अमृत महोत्सवाच्या उंबरठ्यावर भारत!


भारत, जगातील एक अतिशय प्राचीन संस्कृती! 'सुजलाम, सुफलाम, मलयज शीतलाम' असं ज्याचं वर्णन केलं जातं तो भरताचा देश! श्रीराम, श्रीकृष्ण, परशुराम, गणपती, सरस्वती, पार्वती आणि लक्ष्मीचा देश! वेदांचा जिथे जन्म झाला तो देश! भगवंताने स्वतः गीता कथन केलेला देश! जगाला जगायचं कसं हे शिकवणारा देश! चार वेद, चौदा विद्या आणि चौसष्ठ कला जिथे जन्माला आल्या तो देश! प्राचीनकाळी जेव्हा कुठल्याही धर्माला वेगळे असे नाव नव्हते, तेव्हा जगाला धर्म आणि अधर्म यातील फरक समजावून सांगणारा देश! गंगा, यमुना, सिंधु, नर्मदा, गोदावरी, कृष्णा, कावेरी यांचा देश! शून्याची निर्मिती, खगोलशास्त्राचं अचूक ज्ञान हे ही आपलंच. (मला कधी आपल्या पूर्वजांना पृथ्वी गोल आहे की सपाट आणि कोण कोणाभोवती फिरतं आणि एक सफरचंद जमिनीवर पडल्यामुळे कुणाच्या तरी डोक्यात गुरुत्वाकर्षण असतं असा पडलेला प्रकाश, असे प्रश्न पडल्याचे ऐकीवात नाही!) असो, तर अश्या महान देशात जन्माला येणं हे मी माझा परमभाग्य समजतो!

तर हा सगळा भूतकाळ झाला! हा आपला इतिहास आणि आपल्या परंपरा हे आपले भक्कम आधार आहेत. या सगळ्यात एक अतिशय विशेष महत्वाची गोष्ट (याबद्दल अभिमान असावा की नाही हा वादाचा मुद्दा होऊ शकतो!) म्हणजे आपण कधीच कोणावर आक्रमण करून कुठलाही देश किंवा भौगोलिक प्रदेश काबीज केला नाही. आपल्यावर मात्र एकामागून एक आक्रमणे होत राहिली - आधी मुघल आणि नंतर युरोपियन यांनी भारताची अनेक शतके अधोगती केली. महाराणा प्रताप, शिवाजी महाराज आणि थोरले बाजीराव पेशवे हे सन्माननीय अपवाद वगळता इतर कोणीही या परकीय शक्तींसमोर फार लढू किंवा टिकू शकले नाही आणि आपला देश हा पारतंत्र्याच्या विळख्यात पूर्णतः अडकला, - जवळजवळ १९० वर्षे!
१७५० च्या सुमारास जगातल्या व्यापाराचा २५% वाटा भारताचा होता, तो १९४७ पर्यंत या इंग्रजांनी ३ टक्क्यावर आणून ठेवला! आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं - कसं?

'दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल!'

आपल्या आजच्या अमृत महोत्सवाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या भारताच्या सर्व समस्यांची मेख ही त्या फुकटात मिळालेल्या स्वातंत्र्यावरच आधारित आहे. हे मी अतिशय जबाबदारीने आणि परखडपणे म्हणू शकतो कारण इतिहास सर्वांसमोर आहे. स्वातंत्र्य संग्रामात जे थोर क्रांतिकारी किंवा क्रांतिकारी विचारसरणीचे जे लोक होते (उदा. लो.टिळक, स्वा. सावरकर, भगत सिंह, चंद्रशेखर आझाद इ.) त्यांचा जोर साधारणतः १९३० पर्यंत पूर्ण कमी झाला होता आणि अहिंसा हा एकच परिणामकारक मार्ग अशी लोकांची समजूत झाली होती! जपानची दुसऱ्या महायुद्धात जी प्रचंड हानी झाली, ती भारताला स्वातंत्र्य मिळायच्या बरोब्बर २ वर्ष आधी. पण तिथल्या निस्सीम देशभक्त नागरिकांनी शिस्त, अथक परिश्रम आणि चिकाटी यांच्या जोरावर पुढील २०-२५ वर्षात जपान जगातील सर्वात आघाडीच्या स्थानी आणून ठेवला!

माझ्या भारताबद्दल मला अतिशय प्रेम, आदर आणि भक्ती आहे आणि त्यामुळेच मला या ७५ वर्षांचे मूल्यमापन निःपक्षपातीपणे व्हावं असं वाटतं. माझा सूर जरी टीकात्मक असला तरी तो माझ्या देशावर माझ्या असलेल्या प्रेमामुळे आहे हे वाचकांनी कृपया विसरू नये! आता आपण आपल्या स्वातंत्र्याचा उहापोह तीन भागात करू - पहिली, दुसरी व तिसरी २५ वर्षे!

पहिली २५ वर्षे - स्वप्नातला भारत प्रत्यक्षात आणण्यासाठी ही पहिली २५ वर्षे अतिशय महत्वाची होती. पण भारताच्या फाळणीमुळे, प्रचंड विविधतेमुळे, दारिद्र्यामुळे, प्रशासकीय अनुभवाच्या अभावामुळे आणि सर्वसाधारण अशिक्षिततेमुळे जे या २५ वर्षांत साध्य व्हायला हवं होतं ते झालं नाही. त्यातुन चीनने आपल्यावर आक्रमण केले आणि आपल्याला एक अतिशय वाईट सामरिक पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनचा वरचष्मा वाढला. त्यात त्यांनी त्यांची बाजारपेठ खुली केली आणि कारखानदारीच्या जोरावर तो एक अति बलशाली देश झाला. पाकिस्तान, काश्मीर, शेतकी उत्पादन खूपच कमी आणि वाढती लोकसंख्या यामुळे भारत या कालावधीत आणखीनच खंगत गेला. समाजवाद, साम्यवाद आणि अलिप्ततावाद या धोरणांमुळे आपण जगात खूपच एकटे पडलो आणि आपला एकमेव सहाय्यक रशिया होता जो या सर्व धोरणांमुळे आधीच वाईट परिस्थितीत जात होता, पण आपल्या दुर्भाग्याने हे आपल्याला चटकन जाणवले नाही. एक राष्ट्र घडवण्यासाठी जी मूल्ये जनमानसात रुजवावी लागतात त्यांना आपण या पहिल्या २५ वर्षांत कायमचे मुकलो. त्यामुळे बळी तो कान पिळी अशी पुढची पिढी आपल्या देशात निर्माण झाली. भ्रष्टाचार ही इथली नित्याची बाब झाली, आणि आपण कळत नकळत भ्रष्टाचार करत आहोत याची जाणीव सुद्धा बहुतांश लोकांना राहिली नाही. थोडीफार समाधानाची बाब म्हणजे या काळात काही अभिमानास्पद संस्था उभ्या राहिल्या उदा. IIT, AIIMS . पण एकुणात पहिली २५ वर्षे आपण वाया घालवली.

दुसरी २५ वर्षे - पाकिस्तानला आपण चांगला धडा शिकवला पण आणीबाणी लादल्यामुळे जनक्षोभ खूपच वाढीला लागला. प्रस्थापित व्यवस्था आणि एक पक्षी सरकार याविरुद्ध लोकांनी एक वेगळे सरकार निवडून दिलं तर खरं, पण या खिचडीची एकजूट फारकाळ टिकली नाही आणि परिणामी देश पुन्हा त्याच पक्षाकडे आणि सरकाराकडे झुकला. यानंतर काही वर्ष फुटीरतावादी चळवळींमध्ये गेली आणि त्याची परिणती इंदिरा गांधींच्या हत्येत झाली आणि पुढची पाच वर्षे एक स्थिर सरकार आणि तरुण नेतृत्त्व देशाला मिळालं. त्याचे काही फायदे निश्चित झाले जसे दूरसंचार क्षेत्रात पुष्कळ प्रगती झाली. परंतु खरी आर्थिक क्रांती देशाच्या सुवर्णमहोत्सवाच्या उंबरठ्यावर झाली. भारताने खुल्या आर्थिक बाजारपेठ नीतीचा अंगीकार केला आणि परकीय गुंतवणूक देशात वाढीस लागली. माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार आणि सेवा क्षेत्र यामधे भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा निर्माण केला आणि स्वातंत्र्यानंतर प्रथमच आपण माहिती तंत्रज्ञानासाठी जगप्रसिद्ध झालो. याचे खरे फायदे आपल्याला मिळू लागले एकविसाव्या शतकाच्या पहिल्या १० वर्षात! त्याबद्दल पुढच्या भागात!

तिसरी २५ वर्षे - या २५ वर्षाच्या सुरुवातीलाच भारताच्या एका महान सुपुत्राने हे दाखवून दिले की कितीही भिन्न विचारसरणीचे पक्ष असले आणि अल्पमतातले सरकार असले तरी केवळ देशभक्ती, देशहित आणि मुत्सद्दीपणा या गुणांच्या जोरावर पूर्णकाळ सरकार चालवता येतं! साधारणपणे १९९८ ते २००९ पर्यंत भारताची प्रगती उत्तम झाली असं म्हणावयास हरकत नाही. उद्योग, शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोदित मध्यमवर्ग या सगळ्याच गोष्टी आपल्या विकासाला पूरक ठरल्या. आणि आता २०१४ पासून अगदी आजपर्यंत जे देशातलं वातावरण ढवळून निघालंय त्याला आपल्या देशाचं अतिशय खंबीर नेतृत्व कारणीभूत आहे! मागच्या पंधरवड्यात सरकारने दाखवून दिलंय की स्पष्ट बहुमत, खंबीर नेतृत्व, देशहित हे एकमेव लक्ष्य या गोष्टी एकत्र आल्या की आपल्या घटनेला बांडगुळासारखे चिकटलेले ३७० कलमही रद्द करता येऊ शकते आणि आता आपली दृष्टी पाकव्याप्त काश्मीरवर केंद्रित करता येईल! अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मोदीजींनी लोकसंख्येवर केलेलं वक्तव्य! भारताचा लोकसंख्येचा प्रश्न अतिशय ज्वलंत आहे आणि आपल्या विकासाच्या गतीवर बाधा आणू शकणारा आहे, तसेच आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर खूप जास्त भार टाकणारा आहे! म्हणून येणाऱ्या काळात लोकसंख्येवर नियंत्रण आणि आळा याला आपण जास्तीत जास्त प्राधान्य दिलं पाहिजे!

मग आता अमृत महोत्सवाच्या उंबरठ्यावर आपल्याला काय खुणावतंय आणि दिसतंय?
साधारण ६ वर्षांपूर्वी समाजमानसाला जी मरगळ आली होती ती आता नाहीशी झालीय आणि आपण उद्याकडे खूप आशा आकांक्षांनी बघतो आहोत! भारताचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन तर दिमाखात होईलच पण असंच वातावरण आणि देशाचं कल्याण बघणारे नेतृत्व जर आपल्याला मिळत राहिले तर आपल्या स्वातंत्र्याचा शतक महोत्सव अतिशय दिमाखदार आणि अभिमानास्पद असेल याबद्दल मला यत्किंचितही शंका नाही!

शेवटी गदिमांचे जन्मशताब्दी वर्ष असल्यानें त्यांच्या काही देशभक्तीपर ओळींनी हा लेखनप्रपंच थांबवतो!
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे!!
जय हिंद!!
भारत माता की जय!!

अजय रिसबूड


No comments:

Post a Comment