आडवळणाची,
खेड्यापाड्यातली, गूढतेचे वलय असणारी आणि म्हणूनच भुरळ घालणारी अशी महाराष्ट्रातील
आणि विशेषतः कोकणातली काही ठिकाणे आपल्या भेटीला आणली आहेत डॉ. विराग गोखले यांनी,
आपल्या नव्याकोऱ्या पुस्तकाद्वारे... Maharashtra - Rustic, Mystic, yet Charming "
भटकंतीची
विलक्षण आवड असणारे आणि हा छंद मनःपूर्वक जोपासणारे डॉ. विराग गोखले (भांडुप)
यांनी आपल्या अत्यंत व्यस्त वैद्यकीय दिनक्रमातून वेळ काढून गेल्या काही वर्षात
केलेल्या भ्रमंतीतून हे पुस्तक आकाराला आणले आहे. भटकंतीबरोबरच छायाचित्रणाच्या
आवडीतून वेळोवेळी काढलेले फोटो जतन करून, त्याखाली त्या त्या वेळच्या नोंदी सर्व
वैशिष्ट्यांसह करून ठेवण्याची त्यांची सवय इथे त्यांच्या कामी आली!
त्यांची
भ्रमंती भारतभर आणि भारताबाहेरचीही असली तरी आपल्या लोकांना आपल्या जवळपासच्या
ठिकाणांचा आनंद छोट्या छोट्या सहलींमधून घेता यावा म्हणून हे पुस्तक त्यांनी
महाराष्ट्रापुरतं सीमित केलं आहे. नेहमीच दिसणाऱ्या जागांमधलं वेगळेपण किंवा
देवळं, गड-किल्ले, यातलं आर्किटेक्चर, झाडे-पाने-फुले यातलं सौंदर्य, सगळ्यामधलंच वैशिष्ट्यं - वेगळेपण धुंडाळता यावं म्हणून सर्वच गोष्टी
ज्या चोखंदळपणे आणि सौंदर्यासक्तीने उलगडून दाखवल्या आहेत,
त्याला तोड नाही. शिवाय मराठीत अनेक मोठ्या लोकांनी लिहिलेलं असताना, वासंती घैसास, प्र. के. घाणेकर, मिलिंद गुणाजी यांची पुस्तकं असताना आपण आणखी काय लिहिणार अशा विचाराने
मुंबईतील रहिवाशांना किंवा पुढच्या पिढीलाही जवळची वाटेल अशी सोपी इंग्रजी भाषा
त्यांनी पुस्तकासाठी निवडली आहे.
कोकण
हे त्यांचे जन्मस्थान. त्याची ओढ तर खरीच, तिथे देवळं भरपूर, गडकिल्लेही कितीतरी
... आणि प्रत्येकाची आपापली खासियत! त्यातला धार्मिकपणा टाळून सर्वांना ज्याचा
आनंद घेता येईल, अभ्यासालाही उपयुक्त ठरतील अशी त्यांची निवड, मांडणी आणि लेखनही त्यांनी उत्तमरितीने केले आहे. यामधली प्रवासाची अनेक गावं ओळखीची आहेत, शिवाय साथीला
जीपीएस् - रस्त्याला जागोजागी पाट्या -फलक - दिशादर्शक असल्याने भटकंती
करणाऱ्याला अडचण येणार नाही हे नक्की.
फिरण्याची
हौसच असणाऱ्यांसाठी हे पुस्तक असल्यामुळे तिथे कुठे - कसं जायचं - राहायचं हे इतर
मार्गांनी सहज मिळणारे तपशील त्यांनी या पुस्तकात वगळले आहेत. त्यामुळे पुस्तक आटोपशीर करण्यात ते यशस्वी झाले आहेत.
मात्र अनेक वास्तुंचे - जागेचे वेगळेपण, वैशिष्ट्ये दाखवणारी
भरपूर रंगीत छायाचित्रे त्यामध्ये समाविष्ट केली आहेत. शैलचित्र, कातळशिल्प, विविध प्रकारची भुईछत्रे किंवा मश्रूम, अनेक पुरातन वृक्ष .... यांच्या फोटोंबरोबर मोठमोठ्या मूर्ती किंवा
गडकिल्ले - शिळा - पुरातन वृक्ष यातील वैशिष्ट्यपूर्ण जागांच्या मोजक्या माहितीसह
असलेल्या फोटोंमध्ये त्यांच्या भव्यतेचा अंदाज यावा.
राजापूरची
गंगा, रॉक गार्डन, देवळांचं बांधकाम, भैरवाची - काळभैरवाची देवालये, कणकवलीजवळचा उभादेव, गूढ गहन धोम, मस्तानीशी व पेशव्यांशी संबंधित ठिकाणं, मुंबईतील
आगळेवेगळे गणपती, कातळशिल्प, नैसर्गिक
पोखरबाव, लोणी भापकर, महाबळेश्वरचं
आर्थरच्या पत्नीचं स्मारक, तळ्यातली देवालयं... अशा अनेक
विषयांवर आटोपशीर लेख या पुस्तकात असून लेख, चित्रे, त्यांची माहिती, मांडणी यांचा तोल व्यवस्थित
संभाळला गेला आहे! इथे अत्यंत 'हटके' अशा
गोष्टीच तुम्हाला सापडतील. नेहमीची ठराविक पर्यटनस्थळं अर्थातच नाहीत. असलीच तर
त्यांच्या फारशा निदर्शनास न आलेल्या वेगळेपणापुरतीच! इतकी सगळी अद्भुत, अतर्क्य भटकंती एका
दमात केल्याने आपण वाचक मात्र चक्रावून जातो, विस्मयचकित
होतो.
पुस्तकाचं
मुखपृष्ठ तशाच उत्सुकता वाढवणाऱ्या फोटोंनी भरलेलं आहे. मलपृष्ठावर आवश्यक अशी लेखकाची
माहिती दिली आहे.
आपल्या कुटुंबियांचे आणि सहप्रवाशांचे उल्लेख करायला लेखक विसरलेला नाहीच; पण जणू
काही कर्तव्यबुध्दीने एक अत्यंत महत्त्वाचा उल्लेख त्यांनी केलेला आढळतो... तो
म्हणजे छायाचित्रणाला बंदी असणाऱ्या फलकांबद्दलचं भाष्य!
सध्याचा
काळ बघायला जाता आत्ता फक्त सहलींचं नियोजन करायचं ठरवलं तर त्यासाठी हटके
ठिकाणांच्या माहितीने ओतप्रोत भरलेलं हे पुस्तक हातात हवंच!
"Maharashtra
- Rustic, Mystc, yet Charming"
लेखक
- डॉ विराग गोखले
प्रकाशक
- मेघना गोखले (9833677836), भांडुप, मुंबई..
पृष्ठसंख्या
- 104, किंमत - रु. 280/-
स्वाती कर्वे
No comments:
Post a Comment