डॉ. आनंदीबाई गोपाळ |
आनंदी गोपाळ!
जवळजवळ दीडशे वर्षांपूर्वी पुणे-मुंबई भागात राहणाऱ्या सौ. आनंदीबाई गोपाळराव जोशी
या गृहिणीचे साहित्यिक विश्वात उल्लेखलेले नाव! पण या व्यक्तीची खरी ओळख आहे ती म्हणजे
डॉ. आनंदी गोपाळ जोशी, एम डी, पेनसिल्वानिया विद्यापीठ, अमेरिका या नावाने! ज्या काळातील
भारतीय समाजात बायकाच काय, पण पुरुषदेखील समुद्र ओलांडणे टाळायचे, किंवा एखाद्या लग्न
झालेल्या स्त्रीने आपल्या शहरातदेखील एकटे जाणे दुरापास्त होते, जेव्हा भारतीय समाजातील
बहुतेक लोकांना इंग्रजी तसेच आधुनिक विज्ञान शिक्षणाची तोंडओळख देखील नव्हती, त्या
काळात आनंदीबाई जोशी ही एक अठरा वर्षांची स्त्री अमेरिकेत जाणारी पहिलीच भारतीय महिला
होती; एवढेच नव्हे तर तिथे जाऊन वैद्यकशास्त्रात एम.डी.सारखी सर्वोच्च पदवी मिळवलेली
त्या वेळच्या जगातल्या अत्यंत मोजक्या स्त्रियांमधली एक होती, यावर आजही विश्वास बसणे
कठीण आहे. डॉक्टर पदवी मिळवून डॉ. आनंदी गोपाळ जोशी भारतात परत येतात आणि एका वर्षाच्या
आत त्यांचा क्षयरोगाने मृत्यू होतो. निव्वळ परीकथा वाटावी अशी ही अद्भुत सत्यकथा, आणि
डॉ. आनंदी गोपाळ जोशी ही या कथेची नायिका. या कथेची पटकथा खऱ्या अर्थाने लिहिली आहे
ती नियतीने आणि तिला घडवले आहे ते आनंदी आणि गोपाळ जोशी या जोडप्याच्या जिद्दीने!
इसवी सन १८६५.
स्वातंत्र्याचा पहिला लढा होऊन उणीपुरी सात वर्षे झालेली. लोकमान्य टिळक हे त्या वेळी
एक शाळकरी मुलगा असणार आणि महात्मा गांधींचा जन्म व्हायला अजून चार वर्षे बाकी होती.
मुंबई विद्यापीठ स्थापन होऊन आणि इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने ईस्ट इंडिया कंपनीकडून
कारभार स्वतःच्या अखत्यारीत घेऊन थोडाच काळ लोटलेला. महात्मा फुले आणि सावित्रीबाई
फुले या दंपतीचा स्त्रीशिक्षणाचा प्रयत्न नुकताच झालेला. या काळात पुण्यातील एका सर्वसाधारण
कुटुंबात यमुना नावाची एक मुलगी जन्माला येते. मुलींना वयाच्या दहा वर्षांच्या आतच
उजवायच्या काळात, ह्या काळ्या-सावळ्या आणि ठेंगण्या, थोडक्यात अत्यंत सर्वसाधारण दिसणाऱ्या
यमूचे कसे जमवायचे हा प्रश्न तिच्या घरच्यांना पडला नसता तरच नवल. वय वाढून अविवाहित
राहण्यापेक्षा कसेतरी करून तिचे लग्न करून द्यावे अश्या विचारात असलेल्या कुटुंबापुढे
गोपाळ जोशी या बिजवराचे स्थळ चालून येते. वयामध्ये २० वर्षांचा फरक, वरून गोपाळरावांच्या
तिरसटपणाबद्दल ऐकलेले. ज्या काळात शिक्षण म्हणजे बहुतेक माणसांचा ऑप्शनला टाकलेला
(आणि बायकांना वर्ज्य) विषय, त्या काळात गोपाळराव जोशी हा पोस्ट ऑफिसमध्ये कारकुनी
करणारा गृहस्थ मुलीच्या वडिलांपुढे मुलीला लग्नानंतर शिकवण्याची अट घालतो आणि ती मान्य
करण्यापलीकडे मुलीच्या वडिलांना काहीच पर्याय नसतो. आता मान्य करू नंतर बघू, मुलंबाळं
झाली की जावईबापू सुधरतील (किंवा विसरतील) या आशेनी की काय यमूचे वडील या अटीला आणि
जावईबापूंना मान्यता देतात. इथेच सर्वांच्या नकळत नियतीने तिच्या सारीपाटाचा एक नवीन
डाव मांडलेला असतो.
लग्न झाल्यानंतरही
समाजमान्यतेप्रमाणे जाणती होण्याआधी आपली कथानायिका यमू, म्हणजेच आनंदी माहेरी असते
आणि तिथेच तिच्या शिक्षणाचा श्रीगणेशा होतो. नवऱ्याची प्रत्येक भेट ही ख्यालीखुशाली
समजून घेण्याऐवजी पाढे कुठपर्यंत पाठ झालेत, वाचन किती सुरू आहे, या गोष्टींची कडक
तपासणी असते. स्वयंपाक न शिकल्याने नाही तर सांगितलेला अभ्यास न केल्याने नवरा नाराज
होतो. असा जगावेगळा नवरा आजही मिळणे कठीण असेल, तर दीडशे वर्षांपूर्वी ह्या व्यक्तीला
कोणी पराकोटीचा तिरसट म्हटल्यास नवल नाही. कालांतराने आनंदी आपल्या पतीच्या घरी जाते
आणि एक आगळावेगळा संसार सुरू होतो. नोकरी सांभाळून नवरा घरची कामेही करण्यास तयार असतो,
पण बायकोने लवकरात लवकर अधिकाधिक शिकले पाहिजे, ही अट मागे घेण्यास तयार नसतो. बायकोच्या
अंगावर हात टाकणारे नवरे सगळ्या युगात झाले असतील, पण दिवसभरात सांगितलेले वाचले नाही
म्हणून बायकोच्या अंगावर हात टाकणारा हा जगातला पहिला आणि कदाचित एकमेव नवरा असावा.
कालांतराने आनंदी शिक्षितच नव्हे तर खऱ्या अर्थाने बहुश्रुत होते आणि अर्थातच गोपाळराव
जोशींना आपल्या हट्टाचे सार्थक झाल्यासारखे वाटते. इथपर्यंत ही कथा गोपाळराव जोशींच्या
आनंदी म्हणवणाऱ्या बायकोची आहे आणि ही कथा इथे कोणालाही आनंदीबाईंच्या शिक्षणाविषयी
अधिक काहीही न समजता संपायला हरकत नव्हती. पण कथालेखक नियतीला ते मान्य नव्हते. कालांतराने
आनंदीला दिवस राहतात, नवरा पुरोगामी आणि विज्ञाननिष्ठ असल्यामुळे गावातील वैद्याकडे
न जाता इंग्रज डॉक्टरकडे बायकोला घेऊन जातो. नवीन जीवाच्या चाहुलीमुळे मोहरलेली आनंदी
इंग्रज डॉक्टरच्या स्पर्शाने मात्र शहारते. परपुरुषाकडे मान वर करून बघणे देखील मान्य
नसताना त्याच्या वैद्यकशास्त्राला आवश्यक पण खाजगी प्रश्नांमुळे ती नि:शब्द होते. दिवस
पूर्ण झाल्यावर मुलगा होतो. दहाव्या-बाराव्या दिवशी ते मूल दिवसभर रडत असते आणि नवरा
कचेरीतून येऊन (डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे) वैद्यबुवांना घेऊन येईपर्यंत नेहमीसाठी शांत
होते. कदाचित शिक्षणामुळे आलेल्या विचारी बुद्धीमुळे असेल, पण आनंदी एकच प्रश्न स्वतःला
विचारते. माझ्या मुलाची इतकी वाईट स्थिती झाली असताना मला ते कळले कसे नाही? आणि त्या
प्रश्नाला तिला एकच उत्तर मिळते की वैद्यकशास्त्राचे ज्ञान नसल्यामुळे. ही केवळ माझी
परिस्थिती नाही, तर माझ्यासारख्या असंख्य सगळ्याच स्त्रियांची आहे. हे जाणून आनंदीला
प्रश्नाचे उत्तर मिळते आणि तिच्या शिक्षणावरच्या आत्मविश्वासातून ती निर्धारपूर्वक
बोलून जाते की "मी पुढचं शिकून डॉक्टर होणार आणि ही परिस्थिती इतरांवर येऊ नये
असा प्रयत्न करणार!" नियतीने इथे तिचा पहिला डाव टाकलेला असतो आणि आनंदी तिच्या
जिद्दीने तो जिंकण्यासाठी सरसावलेली असते.
शिक्षणासाठी
तिचा हात धरून ओढणारा तिरसट म्हणवणारा नवरा इथे तिच्या मागे जातो, पण ते नवराबायकोच्या
संबंधात इगो दुखावला म्हणून नव्हे, तर तिला खंबीरपणे पाठिंबा द्यायला, सावरून धरायला
आणि तिचे स्वप्न पूर्ण करायला. आता यापुढे ह्या कथेची नायिका तिची लढाई स्वतःच लढणार
असते.
सर्वप्रथम
प्रश्न येतो ते पद्धतशीरपणे इंग्रजी शिकण्याचा. कोल्हापुरात चर्चची गोऱ्या ख्रिश्चन
मुलींची शाळा तर सापडते, पण हिंदू मुलीला तिथे प्रवेश नसतो. कल्पक गोपाळराव एका पाद्रीबाबाशी
सूत जुळवतात आणि ख्रिश्चन धर्माकडे आकृष्ट झाल्याची बतावणी करतात. त्या वशिल्यावर आनंदीबाईंना
इंग्रजी शाळेत प्रवेश मिळतो आणि त्यांचे व्यावहारिक शिक्षण सुरू होते. एकटीने एकांतात
केलेला अभ्यास इथे कामी येतो आणि आनंदीबाई भराभर पुढच्या इयत्ता गाठायला लागतात. नववारी
साडी परिधान करून मोजे-बूट घालून शाळेत जाणारी महिला कोल्हापुरातील पुराणमतवाद्यांना
सहन होत नाही आणि आजच्या फॅशन समीक्षकांना मागे टाकील अश्या उत्साहात त्यांचा जोशी
कुटुंबावर टीका करण्याचा कार्यक्रम सुरू होतो. गोपाळ जोशी "खटास खट" असल्यामुळे,
तसेच इंग्रजांचे सरकारी नोकर असल्यामुळे पुराणमतवादी लोकांना दोन दिल्याच्या बदल्यात
दोन खावे पण लागतात. त्याचा सूड म्हणून मग जोशी कुटुंबाला वाळीत टाकण्याचा पुढचा टप्पा
गाठण्याचा प्रयत्न होतो, पण गोपाळरावांच्या सासूमुळे तो फिस्कटतो. मात्र जेव्हा गोष्ट
गोपाळरावांच्या पहिल्या बायकोच्या मुलाला विटंबित करण्यापर्यंत पोहोचते तेव्हा गोपाळरावांचे
टाळके सणकते आणि त्या सणकीत ते बायकोला घेऊन धर्मबदल करण्यासाठी चर्चमध्ये दाखल होतात.
त्या विधीमध्ये जेव्हा मंगळसूत्र काढण्याचा भाग येतो तेव्हा सुशिक्षित आनंदीबाई नवऱ्याला
आणि पाद्रीबाबाला ठणकावतात की जो धर्म मला मंगळसूत्रासकट मान्य करणार नाही त्याला मी
पण मान्य करणार नाही. सुशिक्षित बायको काय करू शकते याचा खरा अंदाज नवरेशाही गाजवून
निर्णयाची जबरदस्ती करणाऱ्या गोपाळरावांना येतो आणि तो निर्णय मान्य करण्यावाचून गोपाळरावांना
पर्याय उरत नाही. आता कथा अडकली असे वाटते न वाटते तोच गोपाळरावांची बंगाल प्रांतात
बदली होते.
त्या वेळचा
बंगालमधील पुरोगामी धडाका बघून कदाचित गोपाळरावांनीच ती बदली मागून घेतली असेल, असे
असावे. १८५७ नंतर बंगालमध्ये झालेले राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर यासारख्या
समाजसुधारकांमुळे स्त्री शिक्षणाबाबत तिथे मोकळे वातावरण होते, त्याचा फायदा मिळेल
असा गोपाळरावांचा अदमास असावा. आणि खरंच तिथे गेल्यावर आनंदीबाईंचे पुढचे शिक्षण जोरात
सुरू होते. आनंदीबाईंना बंगाल मेडिकल कॉलेजला सुरुवातीच्या वर्षांमध्ये प्रवेश मिळतो.
पण नियतीने आनंदीसाठी वेगळाच रंगमंच निवडलेला असतो. कोल्हापूरच्या पाद्रीबाबांच्या
अमेरिकेतील एका पाद्री मित्राशी गोपाळरावांचा संपर्क असतो. आनंदीबाईंनी ख्रिस्ती धर्म
स्वीकारला की ताबडतोब त्यांना बोलवायला अमेरिकेचे पाद्रीबाबा तयारीत असतात. पण आनंदीबाईंच्या
निर्धाराने ते राहते, तरीही ह्या घटनेने आणि आनंदीबाईंच्या शिक्षणाच्या जिद्दीने प्रभावित
होऊन अमेरिकेचे पाद्रीबाबा रॉयल वाईल्डर प्रिन्स्टन रिव्यू या मासिकात आनंदीबाईंबद्दल
आणि त्यांच्या जिद्दीबद्दल लिहितात. तो लेख एका दंतवैद्याच्या दवाखान्यात आपल्या क्रमांकाची
वाट बघणाऱ्या कार्पेंटर आडनावाच्या बाईंच्या वाचनात येतो. आनंदीबाईंची जिद्द बघून त्या
आनंदीबाईंना पत्र लिहितात आणि एक अनोखा संवाद सुरु होतो. कदाचित नियतीने कार्पेंटर
बाईंची नुकतीच आनंदीची "गार्डियन एन्जल" म्हणून नियुक्ती केलेली असते.
कालांतराने
कार्पेंटर बाईंच्या मदतीने आनंदीबाईंना पेनसिल्वानियाच्या वूमन मेडिकल कॉलेजमधून बोलावणे
येते, पण ते त्यांना एकटीलाच, गोपाळरावांचे जाण्याचे जमत नाही. एकटे जायला आनंदीबाई
कचरतात, पण गोपाळराव पक्के, त्यांना ही संधी सोडायची नसते आणि ते तिला एकटीला जायला
कसेबसे मनवतात. पुरोगामी म्हणवणाऱ्या बंगालमध्येही स्त्रीने शिक्षणासाठी एकटीने परदेशात
जावे ही घटना पचनी पडायला जड जाते तेव्हा आनंदीबाई श्रीरामपूरच्या सार्वजनिक सभेत स्वतःला
व्यक्त करतात. स्त्रीने वैद्यकीय शिक्षण घेतले नाही तर तुमच्या मुलीबाळींना परदेशी
डॉक्टरने हात लावला तर तुम्हाला चालेल काय? आणि चालणार नसेल तर त्यांना तसेच आजारी
सोडणार काय? तसेच तान्ह्या मुलांना वैद्यकीय उपचार आईचे हृदय असलेल्या स्त्रीनेच का
देऊ नये? याला श्रीरामपूरच्या सार्वजनिक सभेकडे उत्तर नसते आणि आनंदीबाईंचा मार्ग निर्धोक
होतो. दोन इंग्रजी महिलांसोबत स्वतःचा धर्म, कुंकू आणि मंगळसूत्र शाबूत ठेऊन ही विवाहित
हिंदू महिला एकटी अमेरिकेत जाण्यासाठी बोटीत चढते. ही घटनाच सर्व बाबतीत अतर्क्य. नियतीचा
ललाटलेख आनंदीबाई आणि गोपाळराव जोशी ह्या जोडप्याच्या जिद्दीने आता प्रत्यक्षात उतरवलेला
असतो.
आनंदीबाईंसाठी
अमेरिकेत येणे सोपे नव्हतेच, पण तिथे आनंदी तग धरेल काय? मागचे दोर आधीच कापले गेले
आहेत, अश्या परिस्थितीत आनंदीबाई पेनसिल्वानियाच्या वूमन मेडिकल कॉलेजच्या आवारात प्रवेश
करतात आणि तेथील विस्तृत जमिनीवर आणि प्रशस्त दालनात आपली छोटी पण निर्धारयुक्त पाऊले
उमटवायला सुरुवात करतात. आनंदीला तिथे सख्या मिळतात त्या सीरिया आणि जपानमधून आलेल्या
अनुक्रमे तबत इस्लामबुली आणि की ओकामी या विद्यार्थिनी. अमेरिकेतील कडक हिवाळा भारतीय
वेष आणि शाकाहारी जेवणाच्या भरवशावर सहन होणार नसतो. त्यांचा जुना खोकला क्षयाच्या
रूपात उसळतो आणि आता लढाई सुरू होते ती शरीर आणि वेळेशी. ते कसेबसे सांभाळून आनंदी
स्वतःला संपूर्णपणे अभ्यासात बुडवून घेते. तीन वर्षांनी तिचा अभ्यास पूर्ण होतो. १८८६
मध्ये हातात एम.डी.ची पदवी मिळणार ही अतर्क्य घटना भारतात गाजते. तोपर्यंत बंगालच्या
गंगेतून बरेच पाणी वाहून गेलेले असते. त्या प्रसंगाला हजर राहण्यासाठी गोपाळराव अमेरिकेत
पोहोचतात, तसेच पंडिता रमाबाई या मराठी समाजसुधारक देखील. त्या वेळची जगसम्राज्ञी व्हिक्टोरिया
राणीचा अभिनंदनपर संदेश येतो जो आजही त्या पेनसिल्वानिया विद्यापीठाने जतन करून ठेवला
आहे. त्यानंतर गोपाळराव आपल्या पत्नीला भारतात घेऊन येतात तेव्हा त्यांचे प्रचंड स्वागत
आणि कौतुक होते. काय वाटले असेल त्या वेळेस गोपाळराव आणि आनंदीबाईंना? महाराष्ट्रात
लोकमान्य टिळक केसरीमधून ह्या घटनेला ठळक प्रसिद्धी देतात. आनंदीबाईंना ज्या कोल्हापुरात
त्रास झाला त्याच कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात प्रमुख डॉक्टरचा हुद्दा मिळतो. पण
नियतीची कथा संपत आलेली असते, आनंदीबाईंचा क्षय बळावतो, क्षयरोगाचे औषध अजून सत्तर
वर्षे वैद्यकशास्त्राला मिळणार नसते. त्यामुळे त्या वेळी मृत्यूचे दुसरे स्वरूप म्हणवणारा
हा आजार डॉ. आनंदीबाईंना आपल्या कवेत घेतो आणि आनंदीबाई वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी
अत्यंत अविश्वसनीय असे आयुष्य जगून ह्या जगातून निघून जातात.
नियतीची कथा
ह्या कथानायिकेसोबतच जरी संपलेली असली, तरी पण आता त्या कथेचा पोवाडा होणार असतो.
समाजातील
स्त्रियांचे उपचार करण्याचे डॉ. आनंदीबाईंच्या स्वप्न अधुरे राहते, पण त्यांच्या कथेतून
प्रेरणा घेऊन वैद्यकशास्त्र शिकायला अधिकाधिक स्त्रिया पुढे सरसावतात. बंगालमधील डॉ.
कादंबिनी गांगुली यादेखील १८८६ मध्येच कलकत्त्यातून वैद्यकशास्त्राचा अभ्यास पूर्ण
करतात ज्या वर्षी आनंदीबाई अमेरिकेत एम डी होतात. त्यानंतर डॉ. कादंबिनी इंग्लंडमधून
पुढील अभ्यासक्रम पूर्ण करून परत येतात आणि भारतातील पहिल्या व्यावसायिक डॉ.क्टर होतात.
तसेच महाराष्ट्रातील डॉ. रुख्माबाई राऊत ह्या त्यानंतर १८९४ मध्ये इंग्लंडमध्ये एम
डी होऊन भारतातील सरकारी रुग्णालयात आपले वैद्यकीय ज्ञान सर्वसामान्य लोकांच्या सेवेसाठी
देतात. डॉ. कादंबिनी आणि डॉ. रुख्माबाई यांच्या सुदैवाने त्यांचे वडील हे अत्यंत पुरोगामी
तसेच श्रीमंत असल्यामुळे डॉ. आनंदीबाई आणि गोपाळरावांचा संघर्ष त्यांच्या वाटेला आला
नाही. तसेच दीर्घायुष्य मिळाल्यामुळे त्यांना भारतीय समाजमनावर जास्त परिणाम करता आला.
पण आनंदीबाईंचा संघर्ष आणि जिद्द यांनी एक वेगळेच गारुड निर्माण केले आहे, आणि त्याची
मोहिनी दीडशे वर्षांपासून कायम आहे. डॉ. आनंदीबाईंवरचे पहिलेच चरित्र १८८८ मध्येच एका
अमेरिकन महिलेने लिहिले. त्यात गोपाळरावांच्या तिरसटपणावर जरा जास्तच ताशेरे ओढल्यामुळे
ते गाजले. इथे गोपाळरावांनी त्यांचा तिरसटपणा थोडा अधिक ताणला असता तर कदाचित बरे झाले
असते, असे वाटते. जर गोपाळरावांना कल्पना असती की अमेरिकेतील कठीण हिवाळा सहन करायचा
असेल तर मांसाहारात असणारी ऊर्जा उपयोगी पडू शकते तर त्यांनी निश्चितच आपल्या पत्नीला
त्याचा आग्रह केला असता आणि कोणी सांगावे त्यांचे आयुष्य थोडे वाढलेही असते. ज्या कार्पेंटर
बाईंनी आनंदीबाईंना डॉक्टर व्हायला मावशीच्या मायेने मदत केली त्यांनी डॉ. आनंदीबाई
गेल्यावर त्यांच्या अस्थी अमेरिकेला बोलावून घेतल्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या
न्यूयॉर्क राज्यातील पुगकिप्सी (Poughkeepsie) गावातील ख्रिश्चन स्मशानभूमीत आपल्या
दिवंगत कुटुंबियांसोबत मृत्युशिलालेखासोबत पुरल्या. डॉ. आनंदीबाईंच्या आयुष्यावर अनेक
कादंबऱ्या आल्या, दूरदर्शनवर मालिका आल्या आणि गेल्याच महिन्यात "आनंदी गोपाळ"
ह्या नावाने एक नितान्तसुन्दर मराठी चित्रपटही आला. हा चित्रपट ऑस्करला जावा असे अनेक
प्रेक्षकांचे मत पडले, ते होवो वा न होवो, पण नवीन पिढीने (तसेच सर्वानीच) बघण्यासारखा
हा चित्रपट आहे. डॉ. आनंदीबाईंच्या नावाने लखनौला तसेच महाराष्ट्र शासनाकडून वैद्यकशास्त्राशी
संबंधित पुरस्कार देण्यात येतात. अमेरिकेत त्यांचे नाव आजही लक्षात ठेवले जाते आहे.
स्त्रियांचा प्रतिनिधी ग्रह मानल्या जाणाऱ्या शुक्रावर एका विवराचे नाव आनंदीबाईंच्या
नावाने "जोशी" असे देण्यात आले आहे. गूगलने मागल्या वर्षी लक्षात ठेऊन त्यांच्या
वाढदिवशी एक डूडल त्यांना अर्पण केले आणि इंग्लंडमधील टेलिग्राफ दैनिकाने त्यांच्यावर
लेख लिहिला. पेनसिल्वानियाच्या विद्यापीठाने व्हिक्टोरिया राणीचे आनंदीबाईंचे अभिनंदन
करणारे पत्र जपून ठेवले आहे हे आधी सांगितलेच. ही मोहिनी आहे, डॉ. आनंदीबाई जोशी या
व्यक्तीची नव्हे, तर सामान्य परिस्थितीत असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या एका विजिगीषू
वृत्तीची. डॉ. आनंदीबाईंना अल्पायुष्य लाभले, कदाचित नियतीने त्यांना तेवढीच भूमिका
दिली असेल, पण त्यांची वृत्ती दुर्मिळ तशीच अमर आहे. त्या वृत्तीला स्थळ-काळ-पिढी-समाजरूढी
यांचे बंधन नाही, आणि कदाचित त्यामुळेच ही कथा एक अकल्पित अशी सत्यकथा आहे जी आजही
सर्वांना खुणावते.
दहा वर्षांपूर्वी
अमेरिकेत दोनदा काही कामाच्या निमित्ताने जाणे झाले, पुढे कदाचित जाणे होईल न होईल,
आणि झाले तर ते केव्हा याची निश्चिती नाही. पण आनंदीबाईंचे चरित्र समजल्यावर एक असं
नक्कीच वाटतं की पेनसिल्वानियातील वूमन मेडिकल कॉलेज (आताचे ड्रेक्सेल मेडिकल कॉलेज)
ची पायधूळ माथ्यावर चढवावी आणि न्यूयॉर्कमधील डॉ. आनंदीबाईंच्या मृत्युशिलालेखाच्या
बाजूला आदर आणि कृतज्ञता म्हणून दोन फुले (आणि कदाचित त्यावेळी डोळ्यात आलेले अश्रू)
अर्पण करावेत. कोणी सांगावं त्या धूलिकणांनी आपल्याही आयुष्याचं सोनं होऊ शकेल!
रवींद्र केसकर
No comments:
Post a Comment