महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमांना प्रेक्षकांची अनुपस्थिती 'एक धांडोळा '



म्हटलं तर एक अतिशय सोपा पण अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा विषय! क्षणार्धात वीज चमकावी तशी कारणांची लख्ख मालिका मनात चमकून गेली, आणि जाणवलं या विषयाला अतिशय सूक्ष्म असे अनेक कंगोरे आहेत. तसं बघायला गेलं तर कुठल्याही ठिकाणी, कुठल्याही कार्यक्रमासाठी असणारी उपस्थिती किंवा त्या कार्यक्रमाचे यश हे साधारण त्या कार्यक्रमाचा दर्जा, कार्यक्रमाचा प्रकार, वक्ते/ गायक, कार्यक्रम सादर करणाऱ्यांची लोकप्रियता अशा विविध गोष्टींवर अवलंबून असते. आणि यासाठी सर्वात महत्वाची असते प्रेक्षकांची त्या कार्यक्रमाला येण्याची इच्छाशक्ती, प्रवासाची अनुकूलता आणि वेळेची उपलब्धता!

बंगलोर सारख्या परप्रांतात जेंव्हा मराठी कार्यक्रम आयोजले जातात तेंव्हा मराठी बांधवांकडून उदंड प्रतिसाद मिळणे अपेक्षितच आहे. कारण या कार्यक्रमांद्वारे आपल्याला मातृभाषेशी जवळीक साधता येते आणि इतर अनेक मराठी भाषिकांना भेटण्याची संधीही त्या निमित्ताने लाभते. पण तरीही संयोजकांनी मोठ्या कष्टाने आयोजलेल्या अशा कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थिती अभावानेच आढळते. काय बरे कारणं असावीत याच्या मागे? या कारणांची यादी बनवायची ठरवली तर ती अशी असेल-
बंगलोर IT hub असल्याने अनेक मराठी माणसं येथे अर्थार्जनासाठी येऊन स्थायिक झाली आहेत. बंगलोर हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने खूपच विस्तारलेले असल्याने येथील मराठी बांधव दूरदूरच्या परिसरात विखुरलेले आहेत. माझ्या मते कार्यक्रमांसाठी एखादं मध्यवर्ती ठिकाण शोधणं हा या वरचा एक महत्त्वाचा उपाय ठरू शकेल.

बंगलोर मधील वाहतूक समस्या हे एक कारणं आहेच. या समस्येवर काय उपाय महाराजा?
काही वर्षांपूर्वी बंगलोरवासीय मराठी लोकांचे प्रमाण अत्यल्प होते. मराठी भाषा कानावर पडणे दुर्लभच होते. त्यावेळेस मराठी कार्यक्रम जणू सुवर्ण संधीच असे. मराठीच्या ओढीने मोठ्या धडपडीने लोक कार्यक्रमांना जात असत. पण आता चित्र बरेच बदलले आहे
आधुनिक तंत्रज्ञानातील वेगवान प्रगतीमुळे दूरदर्शन आणि इतर सामाजिक माध्यमांचे प्राबल्य वाढले आहे. दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांवरील कार्यक्रमांतून मराठीची भूक बऱ्यापैकी भागत आहे
मराठी इ-वृत्तपत्र आपल्या finger tips वर आहे. WhatsApp सारख्या माध्यमांतून घरबसल्या आपण आप्तस्वकीय, मित्रमंडळींच्या संपर्कात राहू शकतो. खरंच … "कालाय तस्मै नमः"

गणपती, दिवाळी यांसारखे सण आणि उत्सव आपले अनेक मराठी बांधव आपल्या मूळ गावी जाऊन साजरा करणे पसंत करतात. हे ही एक या प्रमुख सणांच्या वेळेस कार्यक्रमांच्या अनुपस्थितीचे कारण असू शकते. सणाच्या आधी किंवा नंतर कार्यक्रमांचे आयोजन केले तर ... पण हा उपाय तितकासा पटत नाही राव! 
मराठी बांधवांच्या वाढत्या संख्येमुळे बंगलोर मधील मराठी मंडळांची संख्याही वाढत आहे. काही मराठी बांधव एका पेक्षा अधिक मंडळांचे सभासद आहेत. त्यामुळे दोन्ही मंडळांत एकाच वेळी कार्यक्रम असल्यास उपस्थितीवर विपरीत परिणाम होतो. यासाठी कार्यक्रम आयोजित करतांना या सर्व मंडळांमध्ये समन्वय साधणे आवश्यक आहे.
बंगलोर मधील माझ्या एक वर्षाच्या वास्तव्यात मला जाणवलेली ही काही कारणं! माझ्याप्रमाणेच इतरांनीही मांडलेल्या कारणांवर विचारमंथन होऊन कार्यवाही होणं ही या कारणमीमांसेची फलश्रुती असेल.

आपले मराठी बांधव सुजाण आहेत. सर्वांनाच आपल्या मातृभाषेबद्दल प्रेम, जिव्हाळा आणि रास्त अभिमान असतोच. पण आता गरज आहे ती परप्रांतात आपल्या प्रिय मराठी भाषेची अस्मिता जपण्याची. एक सामाजिक बांधिलकी, सामाजिक दायित्व म्हणून या गोष्टींकडे बघितलं गेलं पाहिजे. कलाकारांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी, पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी रसिक प्रेक्षक वर्ग हा हवाच. "सोत्साहानां नास्त्यसाध्यम् नराणाम" अर्थात उत्साही लोकांना कुठलीच गोष्ट अशक्य नसते, होय ना?
चला तर मग आपल्या उत्साही आयोजकांना साथ देऊया जास्तीत जास्त उपस्थितीने !!



सौ. शुभदा पाठक


No comments:

Post a Comment