आठवणीतला साखरआंबा



ते आंब्याचे झाड 'साखरीचा आंबा' म्हणून ओळखले जायचे. त्या आंब्याकडे पाहात आम्ही भाऊ लहानाचे मोठे झालो. तीन बिगा नावाच्या शेतात एका कोपऱ्यात बांधावरती हे झाड वडाच्या झाडासारखे आजूबाजूला पसरले होते. माझ्या माहितीप्रमाणे आमच्या आजोबांनी हे झाड लावले होते. आंब्याचा बुंधा एवढा मोठा होता की आम्ही मित्र लहान असताना आंब्याभोवताली लपाछपीचा आणि सूरपारंबीचा डाव खेळायचो. अतिशय सहजपणे आंब्यावरती चढता येत होते. एकदा का शाळेला उन्हाळ्याची सुट्टी लागली की आम्ही लहान मुले त्या आंब्याभोवती असायचो. कधी मीठ आणि चटणीबरोबर कैरी खायचो तर आंब्याला पाड लागल्यावर आम्ही झाडावरून पाड पडण्याची वाट पाहात बसायचो. नावच त्याचे साखरी आंबा असल्याने अतिशय, गोड, रुचकर आणि चविष्ट होता. आम्ही झाडावर चढूनही आंबे खाल्ले आहेत. आंब्यावरती बसून पाड खाण्याची मजा काही वेगळीच असते. कधी शेतातील दगड उचलून पाड किंवा कैरी पाडण्याचा प्रयत्न करायचो. आजोबांचा गोतावळा मोठा होता. सर्व जण मामाच्या गावाला, म्हणजे आजोबांच्या घरी उन्हाळ्यात आंबे खाण्यासाठी मुक्कामी येत असत.


एकदा का आंब्याच्या झाडाला पाड लागला की दोन ते तीन दिवसांनंतर आम्ही भाऊ आणि मित्र झेलणी घेऊन आंबा उतरवण्यासाठी जात असू. झेलणी म्हणजे आंबे तोडायचं आयुध. एका मोठ्या काठीच्या एका टोकाला एक पिशवी, तोंड उघडं राहील अशी लावलेली असते. काठीच्या खाचेत आंबा पकडून तो तोडला जातो. अशा प्रकारे पाच ते सहा आंबे झेलणीत आले की ते खाली असणाऱ्या व्यक्तीकडे टाकले जात आणि खाली उभी असणारी व्यक्ती तो पोतडं घेऊन पकडत असत. कधी कधी बादलीला दोर बांधून बादली झाडावरती फांदीला बांधली जात असे आणि झेलणीतील आंबे बादलीत ठेवून, बादली पूर्णपणे भरल्यानतंर खाली सोडली जात असे. खाली उभी असणारी व्यक्ती बादलीतील आंबे काढून घेत असत आणि परत ती बादली झाडावरती असणाऱ्या व्यक्तीकडे पाठवत असत. आंबा उतरवण्यासाठी जवळपास पूर्ण दिवस लागत असत. 

पूर्वी उन्हाळ्यात खेडेगावातील लोक शेतामधे वस्ती बनवून राहात असत. आंब्याला एकदा का पाड लागला की शेतामधे वस्ती करून राहणारे लोक सकाळी लवकर उठून पाड शोधण्यासाठी आंब्याची झाडे धुंडाळत असत. काही वर्षांपूर्वी राज्यात तीव्र दुष्काळ पडला आणि सर्व झाडे पाण्याअभावी जळून गेली. त्या वेळेस दुष्काळ एवढा भयंकर होता की आमच्या मालकीची दहाही आंब्याची झाडे सुकून गेली.

आज त्या साखरी आंब्याची आठवण अनेकदा येते. मे महिना आला की, कधी एखादा मामे भाऊ भेटला की! आता वाटते त्या आंब्याने अशा अनेक साखरी आठवणींचीही पेरणी आमच्या मनात केली. त्यामुळे ती झाडे सुकली तरीही आम्हां सगळ्यांच्या मनातील आंब्याचे झाड सदा मोहरलेले असते. 



गणेश शिंदे




No comments:

Post a Comment