आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
भेटतोस मजला तू श्रीहरी ...
तुझे भावपूर्ण तरी मिस्कील डोळे
खुणाविती मज वरचेवरी ...
किती उचलले गोवर्धन मी
खबर कुणाही नसे परी...
संकटसमयी निराशवेळी
कसा रे अवचित येईस दारी.
अर्जुनास जे कथिलेस रणांगणी
पडे माझ्याही कानावरी...
झुंजत होते जरी मी संसारी
पाठविल्यास तू सूक्ष्म लहरी...
माझ्या हातांमध्ये, श्रमांत माझ्या
बळ- शक्ती असते तुझीच खरी...
कानी वाजे तुझा मधुर पावा
क्षण एकही ना तुजवाचून सरावा..
श्रमूनी निजे मी शांत कधीही
मोरपीस तुझे स्पर्शी गालावरी...
मंद मधुर स्मितहास्य तुझे रे
निश्चिंत करिते मजला रे...
भाव मनी मज उमटे जेव्हां
कसा उमजतो तुज आधीच तेव्हां.
समस्येआधीच असते तुझ्याकडून
कृष्णा, तयार ऊत्तर ...
वाटे मजला दैवच माझे
खरोखर कसे हे बलवत्तर...
सुखदुःखाचे अगणित क्षण हे
तुज साथीने घडले सुंदर...
कर्मयोगी मी तुझाच कृष्णा
तूच तू रे मज घडविले...
एकच मनीषा मम ह्रदयाला
सुदर्शन तुझे पाहीन सुटताना...
दुष्ट नव्हे, दुष्टतेचा करून संहार
पसायदाना देऊन खंबीर आधार..
रक्तरंजित वसुंधरेला
दे अभय तुझे कृष्णा
प्रेमभावना जागवून
मनी सा-यांच्या....
एकच तृष्णा
ही एकच तृष्णा!!
स्मिता शेखर कोरडे
No comments:
Post a Comment