अमृतलता

 


आज लतादीदी गेल्या. वय वर्षे ९२, गेले एक महिना दवाखान्यात ICU मध्ये. हे सगळं बघू जाता ही बातमी खूप अनपेक्षित होती असे नाही. पण ती बातमी आली तेव्हा आधी केव्हातरी एक वाचलेलं वाक्य मनात अलगद उमटलं, "I thought she was immortal". प्रख्यात लेखक पी. जी. वुडहाऊसला त्याची मुलगी लियोनारा गेल्याचे कळले तेव्हा तो म्हणाला होता "I thought she was immortal". नंतर वुडहाऊस गेला, तेव्हा पु. ल. देशपांड्यांना हेच वाक्य आठवलं होतं.

आज लतादीदी गेल्या तेव्हा त्या वाक्याची खरी ताकद कळली. आयुष्यातील/मनातील एक कप्पा बंद झाला, काहीतरी जवळचे गमावले असे वाटले. माझे स्वतःचे वडील तसेच आजी-आजोबा गेले तेव्हा मला तसे वाटणे स्वाभाविक होते. पण ते सगळे असतांनाही पु.ल. देशपांडे जेव्हा २००० मध्ये गेलेत तेव्हाही असंच काहीतरी वाटलं होतं. आयुष्यातील सुसंस्कृतपणाची एक सावली आपल्याला सोडून गेली असे काहीसे वाटले होते. आज आयुष्यातील सूर कुठेतरी दूर निघून गेले आहेत, असं वाटतंय!


बऱ्याच व्हॅाट्सअप ग्रुप्स वर तसेच सोशल मीडियावर तुमची लतादीदींची ५ किंवा १० आवडती गाणी सांगा, असे सुरु होते. अरे, गम्मत आहे का ? स्वतंत्र भारताच्या ७० वर्षांच्या सांगीतिक इतिहासात "लता मंगेशकर" या नावाने एकछत्री अधिराज्य गाजवले. नेहरूंपासून शास्त्रीजी, इंदिराजी, राजीवजी, अटलजी ते मोदीजी असे अनेक पंतप्रधान झालेत, लाला अमरनाथ पासून ते विराट कोहली पर्यंत व्हाया पतौडी, वाडेकर, गावस्कर, कपिल देव, तेंडुलकर, गांगुली, धोनी, असे क्रिकेटचे कप्तान झालेत, जवळ जवळ ३-४ पिढ्या उलटल्या पण गान-सम्राज्ञी ही तीच होती. आवडती १० गाणी कशी शोधायची?

मला तर लतादीदींचे कुठलं गाणं आठवावं हाच प्रश्न पडला होता, इतकी ती कानामध्ये किंवा मनामध्ये भिनली आहेत. मग "ऐ मेरे वतन के लोगो" असो, किंवा "ऐ मालिक तेरे बंदे हम" असो, महलचं "आयेगा आनेवाला" असो, अनारकली मधले "ये जिंदगी उसिकी है" असो, मुगले आझम चं "प्यार किया तो" किंवा " मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो" असेल, मधुमतीचं "आ जा रे परदेसी" असेल, किंवा अनपढचं "आप की नजरो ने समझा" असेल, आरजू मधील  "अजि रुठकर अब" असेल, चोरी चोरी चं "रसिक बलमा" असेल, जिस देश मे चं "ओ बसंती पवन पागल" असेल, किंवा ज्वेल थीफ चं "होठो पे ऐसी बात" असेल, गाईडचं "आज फिर जीने की तमन्ना है" असेल, रजनीगंधा चं "रजनी गंधा फूल तुम्हारे" असेल, लेकीनचं "यारा सिली सिली" असेल, कमीतकमी १००-२०० गाणे निघतील.

भीमसेन जोशींसोबतचा "राम श्याम गुण गान" अल्बम अद्भुत म्हणावा तर ज्ञानेश्वरांचे अभंग "मोगरा फुलला" किंवापैल तोगेकिंवा "पसायदान"चं काय? किंवा तुकोबांचा "आनंदाचे डोही आनंद तरंग", त्याला ऑप्शन मध्ये टाकायचं का? मराठीमध्ये खळे, फडके, खुद्द हृदयनाथ यांनी माडगूळकर, पाडगावकर, शांता शेळके, सुरेश भट, कवी ग्रेस यांची काय कमी सुंदर गाणी दिली आहेत का? वर स्वतः लतादीदींनी "आनंदघन" या टोपण नावाने संगीतबद्ध केलेल्या जेमतेम फक्त ५ चित्रपटातील एकूण एक गाणे सोनेरी सुरांमध्ये भिजलेले आहे, "अखेरचा हा तुला दंडवत" किंवा "ऐरणीच्या देवा तुला" किंवा "शूर आम्ही सरदार" किंवा "रेशमाच्या रेघांनी" ही काय वगळायची का? नाही, लतादीदींची १० काय २०-३० गाणीही बाजूला काढणे कठीण आहे. १००-२०० काढायची असतील तर थोडं फार शक्य आहे.




बरं, स्त्रीजीवनातील तसेच स्त्रीच्या भावविश्वातील जवळ जवळ प्रत्येक प्रसंगावर लतादीदींचं गाणं असावं. अगदी "लेक लाडकी या घरची" पासून "गंगा यमुना डोळ्यात उभ्या का", "मेंदीच्या पानावर", "काय बाई सांगू कसं गं सांगू", “प्रतिमा उरी धरुनी”, “विसरू नको श्रीरामा मला”, हे तर मराठीचं झालं, हिंदीतही प्रेम व्यक्त करण्यापासून लपवून ठेवण्यापर्यंत सगळे भाव त्यांच्या गाण्यात येतील. पण हा "व्हॉल्युम" आहे म्हणून त्या मोठ्या आहेत असे नाही तर त्या एकमेवाद्वितीय होत्या म्हणूनच हे साम्राज्य निर्माण झालं.

यामागे काय वैशिष्ट्य असावं बरं? हे सांगायला मी काही संगीतातला जाणकार नाही, पण थोरामोठ्यांनाही पडलेला हा प्रश्न आहे. पु. लं. देशपांडेंनी "गुण गाईन आवडी" या पुस्तकात लतादीदींवर "मुली औक्षवंत हो" हा १९६७ मध्ये लिहिलेला लेख घेतला आहे. त्या लेखात पु. ल. लिहितात, "देवटाक्याच्या पाण्यासारखा हा गळा, रंग टाकणाऱ्याने आपल्या रंगाच्या निवडीची कमाल करावी, हा गळा त्या रंगांची स्वरपुष्पे क्षणात फुलवून दाखवतो. हा स्वरच मुळी परिसाचा धर्म घेऊन आलेला. त्या स्वराचा स्पर्श झाला की कशाचेही सोनेच व्हायचे.” आज कोणीतरी म्हणालं (कदाचित आरती अंकलीकर-टिकेकर असाव्यात) "परफेक्शन ही त्यांची ओळख होती, त्यांनी एकदा गाणे म्हटल्यावर अजून चांगलं होऊ शकलं असतं असं म्हणणं कठीण आहे".

असं म्हणतात की बडे गुलाम अली खां दररोज सकाळी रेडियो वर लतादीदीचे गाणे ऐकत असत. एका शागीर्दाने टोकले तर म्हणाले, "देखना चाहता हूँ कब बेसुरी होती है, लेकीन कंबख्त होती ही नही"! तीच लतादीदी गाणे शिकायला आली तर त्याच बडे गुलाम अली खां यांनी नकार दिला. ते म्हणाले, "आप हम से सीखेगी तो हम किसका गाना सुनेंगे?" आणि त्यानंतर त्याच बडे गुलाम अली खां यांनी ५०- ६० च्या दशकात कलकत्त्याला झालेल्या मैफिलीत आपल्या सोबत गायला बसवले. काय असेल हे परफेक्शन ? सूर / ताल / लयीच्या पलीकडे काहीतरी असावं. पं कुमार गंधर्व एकदा म्हणाले होते की प्रत्येक सुराचे एक वर्तुळ असतं. त्या वर्तुळात कुठेही सूर पोहचला तर आपण सूर लागला असे म्हणतो. पण त्या वर्तुळाचाही एक केंद्रबिंदू असतो, तो गाठला की खरा सूर लागला असं समजायचं. या बाईने आयुष्यातील प्रत्येक सूर हा सरळ त्या केंद्रबिंदूतच लावला असावा. मग संगीतकार सप्तकांची चमत्कृती करू देत, मदनमोहन, पंचमदा आणि भाऊ हृदयनाथ यांच्या अनवट चाली असू देत, कशानेही तो केंद्रबिंदू संपूर्ण स्वरमालिकेत ढळत नाही.

ते सगळं असतांना आवाज मुख्य काय व्यक्त करतोय तो गाण्यातला भाव. कवीचे शब्द समजून घेण्याची तरल बुद्धी ही कवी ज्ञानेश्वर असोत, साहिर-मजरूह-शैलेंद्र असोत, सुरेश भट असोत आरती प्रभू असोत किंवा ग्रेस असोत, त्यांना समजून घेऊनच तो सूर निघत होता. समजत नसेल तर प्रा. शंकर वैद्यांकडून ज्ञानेश्वर समजून घेतलेत, भट / ग्रेसांसोबत बसून त्यांच्या कवितांचं परिशीलन केलं, प्रेमचंद-गालिब वाचलेत, उर्दूचे उच्चार सुधारून घेण्यासाठी मेहनत केली (आणि दिलीपकुमारला शब्द मागे घ्यावे लागले). आरतीताईंनी अजून एक सांगितले की सूर / ताल सगळं ठीक आहे पण लतादीदींचा गाण्यातील पॉज विलक्षण असतो. आणि हे खरंच आहे. साधं "गजानना श्री गणराया" हे गाणं जरी घेतलं तरी तो अर्ध-स्वराचा पॉज बहुतेक गायकांचा सुटतो. असे पॉज जवळजवळ सर्वच गाण्यात आहेत. ते केवळ श्वास घेण्यासाठी नाहीत तर एक दैवी स्पर्श त्या पॉजमधून गाण्याला मिळतो जो संगीतकारालाही सुचला नसेल. त्यामुळे "कल्पनेपेक्षाही मूर्ती सुंदर" असे काहीसे संगीतकारांचे होत असावे. मग लतादीदी जर पहिला चॉईस असेल तर त्यात नवल कसले आणि त्याबद्दल काही लोकांचे आक्षेप तरी कशाला?

कधी कधी लतादीदींची गाणी ऐकून असं वाटतं की लतादीदींनी गाणी फक्त यासाठी म्हटली आहेत ज्यामुळे येणाऱ्या अनेक पिढ्यांमधील सगळ्या होतकरू कलावंतांना आयुष्यभर प्रॅक्टिस करण्यासाठी पुरेशी गाणी मिळावीत. त्यातील एकही गाणं लतादीदींसारखं परफेक्टली जमण्यासाठी अश्या होतकरूंना अनेक वर्षे लागावीत आणि ते जमलंच तर त्यांना आयुष्य सफल झाल्याचा अनुभव आणि आनंद कधी ना कधी तरी मिळावा!


बरं केवळ दैवी देणगी होती आणि आवाज हा हिरा होता असे नव्हे, तर प्रचंड मेहनतीने त्याला पैलू पाडले होते. सकाळी ४ वाजता उठून शुचिर्भूत होऊन घराजवळील महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेऊन उस्ताद अमान अली खां भेंडीबाजारवाले यांच्याकडे शास्त्रीय शिकायचं, एका स्टुडिओतून दुसऱ्या स्टुडिओत जाऊन दिवसभर गाणी म्हणायची, संध्याकाळी शांतपणे घरी यायचे पण फिल्मी चमकत्या दुनियेत रात्रीच्या पार्ट्यात मात्र पाऊल पण ठेवायचे नाही ही तपःसाधना नसेल तर अजून काय असणार? गाणं म्हणणं म्हणजे आजकाल परफॉर्मन्स समजणाऱ्यांनी लतादीदींना गाणं म्हणतांना पहावं, सगळे भाव हे आवाजातून व्यक्त होतात, अंगविक्षेपांतून नव्हे. आवाज तार सप्तकात पोहोचला आहे हे फक्त आवाज ऐकूनच समजते, शारीरिक हावभाव तर जाऊ दे पण लतादीदींच्या चेहऱ्यावरूनही ते लक्षात येऊ शकत नाही.

पण खरं सांगायचं तर लतादीदींच्या दृष्टीने हे सगळं दैवी देणगीच असावं. नाहीतर इतकं मिळाल्यावर इतकं नम्र कोणी असू शकतं का? आपल्याला जे काही मिळालं आहे ते कुलदैवत मंगेश आणि वडील दीनानाथ यांच्या आशीर्वादाने मिळालं आहे, ही भावना इतकी पराकोटीची पक्की असावी की त्यातून येणारी नम्रता ही ऍक्टिंग नव्हे. "योगः कर्मसु कौशलम" हे गीतेतील भगवंताचं वाक्य तेच सांगतं आपल्याला. ज्याला तो दैवी स्पर्श झाला त्यालाच "इदं न मम्" याचा अर्थ कळतो. नाहीतर दोन गाण्यांनी प्रसिद्ध झालेले आणि नंतर तेवढ्याच वेगाने धूसर झालेले कित्येक येऊन गेलेत. ज्याला असा दैवी स्पर्श झाला त्याला कदाचित आपल्यासारख्याच इतरांना ओळखण्याची शक्ती असावी, म्हणूनच लतादीदी यांनी सचिन तेंडुलकरला मुलगा मानलं असावं का? ठाऊक नाही. पण "मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे" असं म्हणणाऱ्या मंगेशकर कुटुंबियांना "माझ्याकडे देव माझा पाहतो आहे" या भावनेनेच प्रचंड आध्यात्मिक बळ दिलं असावं कदाचित.


एक १२-१३ वर्षांची मुलगी, वडील नुकतेच निवर्तलेले, आई आणि ४ लहान भावंडे यांचा सांभाळ करायचा. पावसात रक्षण करायला छत्रीदेखील नाही. अशी मुलगी १९४२ मध्ये फिल्म इंडस्ट्रीत गायला येते, तिच्या अनुनासिक नसलेल्या धारदार आवाजाची थट्टा होते, पण एक वेळ अशी येते की तिच्या आवाजाशिवाय एकही चित्रपट पूर्ण होऊ शकत नाही. तुटलेल्या चपला घालणारी मुलगी गानसम्राज्ञी होते..फक्त गात रहाते..त्यात स्वतःचा संसार थाटायचंही विसरते, पण जगाची गान-सम्राज्ञी होते. त्याचेही तिला आता अप्रूप नसते...तिच्या मनात गानमोगरा फुललेला असतो... स्वरवेलू गगनावरी जातो.. तो स्वरकल्पवृक्ष मंगेशीचा असतो आणि मंगेशीच्या त्या अमृतस्पर्शाने तसेच अमृतदृष्टीने आता स्वरलतेची अमृतलता झालेली असते, अमृतगंगा झालेली असते, तिला अमरत्व प्राप्त झालं असतं…

 

रवींद्र केसकर









 

No comments:

Post a Comment