|
अच्युत पालव सर |
"प्रत्येक
अक्षर एक कलाकृती असते." खरं वाटत नाही ना? पण याचे प्रात्यक्षिक बघायला मिळाले
ते calligraphyच्या एका वर्गात. लहान मुलांचा जसा शाळेतला वर्ग असतो ना, अगदी तसाच
आमचा एक वर्ग भरला होता. १५ वर्षांच्या विद्यार्थ्यांपासून ते ७० वर्षांच्या आजोबांपर्यंत,
मराठी, कानडी, तामिळ भाषिक, वेगवेगळ्या क्षेत्रांमधले व्यावसायिक, नोकरदार, विद्यार्थी,
गृहिणी असा चाळीस जणांचा आमचा वर्ग होता. आम्हाला एकत्र या वर्गात आणले होते, 'मित्रमंडळ,
बेंगळुरू' या संस्थेने कॅलिग्राफीची कार्यशाळा आयोजित करून. वर्ग सुरू होण्याआधी दोन
दिवसांच्या या कार्यशाळेत आपण काय शिकणार? कॅलिग्राफी आर्ट म्हणजे नक्की काय? असे बरेसचे
प्रश्न मनात होते. शिवाय शिक्षकही नावाजलेले, कॅलिग्राफी या कला क्षेत्रात ४० वर्षांची
तपश्चर्या केलेले, त्यामुळे मनावर दडपणयुक्त उत्सुकता होतीच.
|
मित्रमंडळ अध्यक्षा नीना वैशंपायन |
वर्गाची सुरुवात
'मित्रमंडळ' अध्यक्षा 'नीना वैशंपायन' यांनी शिक्षकांचा परिचय देऊन केली. प्रमुख शिक्षक
होते, प्रख्यात सुलेखनकार 'अच्युत पालव' सर. सहाय्यक शिक्षिका होत्या 'श्रद्धा पालव'
मॅम आणि 'पूजा गायधनी' मॅम. सरांच्या 'स्कूल ऑफ कॅलिग्राफी'च्या संचातील ग्राफ पेपरची
वही आणि शाईचे पेन आम्हाला खुणावत होते. वर्गाची सूत्रे पालव सरांनी हातात घेतली. कॅलिग्राफीचे
पेन पंचेचाळीस डिगरीमधे हातात कसे पकडायचे इथपासून आमचा श्रीगणेशा सुरू झाला. हसत-खेळत
शिकविण्याच्या सरांच्या हातोटीमुळे मजा येत होती. सर्वच शिक्षक न कंटाळता, सहनशीलतेने
आणि हसतमुखाने आमच्या चुका सुधारून देत होते. बघता बघता आमच्या मनावरचे दडपण दूर झाले.
एकंदरीत आमचा वर्ग माँटेसरी शिक्षण पद्धतीनुसार चांगला चालला होता. जोडीला मित्रमंडळाने
झोनाशा पॅरडीसोच्या क्लब हाऊसमध्ये जेवण, चहा-कॉफी, स्नॅक्स अशी व्यवस्था केली होती.
|
सरांबरोबर गप्पा गोष्टी |
रोमन लिपीमधील
स्मॉल लेटर्स, आकडे, कॅपिटल लेटर्स काढायची विशिष्ट पद्धत आम्ही शिकलो. पहिल्या दिवशी
गृहपाठ देखील दिला होता. पहिल्या दिवशीचे चाचपडणारे आम्ही आणि दुसऱ्या दिवशीचे आम्ही,
यात आत्मविश्वासाने भर टाकली होती. ग्राफ पेपरच्या बंदिस्त चौकोनात वावरणारे आम्ही
आता कोऱ्या कागदावर विहार करायचा प्रयत्न करायला लागलो होतो. अक्षरांकडे बघण्याचा आमचा
दृष्टिकोनच सरांनी बदलून टाकला. कॅलिग्राफी म्हणजे नुसतेच ‘सुंदर हस्ताक्षर’ नव्हे किंवा ‘अक्षरांना सजविणे’ नव्हे
तर त्याही पलीकडे गेले पाहिजे ही जाणीव दिली. अक्षरांमधली सौंदर्यस्थळे ओळखण्याचा सरांनी
सांगितल्याप्रमाणे प्रयत्न करायला लागलो. रोमन, देवनागरी लिपी कुठलीही असो, प्रत्येक
लिपीमधले प्रत्येक अक्षर आपल्याला काहीतरी सांगत असते. ते सांगणे, त्या मागचा अर्थ,
विचार समोरच्या माणसांपर्यंत पोचवायचा असतो. अक्षरे बोलकी झाली पाहिजेत. किंबहुना,
अक्षरांमधल्या रेषा महत्त्वाच्या असतात. मराठी, कानडी, पंजाबी अशा कुठल्याही भाषेमधले
“प्रत्येक अक्षर एक स्वतंत्र डिझाईन होऊ शकते”. वेगवेगळ्या
साधनांचा वापर करून अक्षरांचे विविध आकार, चिन्हे, डिझाईन्स बनविता आली पाहिजेत, जेणेकरून
सुंदर चित्रे बनविता येतील. अक्षरांभोवतालच्या जागेचा वापर करता आला पाहिजे. पण हे
सर्व करत असताना अक्षरांचा बाज ढळू न देणे, त्याच्याशी प्रामाणिक राहणे हे महत्त्वाचे.
सरांनी प्रात्यक्षिकाद्वारे आम्हाला हे दाखविले. खूप सराव आणि मेहेनत याशिवाय हे अजिबात
शक्य नाही. माणसाने नेहेमी प्रयोगशील राहिले पाहिजे, जेणेकरून तो सृजनशील बनतो. एका
कॅनव्हासपुरते हे सीमित न राहता टेबल्स, भिंती अशी अनेक माध्यमे देखील पुढे वापरता
येऊ शकतात, हे त्यांनी उदाहरणे देऊन सांगितले.
|
Live Art demonstrations |
इंजेक्शन
सिरींजचा कॅलिग्राफीच्या कलेमध्ये वापर करणारी जगातील एकमेव व्यक्ती म्हणजे अच्युत
पालव सर. आम्ही नशीबवान समजतो स्वतःला की त्याचे प्रात्यक्षिक आम्हाला बघायला मिळाले.
ध्वनी (आवाज), फोटो इंक, ब्लीच, टूथब्रश, सिरींज अशी वेगवेगळी साधने वापरून अक्षरे
आणि रंग यांचा सुंदर मिलाफ कागदावर चितारताना बघून आमचे डोळे तृप्त होत होते. Wow,
सुंदर, amazing असे उद्गार उमटत होते. मजेदार गोष्ट अशी की, कागदावर पाऊस दाखवत असताना
बाहेर पाऊस कोसळायला लागला. रंगाक्षरांच्या उधळणीची जणू मैफिलच रंगली होती.
मोडी लिपीविषयी
देखील आम्हाला माहिती कळली. पूजा मॅमनी मोडी अक्षरांचे प्रात्यक्षिक दिले. देशात-परदेशात
सरांचे प्रकल्प चालतात, शिबिरे होतात, त्या वेळचे त्यांचे अनुभव आम्हाला सांगितले.
जागतिक पातळीवर कॅलिग्राफीमधे भरपूर काम चालू आहे. बाहेरच्या देशांच्या तुलनेत आपल्या
इथे सगळ्या भाषांमधली भरपूर अक्षरे आहेत. काम करायला भरपूर वाव आहे. परंतु भारतात अजून
याविषयी माहिती नाही, सजगता नाही. त्यामुळे हुशारी असूनदेखील खूपच कमी काम झाले आहे.
सरांनी ही खंत व्यक्त केली. भरपूर सराव करण्याचे वचन त्यांनी आमच्याकडून घेतले. शिवाय
येत्या वर्षभरात भरपूर काम करून प्रत्येकाने एक डिझाईन तयार करून त्याचे प्रदर्शन भरवा
असे सर्वांना आवाहन केले.
|
कार्यशाळेचा उत्साही विद्यार्थी-वर्ग |
देवनागरी लिपीची कार्यशाळा मंडळाने भविष्यात आयोजित करावी
अशी इच्छा सर्व शिबिरार्थींनी व्यक्त केली. मंडळाच्या वतीने सर्व शिक्षकांचे आभार मानण्यात
आले. नवीन काहीतरी करण्याचा निश्चय आणि उमेद बरोबर घेऊन, दुखऱ्या बोटांसहित आम्ही आनंदाने
घरी परतलो.
|
Participant's feedback |
अच्युत पालव यांची मुलाखत पाहण्यासाठी क्लिक करा: Youtube - इंटरव्यू विथ अच्युत पालव
रुपाली गोखले
No comments:
Post a Comment