अहवाल - गोष्ट सिनेमा बनवण्याची

 

चक दे इंडिया - गोष्ट सिनेमा बनवण्याची


डावीकडे: प्रज्ञाताई भाटवडेकर, उजवीकडे: नेहा भदे

ही एक मुलाखत आहे, किंवा एका मोठ्या सिनेमातल्या छोट्या सिनेमाची गोष्ट आहे म्हणा ना. ही गोष्ट सांगत आहेत प्रज्ञाताई भाटवडेकर आणि त्यांच्याशी गप्पा मारत आहेत नेहा भदे. २००६ साली प्रदर्शित झालेला, अत्यंत गाजलेला सिनेमा होता "चक दे इंडिया".

यामधील सोळा स्त्री खेळाडूंना ग्रूमिंग करण्याचे मोठे काम प्रज्ञाताईंनी केले. हे काम यशराज फिल्म्सकडून त्यांना कसं मिळालं, ह्याची सुरुवात कशी झाली हे सांगताना प्रज्ञाताई म्हणतात, 'यशराज फिल्म्सच्या "मेरी आवाज सुनो" या कार्यक्रमासाठी त्यांच्या मुलीच्या ऑडिशन्स होत्या. या वेळी जुन्या मैत्रिणीमुळे त्या यशराज फिल्म्समध्ये सहाय्य करण्यासाठी रुजू झाल्या. सात ते आठ वर्षे हे काम त्यांनी सांभाळलं. या कामामधला त्यांचा मोलाचा सहभाग पाहून त्यांना 'चक दे इंडिया' मधल्या मुलींना groom करण्यासाठी बोलावण्यात आलं.

या सिनेमामधील अतिशय कठीण काम असे की सोळा स्त्री खेळाडू म्हणून निवडलेल्या ह्या मुलींना प्रज्ञाताईंनी groom म्हणजे मिळालेल्या भूमिकांसाठी सर्वतोपरी तयार करायचे होते. हे शिवधनुष्य पेलायचं काम त्यांनी कसे पार पाडले, त्यासाठी कशी कसरत त्यांना करायला लागली हे नेहा बरोबरच्या दिलखुलास गप्पांमधून त्यांनी आपल्याला सांगितले. अतिशय हुशारीने आणि शिस्तीने त्यांनी हे काम दोन वर्षे त्या मुलींबरोबर राहून पार पाडले. ह्या मुली मुळात खेळाडूही नव्हत्या तसेच त्या अभिनेत्रीही नव्हत्या. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतांतून, वातावरणातून त्या आलेल्या होत्या. त्या मुलींची आईसारखी जबाबदारी त्यांनी घेतली. कधी आईसारखेच प्रेमाने तर कधी शिस्तीत ठेवून प्रज्ञाताईंनी त्यांना उत्कृष्ट प्रकारे तयार केले. या मुलींना सांभाळताना प्रज्ञाताईंचे स्वतःचे गुण कसाला लागलेले आपल्याला जाणवतात. जसे की धैर्य, चिकाटी, कल्पकता, प्रसंगावधान.

नेहा भदे हिने त्यांच्याशी गप्पा मारताना आपल्या मनातले प्रश्न विचारून मुलाखत खूप छान पध्दतीने रंगवली. प्रज्ञाताईंच्या सहजसुंदर आणि मनोरंजक आणि मनमोकळ्या गप्पांत आपणही गुंगून जातो. एकंदरच एक सिनेमा तयार होताना त्याच्यामागे लाखो गोष्टी घडतात, आपल्याला त्याची कल्पनाही येऊ शकत नाही. 'चक दे इंडिया' हा सिनेमा सुपरहिट झाला, त्यामधील सोळा मुलींची पात्रं हा त्यातील महत्त्वाचा भाग होता. तीन तासांच्या सिनेमामध्ये, मुलींच्या उत्तम अभिनयाच्या मागे सतत दोन वर्षे प्रज्ञाताई खंबीरपणे उभ्या होत्या हे विसरून चालणार नाही.

 

मित्रमंडळ बंगळुरू या संस्थेने हा आगळावेगळा कार्यक्रम सादर केला त्यासाठी मित्रमंडळाच्या अध्यक्षा स्नेहा केतकर, नेहा भदे आणि कमिटीचे मनःपूर्वक आभार.

ही मुलाखत पाहण्यासाठी खालील  लिंक वर क्लिक करा:

https://youtu.be/TzIqVCk5kVY



-*-*-*-*--*-*-*-*-

भारती सप्रे

 

No comments:

Post a Comment