एकलव्य


‘सर, फक्त एकदा ह्याची बॅटिंग बघा. खरंच चांगला खेळतो.’

‘पावसकर, अहो सगळयांनाच आपला मुलगा सचिन वाटतो. पण तुम्ही इतकी वर्षं इथे ग्राऊंड मेंटेनन्सचं काम करताय. तुमचं एवढं तरी ऐकेनच मी. दोन तासांनी ही बॅच संपेल तेव्हा देऊ ह्याला दोन तीन बॉल्स खेळायचा चान्स. काय?’
‘खूप उपकार होतील सर.’
पावसकरांचा दर्शन रोज ग्राऊंडवर वडलांसोबत यायचा आणि तासनतास बॅटिंग प्रॅक्टिस पाहत बसायचा. संध्याकाळी कोचिंग संपलं की ग्राऊंड मेंटेनन्स स्टाफ बरोबर थोडा वेळ खेळायचा. हे रुटिन दोन वर्षं चालू होतं. आता त्याला क्लब पातळीवर खेळायला हरकत नाही असं सगळ्यांचच मत होतं. त्याचसाठी त्याला आज खांडेकर सरांकडे आणलं होतं.
दर्शनने खांडेकरांना खूपच इंप्रेस केलं. प्रत्येक बॉलला त्यांची दाद मिळवली. त्याच्या बॅटिंगमधे आक्रमकता आणि सफाईदार शैली हे दोन्ही गुण होते. थोडी फार पॉलिशिंगची गरज होती इतकंच.

‘काय रे? कुठे जातोस ट्रेनिंगला. काय हे पावसकर? आपला कॅम्प असताना तुम्ही मुलाला दुसरीकडे पाठवताय? माझी लाज काढलीत तुम्ही तर.’ खांडेकर सर म्हणाले.

‘काय चेष्टा करता सर. आमची कुठे एवढी ऐपत? हा इकडेच बसून तुमचं ट्रेनिंग पाहून शिकलाय. आता त्याची झेप घ्यायची वेळ आलीये सर. फक्त तुमचा गाईडन्स हवा.’ - पावसकर.

‘अरे वा. मस्त बोललात. पण पावसकर, सध्या बॅटिंगवर जो तो मेहनत घेतोय. तुमचा मुलगा चांगला उंच आहे. आपण ह्याला फास्ट बोलिंगचं ट्रेनिंग देऊ. त्या डिपार्टमेंटला आपण अजूनही कच्चे आहोत. कदाचित उद्या हा किर्तीमान बोलर होईल. काय?’

‘पण सर बॅटिंग ह्याचं passion आहे. आणि तुम्ही पाहिलंय, किती चांगला खेळतो तो. त्याच्या हातून बॅटच गेली तर पार खचेल तो सर. लहान तोंडी मोठा घास घेतोय सर, पण मला वाटतं हा आज ही क्लबच्या टॉप तीन बॅट्समनमधे मोडेल.’

‘ऐकून घेतोय म्हणून काही बोलू नका पावसकर. मला शिकवताय? पाठवा उद्यापासून पोराला. तुम्ही जुने स्टाफ म्हणून तुमच्याकडून फी सुद्धा घेणार नाहीये मी. पण आता क्लबच्या बॅटिंग लाईन अप मधे अजिबात जागा नाहीये. आणि बॅटिंग स्पॉटसाठी कोणाकोणाची मुलं लाईन लावून राहिलीयेत हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. so he has to train as a bowler. That's final.’
असं म्हणून खांडेकर रागारागात निघून गेले.

पावसकर दर्शनला घेऊन घरी परत गेले.

दुसऱ्या दिवशी सरांनी त्यांना पाहताच हटकलं. ‘काय पावसकर. मुलगा कुठेय? तुम्हाला बोललेलो मी, आज त्याला आणा म्हणून. रागावलात की काय माझ्या कालच्या बोलण्यावर?’
‘नाही सर.’
‘मग?’
‘सर. मी ठरवलंय - त्याला फुकटात एकलव्य बनवण्यापेक्षा थोडी पैशाची कळ सोसून अर्जुन बनवायचं. पुढच्या आठवड्यापासून शिवाजी पार्कला ट्रेनिंग सुरू होईल त्याची.’ पावसकर कणखर स्वरात म्हणाले.
खांडेकरांना आपली चूक ही कळली आणि एक चांगला शिष्य हातून गेल्याचा पश्चात्तापही झाला.


मानस

No comments:

Post a Comment