“I wish there was a way to know you were in
good old days before you actually left them” – Andy Bernard
माझा जन्म गिरगावातला. संपूर्ण शालेय शिक्षण गिरगावातल्या
आर्यन शाळेत. त्यामुळे गिरगावातून उपनगरात राहायला येऊन पंचवीस वर्षे झाली तरी गिरगावची
ओढ काही कमी होत नाही. कदाचित म्हणूनच, गिरगावातलं आमचं घर अजूनही रिकामं असलं तरी
विकलेलं नाहीये. अधूनमधून राहायलाही जातो. ‘गिरगावात आता पूर्वीसारखी मजा राहिली नाही’ हे वाक्य तिथे गेलं की जुन्या लोकांकडून हमखास ऐकू येतं. गिरगावातल्या
चाळींमध्ये खेळणारी पोरं दिसेनाशी झाली. गणेशोत्सवातले ‘स्थानिक कार्यक्रम’ नामशेष झाले. पापड-चिकवड्या वाळत घातलेल्या बाजा आता दिसत नाहीत.
गप्पांचे अड्डे कमी झाले. क्रिकेट खेळताना तळमजल्यावरच्या घरात बॉल गेला तर तो बॉल
विळीवर कापून देणाऱ्या ‘रणदुर्गा’ काळाच्या पडद्याआड गेल्या.
पहाटेपासून लागणारा रेडियो गेला. पाणी तापवायचे बंब गेले. नळावरची भांडणं संपली. (दोन्ही
बाजूंनी दिसणारे) मोठ्या पडद्यावर लागणारे सिनेमे गेले. सुस्कारे टाकून बोलावं अशा
गोष्टींची यादी खूप मोठी आहे. अर्थात, काळाप्रमाणे या गोष्टी बदलणे किंवा नामशेष होणे
हे अपरिहार्यच आहे. पण मी सर्वात मिस् करतो ते त्यावेळच्या गिरगावातल्या ‘बलुतेदारांना’!
न्हावी, पाववाला,
इस्त्रीवाला, भाजीवाला, कल्हईवाला, घरगडी, फुलपुडीवाला, रद्दीवाला, डोंबारी, कडकलक्ष्मी,
वासुदेव, बर्फाचे गोळे विकणारा, कुल्फीवाला….किती तऱ्हेतऱ्हेची
माणसं यायची वाडीत? सकाळपासून रात्रीपर्यंत ही माणसं वाडीत कधीही कुठल्याही वेळेला
येऊ शकत होती. त्यांच्या यायच्या वेळा ठरलेल्या असत. अनेकांच्या आगमनाची चाहूल त्यांनी
काढलेल्या एका विशिष्ट आरोळीने होत असे. विशेष म्हणजे, ओरडण्याची त्यांची स्टाईल कित्येक
वर्षे तशीच असे. त्या आरोळीमधील एकही शब्द स्पष्टपणे कळत नसे. किंवा त्या आरोळीचा आणि
ते विकत असलेल्या मालाचा काही संबंध तरी आहे का, असा प्रश्न पडे. पण तरीही ती आरोळी
ऐकली की कोण आलंय हे कळत असे.
आमच्या वाडीत
येणाऱ्या न्हाव्यापासून सुरुवात करूया. (पहिलं म्हणजे, मुंबईत घरी येऊन एक माणूस आपले
केस कापून जायचा ही गोष्टच आताच्या काळात सॉलिड वाटते.) त्याला सगळे ‘वसंता’ म्हणत. म्हणून मी देखील त्याला ‘वसंता’ म्हणे.
वसंता वयाने माझ्यापेक्षा फक्त मोठाच नव्हता, तर अनेक पटींनी मोठा होता. पण एकेरी हाक
ऐकायची वसंताला बहुदा सवय असावी. पांढरा सदरा, पांढरा लेंगा आणि डोक्यावर तिरकी पांढरी
टोपी. वसंता त्याची एक लाकडी पेटी घेऊन यायचा. त्या पेटीवर असलेला एका बाजूने धूसर
झालेला तो गणपतीचा स्टीकर मला अजून आठवतोय. त्या पेटीतलं ते सगळं नीट मांडून ठेवलेलं
साहित्य…ते विविध रंगांचे वस्तरे, चकाचक कात्र्या, पावडरचा
डबा, दाढीचा ब्रश..ते सगळंच मला प्रचंड आवडायचं. वसंता पहाटेच वाडीत यायचा. हजामतीची
‘होम डिलिव्हरी’ करत वाडीभर फिरायचा. त्याच्या काही निवडक
घरात जायच्या वेळा ठरलेल्या असायच्या. ‘वसंताssssssss’ अशी आपण वाडीत मोठ्यांदा हाक
मारली की कुठल्याशा घरातून वसंता बाहेर येई. डोळ्यांवर चष्मा. एका हातात कंगवा. एका
हातात कात्री. त्याच्या पांढऱ्या सदऱ्यावर आत बसलेल्या माणसाचे केस!
वसंताच्या सदऱ्यावर सांडलेल्या केसांच्या रंगावरून आत्ता केस कापायला राजेश बसलाय की राजेशचे बाबा बसलेत याचीही एक आगाऊ माहिती मिळत असे! हजामत करता करता राजकारण, क्रिकेट, मुंबईतील नागरी समस्या, शिक्षण, संगोपन, वैद्यकीय घडामोडी, भारताची परदेश नीती, अशा अनेक विषयांवर स्वतःची मते अधिकारवाणीने मांडणे हा वसंताचा जन्मसिद्ध हक्क होता आणि तो त्याने अत्यंत कष्टाने मिळवला होता. मुख्य म्हणजे, वाडीतल्या ‘ब्रेकिंग न्यूज’ ब्रेक करण्याचा पहिला अधिकार वसंताला परंपरागत बहाल करण्यात आला होता. वसंताचे घरात आगमन होताच गॅसवर दोन भांडी ठेवली जात. हजामतीसाठी गरम पाणी आणि वसंतासाठी चहा! अनेक विषयांवर बोलून वसंताच्या घशाला कोरड पडणार आहे हे घरातील चाणाक्ष गृहिणी ओळखून असत. कात्रीच्या त्या ‘काचकूच काचकूच’ आवाजाच्या रिदमवर चालणारे वसंताचे ते अखंड बोलणे माझ्या कानात अजून आहे.

इस्त्रीचे
कपडे घेऊन जायला घरी साक्षात ‘देवता’ यायचा! म्हणजे, त्या
माणसाचं नावच ‘देवता’ होतं. तो युपीचा होता पण मराठी उत्तम
बोलायचा. कपड्यांचं भलं मोठं गाठोडं पाठीवर घेऊन येणारा शिडशिडीत बांध्याचा देवता आजही
डोळ्यासमोर येतो. वाडीतला एक कोपरा देवतासाठी होता. देवता कपडे गोळा करून आणत असे आणि
त्याची माणसे दिवसभर इस्त्री करत. देवताला प्रत्येक घरातील माणसांची नावे पाठ होती.
प्रत्येक घरातल्या ठळक बातम्या, मुलांच्या इयत्ता, कोण कुठे काम करतंय इतकी ढोबळ माहिती
देवताच्या मेमरीत फिट्ट बसलेली असे. घरातली रद्दी न्यायला पंडित काका यायचे. फुलपुडी
टाकायला चिटणीस यायचे. घरातली धुणीभांडी करायला सुरुवातीची काही वर्षे रामा-गडी होते.
कालांतराने त्यांची जागा दक्षिणेतल्या ‘कोंगाटी’ लोकांनी घेतली.
एक भाजीवाले तर दुपारी चारच्या ठोक्याला वाडीत हजर व्हायचे. म्हणजे, त्यांची आरोळी
कानावर आली की गृहिणी ‘चार वाजले’ असं म्हणत चहा टाकत. डोंबारी,
दरवेशी, जादुगार, नुसत्या हाताने दगड फोडणारे, कपडे घेऊन त्या बदल्यात भांडी देणारे,
कल्हईवाले, असे कोण कोण लोक दिवसभरात वाडीत येऊन जात. रात्र झाली की एक जण डोक्यावर
टोपली घेऊन कुल्फी विकायला येत असे. उदबत्त्या विकणारे एक जण यायचे. त्यांचं नाव विसरलो
पण त्यांच्या आगमनाचा सुगंध अजूनही स्मरणात आहे.
खूप दिवसांनी
गिरगावात जातो. यातलीच काही मंडळी आता समोर येतात तेव्हा काळजाचा ठोका चुकतो. पूर्वीची
तरुण ‘वाटणारी’ माणसे आता वृद्धावस्थेकडे झुकलेली दिसतात.
त्या दिवशी कुणीतरी म्हणालं, वसंता गेला ! वसंता गेला ? हे कसं शक्य आहे? ज्याला अख्ख्या
जगाची खबर होती, त्या वसंताच्या जाण्याची खबर मला नाही? वर्षं सरतील तशी ही माणसे सुद्धा
कधीतरी म्हातारी होतील, थकतील किंवा या जगात नसतील याचा कधी विचारच केला नव्हता.
म्हटलं तर,
ही सर्व मंडळी व्यावसायिक होती. विविध धंदे करून पोट भरणारी होती. तरीही ही
सगळी मंडळी आमच्या ‘घरातली’ होती. कामाच्या निमित्ताने ही माणसं घरी येत. आपली कामं आटपली तरी बसत. चहा-फराळ घेत. स्वतःची वैयक्तिक सुखं-दुःखं शेअर करत. खरेदी-विक्री आणि पैशांचे हिशेब यांच्या पलीकडे असं काहीतरी त्यात होतं. वाडीतल्या सर्व सार्वजनिक समारंभात या सर्वांना आमंत्रण असे. इतकंच कशाला, या मंडळींकडून अगदी गणेशोत्सवाची वर्गणी उकळायचा अधिकार त्यांनी आम्हाला स्वखुशीने दिला होता. आज सेवा-क्षेत्र खूप विकसित झालंय. आपल्याला हव्या त्या वस्तू ऑनलाइन ऑर्डर करून घरबसल्या हजर होतात. वस्तू घेऊन येणारे रोज बदलत राहतात. येतात तेही अनेकदा बाहेरच्या बाहेर जातात. घरात नुसत्या वस्तूच येतात. त्या वस्तूंमागची ‘सुखं-दुःखं’ घराबाहेरूनच निघून जातात.

‘अमुक एक
जागा पूर्वीसारखी राहिली नाही’ असं आपण म्हणतो तेव्हा खरंच
काही बदललेलं असतं का? कुठलीही जागा अशी एकाएकी बदलू शकते?…..की आपणच बदलत असतो?
मी खूप विचार
करतो पण स्पष्ट उत्तर मिळत नाही. आता वाटतंय, विचार करण्यात वेळ फुकट घालवला. कारण,
काय सांगावं, तीस वर्षांनी ‘ऑनलाइनची मजाच काही और होती’ असं
म्हणत आपण कदाचित नॉस्टॅल्जिक होऊ!
विचार झटकून
मी कामाला लागतो. कुणाला तरी फोन करायला फोन हातात घेतो आणि क्षणभर दचकतो. वसंता, देवता, पंडित काका, चिटणीस…वगैरे मंडळी आता ‘अॅप्स’च्या रुपात माझ्या
स्क्रीनवर असतात!
मी म्हटलं
नव्हतं? वसंता जाणं, कसं शक्य आहे?
नविन काळे
No comments:
Post a Comment