भान

 

प्रत्येक वेळेला हे असंच होतं

नुसतं ठरवणंच होतं, पण

पाऊल मात्र तिथेच असतं

हे आता बदलतंय, आता जमेल असं वाटतंय

 

मनानं हुंदाडपण केला तर हरकत नाही

पण पाचांची सोबत असली की आवरत नाही

बुद्धीचा अंकुश वापरायचं भान येतंय

थोडा वेळ लागेल, पण आता जमेल असं वाटतंय

 

अनुकूल अन् प्रतिकूल वेदना

हे कसलं सुखदु:ख, या तर आसक्तीच्या भावना

या वेदनांच्या बंधनातून सुटायचंय

अवघड असेल, पण आता जमेल असं वाटतंय

 

काही मिळवायचं तर काही गमवायला लागेल

मनातल्या 'मी' ला मुरड घालायला लागेल

नुसतं बोलायचं नाही, आता नेटानं करायचंय

करूनच दाखवायचंय, आता जमेल असं वाटतंय

 

चालायचा मार्ग समोर दिसतोय

श्रद्धेचाही थोडा अर्थ कळतोय

बोट धरून चालवणारा दूर नाही असं वाटतंय

खरंच आता नक्कीच जमेल असं वाटतंय

 

संजय बापट




No comments:

Post a Comment