अमेरिकेच्या 'नॅशनल अॅडवायजरी कमिटी फॉर
एरॉनॉटिकस' (NACA) ची स्थापना १९१५ साली झाली. इकडे 'सोव्हिएत स्पेस प्रोग्राम' एकत्रित एजन्सी म्हणून आयोजित केला गेला नव्हता. १९५०
च्या दशकाच्या मध्यापासून ते १९९० च्या सोव्हिएत युनियनचे विघटन होईपर्यंत
'स्पेस रेस' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शीत-युद्धामध्ये अमेरिकेच्या स्पर्धेत तो एक
सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक (युनियन) चा
राष्ट्रीय अवकाश कार्यक्रम होता. त्यातून त्यांनी पहिला कृत्रिम
उपग्रह 'स्फुटनिक', पहिला अंतराळवीर
'युरी गागारीन' असे बरेच विक्रम केले. त्यांच्या 'स्फुटनिक'मुळे अमेरिकेचे
लक्ष वेधले, त्यातून १९५८ ला अमेरिकेच्या 'नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन ' (नासा)
ची स्थापना साली झाली.
भारतामध्ये 'संरक्षण संशोधन आणि विकास
संस्था' (DRDO) या संस्थेची स्थापना १९५८ साली झाली. या संस्थेमध्ये विमान उड्डाण शास्त्र (एरोनॉटिक्स), रॉकेट आणि क्षेपणास्त्र,
इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रीकी, नौदल प्रणाली,
शस्त्रास्त्र तंत्रज्ञान, यंत्रमानव (रोबोटिक्स) यांसारख्या अनेक शाखांचा समावेश होतो.
१९६२ मध्ये अणु उर्जा विभाग (डीएई) अंतर्गत जवाहरलाल नेहरू यांनी अंतराळ संशोधनाची गरज ओळखून, वैज्ञानिक विक्रम साराभाईंच्या आग्रहावरून भारतीय अवकाश संशोधन समिती (INCOSPAR) ची स्थापना केली. INCOSPAR ची वाढ होऊन १९६९ त्याचे रूपांतर 'भारतीय अंतराळ संशोधन
संस्था' (ISRO - इस्रो) मध्ये झाले.
'इस्रो'चे मुख्य कार्यालय 'बेंगळुरू' येथे आहे. इस्रोच्या
तिरुवनंतपुरम, बेंगळुरू, अहमदाबाद,
चंदिगढ, हैदराबाद, कोटा,
श्रीहरीकोटा अशा अनेक ठिकाणी उपग्रह, अवकाश संशोधन
इत्यादी विभागाच्या शाखा आहेत. भारतभर या शाखांमध्ये
१७००० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. इस्रोची
व्यावसायिक शाखा 'अँट्रिक्स' (ANTRIX) आहे,
जी इस्रोची उत्पादने, सेवा आणि तंत्रज्ञानांना
प्रोत्साहन देते, त्यांची जाहिरात करते.
'अवकाश तंत्रज्ञानाचा विकास करणे व विविध राष्ट्रीय कार्यात त्याचा
उपयोग करणे' हा ‘इस्रो’ या संस्थेचा मूळ उद्देश आहे. डॉ.विक्रम साराभाई यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक समजले जाते. २१ नोव्हेंबर १९६३ रोजी
तिरुअनंतपुरमच्या हद्दीत थुंबा येथून छोटा अग्निबाण (rocket) उडवला गेला, ज्याने भारतातील आधुनिक अवकाश युगाच्या जन्माची
घोषणा केली. एक छोटेसे गाव लवकरच थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्च
स्टेशन' म्हणून ओळखले जाऊ लागले आणि नंतर ते 'विक्रम साराभाई स्पेस सेंटर' झाले.
छायाचित्रे: १. आकाशात झेपावण्यापूर्वी सायकलवरून नेला जात असताना 'पहिला अग्निबाण'; २. 'थुम्बा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्च स्टेशन'
इस्रोचा 'आर्यभट्ट' हा भारतीय
बनावटीचा पहिला उपग्रह! तो १९ एप्रिल १९७५ रोजी, सोव्हिएत अग्निबाण प्रक्षेपण व विकास केंद्रावरून प्रक्षेपित केला गेला.
तो एक्स-रे खगोलशास्त्रावरच्या वातावरणाचा अभ्यास
आणि सौर भौतिकी मध्ये प्रयोग करण्यासाठी तयार केला गेला होता. त्यानंतर 'भास्कर' हा उपग्रह त्याच
ठिकाणावरून १९७९ साली प्रक्षेपित झाला. १८ जुलै १९८० ला भारताने
प्रथमतः स्वबळावर 'रोहिणी' या उपग्रहाचे
प्रक्षेपण 'सतीश धवन स्पेस सेंटर, श्रीहरीकोटा'
येथून केले. (२००९ साली मी शेवटच्या वर्षी शिकत
असताना आमच्या 'गणेश इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीरिंग, चेन्नई'च्या 'विमानशास्त्र अभियांत्रिकी'
विभागाला 'श्रीहरीकोटा' च्या
शैक्षणिक सहलीला जाण्याचे भाग्य आम्हाला लाभले होते). 'ॲपल' हा भारताने हाती घेतलेला पहिला भूस्थलीय प्रयोगात्मक संप्रेषण उपग्रह
(Communication Satellite) प्रकल्प १९८१ सालचा आहे. गंमत अशी की, हा उपग्रह 'एन्टीना-रेंज' चाचणीसाठी बैलगाडीवरून नेण्यात आला. असे केले गेले कारण, तेंव्हाची ती बैलगाडी लाकडापासून
तयार केली गेलेली होती, आणि पर्यायी ट्रक धातूंचे बनलेले होते,
जे सिग्नलमध्ये व्यत्यय आणू शकत होते.
छायाचित्रे: १.
आर्यभट्ट उपग्रह; २. बैलगाडीवर 'ॲपल' उपग्रहाची चाचणी घेण्यात येत असताना.
१९६० ते ७० च्या दशकात भारताने स्वतःचे अग्निबाण, प्रक्षेपण वाहने तयार करायला सुरुवात केली. काळानुसार ऑगमेंटेड उपग्रह प्रक्षेपण वाहन (ASLV), ध्रुवीय
उपग्रह प्रक्षेपण वाहन (PSLV), भू-सापेक्ष
सम-क्रमित उपग्रह प्रक्षेपण वाहन (GSLV) विकसित केले गेले. या अग्निबाण निर्मितीमध्ये काही वेळा अपयश आले, तरी त्यातून धडे घेऊन, वेळोवेळी अनेक उपग्रह यशस्वीरीत्या
अवकाशात सोडले गेले. इस्रोच्या 'चंद्रयान-१' व 'चंद्रयान-२' बद्दलची माहिती आपण मागील - 'थेट चंद्रावर' या ८ व्या भागामध्ये पाहिली. अभिमानाची गोष्ट अशी की, इस्रो ही चंद्रावर पाणी शोधणारी
जगातील पहिली अंतराळ संस्था आहे. तसेच पहिल्या प्रयत्नात आपण मंगळाच्या कक्षामध्ये
उपग्रह पाठवला. मार्स ऑर्बिटर मिशन (MOM), ज्याला 'मंगळयान' देखील म्हटले
जाते. २४ सप्टेंबर २०१४ पासून मंगळाभोवती फिरत असलेला हा एक उपग्रह
आहे. ५ नोव्हेंबर २०१३ रोजी इस्रोने याचे प्रक्षेपण केले होते. ही भारताची पहिली अंतर-ग्रहीय मोहीम आहे आणि रॉसकोसमॉस, नासा
आणि युरोपियन स्पेस एजन्सी नंतर 'मंगळ कक्षा' मिळविणारा भारत हा चौथा देश आहे.
छायाचित्र: 'मंगळयान'
आकाशात झेपावताना
भारत 'गगनयान' अंतराळ
यानाद्वारे २०२३ पर्यंत अंतराळवीरांना (vyomanauts) अंतराळात
पाठविण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहे. २२ जानेवारी २०२० रोजी
इस्रोने 'व्योम-मित्रा' नावाचा (महिला-सदृश्य) यंत्रमानव जाहीर केला, जो या मोहिमेमध्ये इतर अंतराळवीरांच्या
सोबत असेल. 'आदित्य-एल-१' हे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोचे अंतराळयान
आहे. ते डिसेंबर २०२१ - जानेवारी २०२२ दरम्यान प्रक्षेपित करण्याची योजना आहे. ही भारताची
पहिली सौर मोहीम आहे. इस्रोने पाठवलेल्या 'रिमोट
सेन्सिंग' उपग्रहांच्या समूहांनी अवकाशात तयार झालेले हे जगातील सर्वात मोठे 'कृत्रिम नक्षत्र' आहे. 'गगन' (GAGAN) आणि 'नाविक'
(NAVIK) हे दोन उपग्रह दिशादर्शक प्रणाली (navigation
system) चालवित आहेत. इस्रोने 'भुवन' (BHUVAN) नावाचा अनुप्रयोग
(application) विकसित केला आहे, ज्याद्वारे वापरकर्त्यांना
पृथ्वीच्या पृष्ठभागाची द्वि/त्रिमितीय छायाचित्रे शोधता येतात. विशेष बाब म्हणजे, पाकिस्तानच्या सुपर्को (SUPARCO) च्या
आठ वर्षानंतर 'इस्रो'ची स्थापना झाली. तरीही भविष्यात नंतर 'सुपर्को'कडे उपग्रह प्रक्षेपण क्षमता
असणे अपेक्षित आहे, तर 'इस्रो'ने तोपर्यंत शुक्र मोहीम, आणि मंगळावर पुन्हा भेट देण्याची
योजना आखली आहे.
'इस्रो'ने फेब्रुवारी २०१७ मध्ये ध्रुवीय
उपग्रह प्रक्षेपण वाहन (PSLV) वापरून एकाच मोहिमेत १०४ उपग्रह
प्रक्षेपित करीत विक्रम नोंदविला. त्यातील १०४ उपग्रहांपैकी ९६
उपग्रह हे अमेरिकेचे आहेत. 'इस्रो'ने आत्तापर्यंत
३४ देशांचे ३४२ उपग्रह अवकाशात सोडले आहेत. तसेच १११ अवकाश मोहीमा,
८० प्रक्षेपण मोहीमा, १२ विद्यार्थी उपग्रह,
२ पुनर्प्रवेश (re-entry) मोहिमा झाल्या आहेत.
इस्रोच्या या उपग्रहांचा उपयोग दूरसंचार, सैन्य,
शैक्षणिक, Telemedicine, जैवविविधता माहिती प्रणाली,
नकाशा-शास्त्र अशा अनेक क्षेत्रांमध्ये होत आहे.
ज्यामुळे मानवी आयुष्य सुकर झाले आहे, सोपे
झाले आहे. 'इस्रो'चे आपण संपूर्ण भारतवासीयांकडून
आभार मानूया आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देऊया!!
संदर्भ: विकिपीडिया, इस्रो
वेबसाईट, इंटरनेट
लेखक: राकेश शांतीलाल शेटे
विमानशास्त्र अभियंता, बेंगळुरू
संपर्क: 8951655367
No comments:
Post a Comment