आज बऱ्याच दिवसांनी मावशीकडे जाण्याचा योग आला. दुपारी चहा, पोहे आणि गप्पा असा कार्यक्रम चालू असताना माझं लक्ष साईड टेबलवर ठेवलेल्या ब्लाऊज पीसच्या गठ्ठयाकडे गेलं. त्या सोबत तीन चार कॉटनच्या ओढण्या पण होत्या.
'काय ग मावशी इतके ब्लाउज शिवणार आहेस की काय? कोणी होलसेल टेलर बिलर मिळाला की काय? '
'अग नाही ग, हे सगळं मी मोडक मावशींना
देणार आहे. त्या आज येणार आहेत.' मावशीचा खुलासा. इतक्यात
माझी मावसबहीण ऑफीसमधून आली आणि आमच्या गप्पा वेगळ्याच विषयांवर रंगल्या. माझ्या
मनात मात्र मोडक मावशी या इतक्या ब्लाऊज पीसेसचे काय करत असतील याची उत्सुकता
लागून राहिली होती.
एक दीड तासात मोडक मावशी आल्या. उंच शिडशिडीत, केसांचे पोनीटेल, वय ७५च्या आसपास.
सुबक हसरं व्यक्तिमत्व! आगत स्वागत झालं. मावशीनं माझी ओळख करून दिली, मग थोडया गप्पा झाल्या. त्यांच्या हातात कापडांचा गठ्ठा ठेवताना मावशीनं
माझ्या चेहऱ्यावरचे भाव टिपले आणि मोडक मावशींना म्हणाली, ' मावशी,
तुम्ही या ब्लाऊज पीसेसचे काय करता याचं माझ्या भाची बाईंना कोडं
पडलं आहे. सांगता का तिला?'
'आनंदानं! ' हे म्हणताना मावशींचे डोळे
चमकले. त्या सांगू लागल्या, 'अग, या
कापडांचा मी बाळंतविडा तयार करते आणि तो सरकारी हॉस्पिटल आणि काही अनाथाश्रमांना
देते. '
बाप रे, केवढं वेगळं कार्य! आता मात्र मला
याबददल अजून जाणून घ्यावंसं वाटलं. मी विचारलं, ' मावशी,
कधीपासून करता आहात हे काम?'
'अगं, झाली की पंचवीस एक वर्ष. याला
कारणीभूत झाली एक छोटीशी घटना! माझ्या घरी लता म्हणून एक बावीस चोवीस वर्षाची
मुलगी घरकामाला होती. गरोदर होती, सातव्या महिन्यातच त्रास
सुरु झाला. सरकारी हॉस्पिटल मधे ऍडमिट झाली आणि बाळंत झाली. मला निरोप आला. मी पण
चक्रावले. काय मला सुचलं त्यावेळी, मी घरातल्या धुतलेल्या
दोन कॉटनच्या साडया काढल्या, भराभर त्याची दुपटी, लंगोट, झबली शिवली. माझं हे काम चालू असताना
सासुबाईंनी बदाम घालून शिरा केला. मी सगळा सरंजाम घेऊन तडक हॉस्पिटल गाठलं. तिच्या
हातात हा बाळंत विडा दिला. ओक्साबोक्शी रडली ग. नेसत्या साडीनिशी हॉस्पिटलला आली
होती बिचारी! तिच्या छकुल्याच्या हातात पैसे ठेवले आणि घरी यायला निघाले.
वॉर्डमधून बाहेर पडताना आसपास नजर फिरली आणि फाटक्या जुनेऱ्यांमधे
गुंडाळलेली ती नवजात बाळं बघून मन कालवलं. घरी येताना यांच्यासाठी काहीतरी करायचं
हा मनाशी निश्चय केला. दुसऱ्या दिवशी घरातल्या सगळ्या जुन्या बेडशीट, मऊ कॉटनचे ड्रेस, साडया सगळं बाहेर
काढलं. धुतलं. उन्हात खडखडीत वाळवलं आणि काम सुरू केलं. घरातल्या कपडयांपासून जवळ
जवळ पंचवीस दुपटी, पन्नास लंगोट, झबली
शिवली. पण पुढे काय? इतकं पुरणार नव्हतं. पण मनापासून इच्छा
असली ना की देव सगळीकडून मदतीचे हात देतो तसं झालं. माझी आई, बहिणी, नणंदा सगळयांनी घरातले कॉटनचे मऊ कपडे आणून
दिले. आणि बघता बघता एका महिन्यात दीडशे दुपटी, दोनशेच्या वर
लंगोट, झबली टोपडी तयार झाली.
आता पुढचे काम म्हणजे हे सर्व बाळंतिणीपर्यंत पोहोचवण्याचं. हे कामही सुकर
झालं. त्या हॉस्पिटलच्या मुख्य अधिकारी बाईंशी लांबून ओळख निघाली. त्यांना भेटायला
गेले. माझ्या या उद्योगाबद्दल सांगितले. तुला सांगते, त्या एवढया मोठया पदावरच्या बाई, पण
उठून माझ्या जवळ आल्या, माझा हात हातात घट्ट धरला. इथेच मला
सर्व मिळालं. मी रिक्षात सगळा बाळंतविडा घेऊनच गेले होते. त्यांच्या सुपूर्द केला
आणि समाधानानं घरी आले.
चार दिवसांनी त्यांनी मला भेटायला बोलावलं आणि त्या मला वॉर्डमधे घेऊन
गेल्या. तिथल्या बाळांच्या अंगावर मी दिलेली दुपटी, कपडे
बघून माझ्या डोळ्यांतून धारा वहायला लागल्या..... बाईंनी सर्व बाळंतिणींना माझी
ओळख करून दिली. सगळ्यांच्या डोळ्यांतले भाव आणि जोडलेले हात मला मोठ्ठं बळ देऊन
गेले. तेव्हापासून आजपर्यंत हे काम मी अव्याहत करते आहे. तुझ्या मावशीसारख्या
अनेकजणी मला कापडं देतात. त्यामुळे आत्तापर्यंत मला दहा रुपयांचं सुद्धा कापड
बाजारातून आणावं लागलं नाही कधी.' हे सगळे सांगताना मावशींचा
चेहरा इतका आनंदानं फुलला होता.
'मावशी, पण एवढं सगळं शिवण तुम्ही
एकट्या करता? माझा प्रश्न.
'अग हो, देवाच्या कृपेनं तब्बेत ठणठणीत
आहे. माझे यजमान मला कटींग्ज करून देतात. आमच्या दोघांचा वेळ इतका मस्त जातो या
सगळ्यात. बरं, जोडीला बागकाम आहेच. लॉकडाऊन असो अगर नसो,
मोडकांच्या घरी भाजी मात्र परसातलीच!' यावर
आम्ही सगळ्या मनापासून हसलो.
'आहे ना मुक्काम? ये ना घरी
मावशीबरोबर. मस्त ओव्याच्या पानांची भजी खायला घालीन'. असं
प्रेमळ आमंत्रण देऊन मोडकमावशींनी आमचा निरोप घेतला.
निरोप देताना माझे हात नकळत नमस्कारासाठी जुळले...!!!!!!
आरती जोशी
No comments:
Post a Comment