व असते. विठ्ठल हडप यांनी पुस्तकभर जो आईचा प्रवास दाखविला आहे ना तो खरेच सहज वाटतो. सूक्ष्म निरीक्षण आणि जिवंत व्यक्तिरेखा जाणवतात. कादंबरीचा विषय असा असल्यामुळे असेल किंवा त्या वेळच्या काळामुळे असेल कदाचित परन्तु भाषा थोडी अलंकारिक जड वाटली. अर्थात, सध्याची अनुवादित पुस्तके वाचल्यावर तर ते प्रकर्षाने जाणवते. या पुस्तकात साम्यवादी विचारसरणी यावर भरपूर लिहिले गेले आहे. आपल्याला सर्व पटते असे नाही. समजा, समाजवाद अंगिकारला तर पुढे त्याचे राष्ट्राच्या दृष्टीने implementation कसे असावे या विषयी पुस्तकात उल्लेख नाही. भाषांतरात भौगोलिक परिमाणानी दूर गेलेल्या माणसांना जवळ आणायचे असते. त्यामुळे रुपांतर इतके बेमालूम झाले आहे की रशियातल्या एका गावात घडलेली गोष्ट इथे भारतातच नव्हे तर महाराष्ट्रातील एखाद्या खेडेगावात घडलीय की काय असेच वाटते आणि ‘आई या पुस्तकाचे हेच यश आहे.

आणखी महत्त्वाचे म्हणजे, नवऱ्याच्या कार्यात स्वतः सहभागी होणाऱ्या बायका आपल्याला परिचित आहेत परंतु, अपत्यप्रेमाच्या ओढीने मुलाने निवडलेल्या कार्यात स्वतःला वाहून घेणारी आई ही मात्र विरळी नव्हे तर दुर्लभच. मला वाटते, कादंबरीचे हे वेगळेपण इथेच जाणवते.
भाषांतराच्या या झरोक्यातून डोकावताना एक सदिच्छा व्यक्त करते की साने गुरूजींच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकाचे अनेक परदेशी भाषांमध्ये भाषांतर होवो आणि भारतीय साहित्य वाचणारा ‘वाचक वर्ग परदेशात तयार होवो.
रुपाली गोखले


No comments:

Post a Comment