'आकाश झेप' भाग ५: 'राइट बंधू - शिकवण व प्रेरणा

 

राइट बंधूंनी फक्त एकदाच एकत्र उड्डाण केले. त्यांच्या वडिलांना विमान अपघातात दोन्ही पुत्र गमावण्याची भीती होती, म्हणून त्यांनी वडिलांना वचन दिले होते, की ते कधीही एकत्र विमानातून उडणार नाहीत. मजेशीर गोष्टी अशी की, १९६९ साली नील आर्मस्ट्राँगने 'राइट फ्लायर' विमानाचा तुकडा आपल्यासोबत चंद्रावर नेला होता. राईट बंधुंच्या या दैदिप्यमान कामाबद्दल त्यांनी स्वतः आणि इतरांनी काही उद्गार काढले ते असे.



राइट बंधू: "आम्ही सुदैवी होतो, कारण आमच्या लहानपणापासून घरातील वातावरण आमच्यातील सुप्त जिज्ञासेला,आवडीला वाव देणारे होते. जर ते तसे नसते, तर कदाचित आमच्या जिज्ञासेला संशोधनाची फळे येण्याआधीच ती खुडली गेली असती.

एम. जे. बी. डेव्ही: "विल्बरचे व्यक्तिमत्व हे प्रतिभावंताचे उत्तम उदाहरण होते. जो मुळापासून सुरुवात करतो आणि अगदी प्राथमिक गोष्टींचा - ज्या आपल्याला माहीतच आहेत अशी अनेकांची गैरसमजूत असते - प्रामाणिक अभ्यास करतो, अशा प्रतिभावंतांपैकी तो होता. शिवाय तो आणि त्याचा भाऊ यांच्याजवळ एकमेकांच्या प्रयत्नांना पूरक गोष्टी करण्याची विलक्षण आगळी मनोवृत्ती होती. आपल्याला उपलब्ध असणाऱ्या, आधी नोंदल्या गेलेल्या संशोधनातील प्रत्येक बाब तपासून पाहणे ती प्रत्यक्ष व्यवहारात आणून सिद्ध करणे, या गोष्टींना या गोष्टींना राइट बंधूंनी फार महत्त्व दिले होते. समान उद्दिष्ट परस्परांविषयीची अचूक जाण यांमुळेच त्यांना हे यश मिळाले."

सी. एल. एम. ब्राऊन: "कामगारांचा सावध कष्टाळूपणा, द्रष्ट्याची स्वप्ने साहसी वीरांचा शांतपणा हे सारे गुण राइट बंधूंच्या अंगी एकवटले होते. राईट बंधूंनी कोणत्याही बाबतीत नशिबावर हवाला ठेवला नाही, कोणतेही धाडस करण्याची तयारी ठेवली. हवेत उड्डाण करण्याची प्रबळ इच्छा त्यांच्या मनात सतत धगधगत होती. त्याचबरोबर एखाद्या क्षुल्लक, कंटाळवाण्या, व्यावहारिक तपशीलासाठी अखंडपणे, अविरत कष्ट घेण्याची त्यांची तयारी होती."

राइट बंधूंच्या विमानाचा उपयोग सुरक्षा, युद्ध याबरोबरच जाहिरात, माल वाहतूक, व्यापार यासाठी व्हायला लागला. पर्यटन स्थळे फिरण्यासाठी लोक जगभर प्रवास करू लागले. निर्जन ठिकाणी मदत-पथक पाठवता येते. तसेच अन्न, शस्त्रक्रिया, रक्त, अवयव, औषधे . अत्यावश्यक तातडीच्या सेवा जलद गतीने होऊ लागल्या आहेत. सर्व ऋतूंमध्ये सर्व फळे, उन्हाळ्यातही बर्फाळ प्रदेशात जाऊन आनंद लुटणे, जगाच्या दुसऱ्या टोकाला असणाऱ्या कार्यक्रमाला हजर राहता येणे शक्य झाले आहे. राइट बंधूंनी आंधळे धाडस कधीही केले नाही. आजही विमान उडवणे खूप धाडसाचे काम आहे. त्यांची चिकाटी, मेहनत, प्रयोगशील वृत्ती यामुळे ते सर्व अडचणींवर मात करू शकले. यातही ते स्वतः उत्कृष्ट हस्तकौशल्य असणारे होते, आणि म्हणून त्यांच्या मनात आलेल्या यंत्र रचना त्यांनी स्वतःच्या हातांनी केल्या. आपल्या भारतीयांसाठी, विशेषतः आताच्या युवा वर्गासाठी हा मोठा धडा आहे. उत्तम विचारशक्ती, प्रत्येक गोष्ट स्वतः करण्याची क्षमता आणि इच्छा हे त्यांचे आदर्श गुण होते. इथून पुढे त्यांचे विचार आपण अंगात भिनवू आणि ते आपल्या समाजाला, देशाला उपयोगी पडतील, अशी इच्छा बाळगू!



विमानशास्त्र अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना स्वामी विवेकानंद, भारतरत्न डॉ. . पी. जे. अब्दुल कलाम यांच्या चरित्रासोबतच, राइट बंधूंच्या 'आकाश झेपेचं' मलाही भारी कौतुक होतं. अभियांत्रिकीला असताना मला स्फुरलेली कविता, मी त्यांना इथे अर्पण करत आहे:

गरुड भरारी

पक्षी आकाशात हवे तेंव्हा भरारतात,

स्वच्छंदपणे उडून जगसफर करतात.

माणसाला आकाशी झेपण्या कितीतरी वेळ लागला,

अमेरिकेच्या 'राइट बंधू'चा तसा होता मेळ चांगला.

झेपायला वर आकाश त्यांना खुणवत होतं,

आपण काहीतरी करू असं सारखं जाणवत होतं.

उड्डाणशास्त्राचं ज्ञान थोडं थोडं जाणलं होतं,

गरुडभरारीचं वेड रक्तातच त्यांच्या भिनलं होतं.

अथक प्रयत्नांनी 'विमान' त्यांनी आकारलं,

'विसाव्या'च्या सुरुवातीला स्वप्न त्यांचं साकारलं.

आजच्या पिढीने त्यातून काहीतरी धडा घ्यायला पाहिजे,

त्यांच्यासारखा आपला जीव अगदी वेडा व्हायला पाहिजे.


संदर्भ:

1. पुस्तक: 'राइट बंधू' (लेखिका: आना स्प्राउल, रूपांतर: मीना वैशंपायन)

2. Google images, Internet

लेखन : राकेश शेटे

(विमानशास्त्र अभियंता, बेंगलोर)







No comments:

Post a Comment