Conversation between Adam and Eve must have
been difficult at times because they had nobody to talk about. – Agnes Repplier
‘उद्या रात्री आठ वाजता ‘गप्पा
मारायला’ आमच्या घरी भेटायचं…’
असं आमंत्रण आलं की उद्याच्या गप्पा काही खास
रंगणार नाहीत हे आता मला आधीच कळतं.
हो,
आधीच
कळतं. कारण ‘गप्पा मारणे’ ही वाटते तितकी साधी गोष्ट नाही. ती एक कला आहे. ती अनुभवाने
आत्मसात करून घेता येते.
त्यासाठी रंगलेल्या आणि न रंगलेल्या अशा लक्षावधी
गप्पांच्या फडांचे तुम्ही साक्षीदार असणं आवश्यक असतं. तुमच्याकडे समोरच्याला ऐकायचे
पेशन्स असायला हवेत. समोरचा दमल्यावर तुमची स्वतःची वाफ खर्च करायची तयारी हवी. त्यासाठी
स्वत:ची महत्त्वाची कामं बाजूला ठेवायची तयारी हवी. प्रसंगी जागरणं करायची ‘योगसाधना’
हवी. गप्पा रंगणे किंवा न रंगणे यामधली अनप्रेडिक्टेबिलिटी पचवायची ताकद हवी. या अगदी
बेसिक गोष्टी जमल्या की तुम्ही ‘गप्पा क्लब’चे क्वालिफाईड सभासद झालात म्हणून समजा.
आणखी एक. सुख जसं सांगून येत
नाही, तशा गप्पा ‘ठरवून’ रंगत नाहीत.
गप्पा ध्यानीमनी नसताना अचानक रंगतात. ठरवून फक्त बोलणी होतात. त्या गप्पा नसतात. गप्पा
ऐसपैस असतात. अनिर्बंध असतात. गप्पा मारताना घड्याळ बघणं हा ‘फाऊल’ मानतात. गप्पा मारताना
‘गप्पा’ हीच प्रायोरिटी असते. बाकी सगळं झूट असतं. गप्पांना विषयांचे बंधन नसते. कुणाविषयी
गॉसिप करताना सुरु झालेल्या गप्पा ज्ञानेश्वरीतल्या एखाद्या एका ओवीपर्यंत येऊन थांबू
शकतात. ‘थांबू शकतात’ असं दुर्दैवाने म्हणायचं. कारण गप्पांना खरं तर अंत नसतो. पूर्वीच्या
ऋषीमुनींच्या यज्ञात असुर थैमान घालीत त्याप्रमाणे आता मोबाईलवर येणारे कॉल्स गप्पांमध्ये
थैमान घालतात. आपण कुणाशीतरी जगजीतच्या एखाद्या गज़लविषयी बोलत असतो आणि नेमकं त्याच
वेळी ‘फोनवरच्या बायकोला’ पुढल्या पाच मिनिटात अर्धा किलो तुरीची डाळ हवी असते. गप्पांना
अपूर्णतेचा शाप असतो. गप्पा पूर्ण होऊही नयेत. गप्पा पूर्ण होऊ शकणारही नाहीत.
गप्पा मारणारी घरं मला आवडतात.
मी स्वतःला भाग्यवान मानतो की, अशा काही मोजक्या घरांनी मला
आपलंसं केलंय. तिथे मी सैल होतो. सगळे मुखवटे गळून पडतात. मी काय बोलतोय,
काय
कपडे घातलेत, आत्ता कसा दिसतोय,
हे
बोलू का-ते बोलू वगैरे मुद्द्यांवर फार विचार करावा लागत नाही. अशी घरं सुरुवातीला
चार-चौघांसारखी दगड विटांची असतात. मग हळूहळू त्यात जीव येऊ लागतो. तिथे राहणारी माणसं
त्या भिंतीत प्राण फुंकतात. अशा घरांचे उंबरठे आपलं स्वागत करण्यासाठी नेहमीच आतुर
असतात. इथे ‘बेल’ वाजवावी लागत नाही. ‘च्याssयला किती उशीर’ अशा प्रेमळ
उद्गारांनी आपले स्वागत करणारे यजमान असतात. सोफ्यावर वगैरे न बसता आपण खाली मस्त पाय
पसरून बसलो तर त्या घरातल्या मंडळींना त्यात काही ऑड वाटत नसतं. या घरातली चहा पावडर
कधीही संपलेली नसते. हातपाय धुवून झाल्यावर यांच्या किचनमध्ये जाऊन लुडबूड करण्याचा
आपल्याला अधिकार असतो. ‘मला भूक लागल्ये’ हे आपण तिथे निर्लज्जपणे सांगू शकतो. आपण
जातो तेव्हापासून इथला टीव्ही बंद असतो. मग जेवणाची पानं घेतली जातात. जेवताना काहीतरी
माफक बोललं जातं. मग सुरू होतो यज्ञ – गप्पांचा. पानातलं जेवण संपलेलं असतं. पण उष्ट्या
हातांनी आपण बोलत राहतो. हात धुवायचीही गरज नाही, इतके कोरडे झालेत हात. मग नाईलाजाने
उठून हात धुण्यासाठी काय तो ब्रेक. मग तोंडात बडीशेप ठेवून पुढली इनिंग सुरु होते.
भरपूर जेवून जडवलेली शरीरे आता जमिनीचा आसरा घेतात. आता गप्पांना उधाण आलेलं असतं.
अकरा-बारा-एक…घड्याळाचे काटे निमूटपणे सरकत राहतात. इतक्यात किचनमधून ‘जागरणी कॉफीचा’
घमघमाट येऊ लागतो. सत्यनारायण पूजेतल्या प्रसादाचा शिरा जसा पुजेच्याच दिवशी सॉलिड
लागतो, तसा या कॉफीचा स्वाद रात्री
एक वाजता लागतो तसा कधीही लागत नाही ! कारण स्वाद त्या कॉफीत नसतो. तो ‘माहोल’ स्पेशल
असतो. गप्पा कुठल्या विषयावर सुरू झाल्या होत्या, कुठे कुठे भरकटत गेल्यात आणि
शेवटी कुठे येऊन संपल्यात हे जर तिथल्याच कुणी गुपचुप बसून लिहून काढलं तर आपल्या गप्पांची
रेंज पाहून आपणच थक्क होऊन जाऊ. रात्रीच्या गप्पांची आणखी एक मजा असते. अतिशय थिल्लर
विषयांवर सुरू झालेल्या गप्पा हळूहळू भावनिक आणि गंभीर होत जातात. रात्रीची शांतता,
तो
बाहेरचा काळोख या गंभीर गप्पांना एक छान पार्श्वभूमी तयार करत असतात. सगळं वातावरणच
मग भारल्यासारखं होतं. मी अशा अनेक अनेक क्षणांचा साक्षीदार राहिलो आहे. काय जादू होते
माहित नाही, माणसं या वेळी स्वतःच्या आत
डोकावून बोलतात. जुन्या आठवणीमध्ये रमतात. हळवी होतात. त्या खोलीत एक मायावी शक्ती
संचार करते. मधेच सगळे गप्प होतात. निःशब्द शांतता. मागे फक्त रातकिड्यांचा आवाज. असेच
सगळे गप्प बसलो तर कोणीतरी म्हणेल,’बापरे,
तीन
वाजले. झोपू या.’ या एका ‘भीती’पायी कोणीतरी मग कसलासा विषय काढणार. परत सुरू…मघाशी
मी ‘मायावी’ शब्द वापरला तो यासाठी की याच वेळी अनेकदा माणसं गप्पांमध्ये काही रहस्य
फोडतात ! ‘कुणाला सांगू नका…’ अशा काहीश्या वाक्याने सुरुवात होऊन रहस्यभेद होतात.
आता यावर पुढे चर्चा झाली नाही तर छातीवर भार येऊन हार्टअटॅक या भीतीने आपण बोलत राहतो….मग
गप्पांची ‘नशा’ चढते आणि आपली गाडी हळूहळू फिलॉसॉफीवर येते. आयुष्याचा अर्थ,
या
अफाट सृष्टीतील आपले नगण्य अस्तित्व, माणसे अशी का वागतात,
सुख
म्हणजे नक्की काय, आपण सुखाच्या मागे किती पळतोय…वगैरे
साक्षात्कार होत होत हळूहळू जांभया येऊ लागतात. जीभ आणि डोळे जड होतात. काही मिनिटांपूर्वी
‘जीवनाचा अर्थ’ उकलून सांगणारी माणसं आता ऑफिसमध्ये पडलेल्या उद्याच्या कामांचे दाखले
देत झोपी जाऊ लागतात. खोलीत पूर्ण काळोख होतो. त्यातही आता झोप उडालेले किमान दोन असतातच.
मग गादीवर पडल्या पडल्या गप्पा सुरु होतात. पारलौकिक जगातल्या मघाचच्या गप्पा आता सासूबाई,
मोबाईलच्या
किमती, लहान मुलं कशी जेवत नाहीत वगैरे
लौकिक स्तरावर आलेल्या असतात.
वरकरणी हे सगळं वर्णन खूप विरोधाभासी
आणि सामान्य वाटू शकतं. But I love this. I love this माहोल.
गप्पांनी माझं आयुष्य समृद्ध
केलंय. गप्पा मारल्याशिवाय मी जगू शकत नाही. आवडत्या लोकांबरोबर,
अनोळखी
लोकांबरोबर गप्पा मारणे हा माझ्या आयुष्यातला ‘अन्न-वस्त्र-निवारा-ऑक्सिजन व वाय-फाय’
यांच्या नंतर येणारा महत्त्वाचा घटक आहे. नुसती गप्पा मारणारी माणसे काम कमी आणि बोलतात
जास्त, या ओळीतले तथ्य,
या
ओळीतला आरोप मला सपशेल मान्य आहे. त्यासाठी एकांतवास सोडून कुठलीही शिक्षा भोगायला
मी तयार आहे. माझ्या काही खास मित्र-मैत्रिणींसोबत मारलेल्या गप्पा हे माझ्या आयुष्याचे
संचित आहे. एक लेखक म्हणून मला गप्पांमधून लिहिण्यासाठी खूप विषय मिळतात हे जरी खरं
असलं तरी माणूस म्हणून घडण्याच्या या प्रवासात पुन्हा पुन्हा यावेसे वाटणारे ‘गप्पा’
हे खूप महत्त्वाचे स्टेशन आहे. गप्पा तुम्हाला खुप शिकवतात. जगण्याची समज देतात. ‘गप्पा
मारणे’ हा आपल्या भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. आपण भारतीयांनी ही कला नेहमीच
सेलिब्रेट केलीय.
या गरमियों की रात जो पुरवाईयाँ चलें..
ठंडी सफ़ेद चादरों पे जागें देर तक
तारों को देखते रहें छत पर पड़े हुए
दिल ढूँढता है…
नेमकं हेच तर मांडताहेत गुलज़ारसाहेब
! यातले ‘पुरवाईयाँ’ (पूर्वेकडून येणारे वारे) आणि ‘ठंडी सफ़ेद चादरों पे’ हे शब्द
कमालीचे मोहक आहेत. या चार ओळीत गुलज़ारसाहेबांनी गप्पांचा तो ऐसपैस माहोल,
तो
अघळपघळपणा, छोट्या छोट्या गोष्टींतला आनंद
नेमकेपणाने उतरवलाय. हेच गुलज़ारसाहेब गप्पांविषयी एका गाण्यात खूप मार्मिकपणे लिहितात.
चप्पा चप्पा चरखा चले ! चप्पा चप्पा म्हणजे नाक्या-नाक्यावर. चरखा चले म्हणजे
गप्पांची टकळी चालू आहे ! नाक्या-नाक्या वर गप्पांची
टकळी चालू आहे !
मी आनंदवन-हेमलकसा-सोमनाथला
जात असतो. तिथले जुने कार्यकर्ते एखाद्या जागेकडे बोट दाखवून सांगतात,
इथे
बाबा (आमटे), पुलं,
कुमार
गंधर्व, वसंतराव देशपांडे,
भीमसेन
जोशी गप्पा मारत बसायचे. मी त्या जागेकडे पाहतच राहतो. प्रामाणिकपणे सांगायचं तर,
हेवाच
वाटतो त्या जागेचा. इथल्या गप्पांची उर्जा घेऊन ही सर्व माणसं आपापल्या क्षेत्रांत
डोंगराएवढं काम करत होती. त्या सर्व उर्जेचं एक माध्यम म्हणून त्या जागेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
गप्पांविषयीची आणखीन एक हृद्य
आठवण सांगतो. खुप वर्षांपूर्वी पार्ल्याच्या दिनानाथ नाट्यगृहात संगीतकार सुधीर फडके
यांचा सत्कार होता. त्यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त. कार्यक्रमाला दिग्गज
मंडळी
उपस्थित होती. मी आणि माझा एक मित्र कार्यक्रम चालू असतानाच काही कामानिमित्त बाहेर
गेलो. बाहेरून परत आलो, तर ‘दिनानाथ’च्या बाहेरच्या
लॉबीमध्ये वपु काळे एकटेच बसलेले. आत कार्यक्रम चालू. त्यामुळे बाहेर गर्दी नव्हती.
मनात आलं, अशी संधी परत नाही येणार. सगळी
भीड बाजूला ठेवून आम्ही वपुंकडे गेलो. माझं ‘काळे’ आडनाव त्यावेळी मला एखाद्या सर्टिफिकेट
प्रमाणे वाटलं. आम्ही वपुंच्या बाजूला बसलो. अर्धा तास वपुंनी आमच्याशी मस्त गप्पा
मारल्या. इतकंच नाही तर, घरी गप्पा मारायला या असं वपुंनी
आमंत्रणही दिलं. आम्ही अनेक दिवस वपुंच्या घरी जायचं प्लानिंग करत राहिलो. काहीना काही
कारणांनी आमचं जाणं चुकत राहिलं. एक दिवस सकाळी वपु गेल्याची बातमी आली ! सहा
जून रोजी सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी पहिला पाऊस पडेल हे कळण्यात मजा नाहीये.
छत्री न घेता आपण गाफिलपणे घराबाहेर पडल्यावर पहिल्या सरीत चिंब भिजण्यात खरी मजा आहे!
ओशो रजनीश त्यांच्या प्रवचनात
एक गोष्ट सांगतात. एका गावात एकदा भगवान बुद्ध आणि भगवान महावीर भेटतात. समस्त भक्तांना
उत्सुकता असते की आता हे दोन प्रज्ञावान पुरुष एकमेकांशी काय बोलतील. तासाभराने दोघेही
घराच्या बाहेर पडतात आणि आपापल्या रस्त्याने निघून जातात. तासभर काय बोलतात दोघे?
काहीच
नाही. बुद्ध महावीरांना काय सांगणार आणि महावीर बुद्धांना काय सांगणार ! कदाचित या
दोघांच्या बाबतीत ‘गप्पा’ या शब्दातला तो अहंकाराचा ‘अ’कार गळून पडला असावा आणि म्हणून
‘गप्प’ राहण्यात त्यांना धन्यता वाटत असावी.
बाहेर मस्त पाऊस पडतोय. मी
आणि माझा एक मित्र ‘भर सोमवारी सकाळी’ मस्त पाय पसरून गप्पा मारत बसलोय. हातातल्या
कपातला चहा कधीच संपलाय पण विषय संपतच नाहीयेत. राजकारण, ऑलिम्पिक,
गदिमा,
ग़ालिब,
जगजीत,
कॉलेजमधल्या
पोरी…सध्या ही कुठे असते..ती कुठे असते? पैसा-अडका,
आवडती
गाडी…….बुद्ध आणि महावीर होण्यापासून आपण किती कोस लांब आहोत याची अचानक जाणीव होते
…आणि निदान पुढली काही वर्षे तरी आपण निवांत गप्पा मारू शकू याचा खोल आनंदही!
नविन काळे
प्रथम प्रसिद्धी: August 22, 2016
No comments:
Post a Comment