आई - माझे पहिले प्रेम


प्रेम

सर्व लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत 'प्रेम' हा शब्द आयुष्यात जादूच्या कांडीसारखे काम करतो. पैसा, अडका, श्रीमंती, वय, व्यवसाय, वृत्ती , नाते यामध्ये सर्वांहून श्रेष्ठ असा हा शब्द अडीच अक्षरी असूनही संपूर्ण जीवन व्यापून टाकतो. ज्याला हे प्रेम लाभते तो आणि जो दुसऱ्यावर प्रेम करतो तो. दोघेही यात न्हाऊन निघतात.

प्रेमाने आयुष्य सुखकर परिपूर्ण होते. जीवन जगायला उमेद देणारे असे हे प्रेम रसायन आहे. आयुष्य अर्थपूर्ण होते. प्रेमामुळे जीवन जगण्यास उभारी मिळते. जीवनात रंग आणणारा असा हा गुलाबी रंगाचा शब्द शरीरात, मनात, वागण्यात, बदल घडवून आणू शकतो. जीवन रंगीत, सुखमय आणि मनातशा फुलविणारे ठरते.

माझे पहिले प्रेम माझी आई आहे. तिने मला जन्म दिला. आणित्ता आत्तापर्यंत माझ्या एकाकी जीवन प्रवासात साथ दिली. आयुष्याच्या चढउतारात तिची मला लाभलेली प्रेममय साथ मला उर्वरित आयुष्य जगण्याकरिता उमेद देऊन गेलीय. माझ्या आईचे राहणे, वागणे, नीटनेटके .तिचे व्यक्तिमत्व हसतमुख होते. सर्व उत्तमोत्तम गोष्टींची तिला अतिशय आवड. सुगरण, काटकसरी, मेहनती तर ती होतीच पण प्रत्येक बाबतीत तिला सौदर्यदृष्टीही होती. घरी सुद्धा ती साध्या सोज्वळ कपड्यात, पण टापटिपीने राहत असे. तिच्या व्यक्तिमत्वाचा डौल तिच्या वागण्यात, चालण्याबोलण्यात जाणवत असे. समोरच्यावर सहज impression पाडत असे. थोडी करारी, हट्टी, निग्रही, निश्चयी असे तिचे व्यक्तिमत्व तिला शोभून दिसे. सर्व कलागुणांचा आदर करणे तिचा स्वाभाविक स्वभाव होता. हसरी निकोप प्रकृती तिचे व्यक्तिमत्व खुलवीत असे.

रोजची देवपूजा ती इतक्या एकाग्रतेने करी की तिचे देवाला फुले वाहणे, समई, निरांजन लावले की सर्व देव प्रसन्न झाल्यासारखे मला वाटत असे. हजरजबाबीपणा हा आणखी तिच्या व्यक्तिमत्वाचा पैलू. तिला कामाचा कधीही कंटाळा आलेला मी तरी पहिला नाही. संसाराची तिला शेवटच्या श्वासापर्यंत असलेली आसक्ती तिला दीर्घायुषी करून गेली. म्हणू की काय bed ridden झाल्यावरसुद्धा तिने कधी कुरकुर केली नाही.

तिची आठवण मला नेहमीच एक सकारात्मक उर्जा देत राहील.

माया टांकसाळे


No comments:

Post a Comment