भेट आदिवासींच्या सेवादुतांशी

 

मित्रमंडळ बेंगलोरने दिनांक २५ एप्रिल २०२१ रोजी एक आगळावेगळा कार्यक्रम सादर केला. हिंदू नववर्षातील हा पहिलाच कार्यक्रम. राम नवमीचे औचित्य साधून ज्यांना आजच्या काळातील राम-सीता म्हणता येईल अशा डॉक्टर राम गोडबोले व सौ सुनीता गोडबोले यांच्याशी मित्रमंडळ कार्यकारिणीतील सौ गंधाली सेवक यांनी संवाद साधला. 



डॉक्टर राम व सौ सुनीता गोडबोले गेलली २६ वर्षे छत्तीसगड मधील बस्तर या आदिवासीबहुल भागात राहून तिथल्या माणसांना अविरत आरोग्य, शिक्षण तसेच सरकारी सुविधा उपलब्ध करून देऊन, त्यांचे जीवन सुसहय व सुदृढ करत आहेत.

ते करीत असलेले महान कार्य, त्यामध्ये त्यांना येणाऱ्या अडचणी, मिळणारी व अपेक्षित मदत याविषयी माहिती जाणून घेतली गेली. बस्तर सारख्या जंगलात राहूनही डॉक्टर गोडबोले, सौ सुनीता व त्यांचे सहकारी यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम बरोबर पाच वाजता सुरू झाला. त्यावेळी त्यांच्या स्वभावातील साधेपणा व नवीन गोष्टी शिकण्याच्या इच्छेचा प्रत्यय आला.

नाशिकच्या वनवासी कल्याण आश्रमापासून डॉक्टर गोडबोले यांचा सामाजिक कार्याचा प्रवास सुरू झाला. पुढे गडचिरोली मध्ये काम केल्यावर त्यांना आदिवासींच्या सेवेची प्रेरणा मिळाली. त्यांच्या पत्नी सौ सुनीता, कॉलेज जीवनामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करत होत्या. तिथे त्यांना आदिवासींसाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली व त्या वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्याशी जोडल्या गेल्या. रायगडच्या आश्रमाच्या वसतिगृहाचे व्यवस्थापन, वनवासी क्षेत्रात मुलांसाठी शिलाई केंद्र सांभाळण्याची जबाबदारी, अशी अनेक ग्रामसुधारणांची कामे त्यांनी केली.

के.भास्कर हे केरळमध्ये वनवासी कल्याण आश्रमाचे अधिकारी. त्यांनी मराठी कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राबाहेर काम करून तेथील आवाहनांना सामोरे जावे असे मार्गदर्शन केले. त्यानुसार डॉक्टर गोडबोले व सौ सुनीता यांनी बस्तर या छत्तीसगडमधील आदिवासीबहुल भागात काम करण्याचे ठरविले व त्यांचे तेथील कार्य सुरू झाले. आदिवासी बांधवांशी संवाद करणे, त्यांच्याबरोबर जुळवून घेणे व त्यांच्या मनात विश्वास निर्माण करणे हे मोठे आव्हान होते. पण या दाम्पत्याने त्यांची बोलीभाषा "गोंडी" शिकून घेतली. त्यामुळे आपलेपणा निर्माण होणे व संवाद करणे सुकर झाले. आदिवासींमध्ये समरस होऊन कार्य केल्याने त्यांचा या कार्यास चांगलाच पाठिंबा मिळाला. आदिवासी लोकांच्या अनेक अंधश्रद्धा असताना त्यांना वैद्यकीय उपचारांचे महत्त्व पटवून देणे व उपचार करणे खूप कठीण होते. पण दिनरात त्यांची निस्वार्थ सेवा करून या दाम्पत्याने त्यांचे मन जिंकले, विश्‍वास मिळविला.



बऱ्याच आदिवासी लोकांच्या समस्या आणि अडचणी या शहरीकरणामुळे व शहरी माणसांमुळे निर्माण झाल्या आहेत. शेती करणे, झाडे वाढवणे यामध्ये नवीन पिढीला स्वारस्य नाही. ही खंत सुनीता ताईंनी व्यक्त केली. नवीन पिढीलाही या गोष्टींचे महत्त्व पटवून देण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

डॉक्टर राम व सौ सुनीता काही शैक्षणिक प्रकल्पही राबवतात. आदिवासींना समाजाची,आपल्या देशाची, माहिती देऊन जागरूक बनवतात. तसेच शरीर विज्ञानाची ओळख करून देऊन त्यांना शरीराचे आरोग्य कसे राखावे व स्वच्छता व काळजी कशी घ्यावी या विषयी मार्गदर्शन करण्यात येते. डॉक्टर राम व सुनिता अनेक मोफत वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करतात. सध्या त्यांनी ऍनिमिया व मलेरिया निर्मूलनाची मोहीम हातात घेतली आहे. अनेक लोकांचे प्राण वाचविण्याचे पुण्य त्यांच्या पदरी आहे.

आदिवासी स्त्रियांना मिळणारी दुय्यम वागणूक, अनेक चालीरिती,लग्न पद्धती, लग्न न होणे व एकाहून अधिक लग्न करणे या समस्यांवरही ते काम करत आहेत. बाजारामध्ये शहरी गुंडांकडून आदिवासी स्त्रियांची होणारी फसवणूक थांबविण्यात त्यांना काही प्रमाणात यश आले आहे. यासाठी सुनीताताई इतर आदिवासी स्त्रियांची व कार्यकर्त्यांची मदत घेतात. सुनीता ताईंना त्यांच्या इतके वर्षाच्या निष्काम कार्याची पावती, बाया कर्वे पुरस्काराच्या रूपाने मिळाली आहे.

सध्याच्या कोविडच्या संकटात वयस्कर आदिवासी आपला वनवासी माल बाजारात जाऊन विकू शकत नाहीत. त्यामुळे त्यांचे जीवन कठीण झाले आहे. म्हणून त्यांना जीवनावश्यक गोष्टी पुरवून डॉक्टर व त्यांचे कार्यकर्ते मदत करत आहेत. अशा सर्व कार्यासाठी आर्थिक पाठबळ लागते. पुण्याचे कृतज्ञता ट्रस्टचे श्री रमेश कोपरकर ७८ व्या वर्षीही या कार्यासाठी निधी संकलनाचे काम करत आहेत. डॉक्टर गोडबोले यांनी त्यांच्या कार्याला आर्थिक मदत व प्रत्यक्ष बस्तर येथे राहून मदत करण्याविषयी आवाहन व मार्गदर्शन केले.

मित्रमंडळाने कृतज्ञता ट्रस्टला रुपये एकवीस हजार ची देणगी देऊन आपला खारीचा वाटा उचलला आहे. तसेच मित्र मंडळाच्या व डॉक्टरांच्या आवाहनाला प्रेक्षकांकडूनही भरघोस आर्थिक प्रतिसाद मिळाला आहे. श्री व सौ कुमठेकर जे बरेच वर्षे वनवासी आश्रमाचे कार्यकर्ते आहेत व डॉक्टर राम यांना ओळखतात यांनी मुलाखत ऐकल्यावर,पाच वर्षे डॉक्टर राम यांच्या बरोबर बस्तर मध्ये राहून कार्य करण्याचे ठरविले आहे. अशा प्रतिसादामुळे मित्रमंडळालाही समाधान वाटते. आपण ही सर्व या उदात्त कार्याला मदत करू शकता आर्थिक मदतीसाठी माहिती खाली देत आहोत.

मित्रमंडळातर्फे सौ मनोरमा जोशी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर श्री. नरेन नंदे आणि श्वेता पानवलकर यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. ह्या नव्या तंत्रज्ञानामुळे कोरोना काळातही एक उत्कृष्ट कार्यक्रम सदस्यांसाठी करता आला.

Click here to watch the Interview


श्वेता पानवलकर 

----------------------------------------------------------------------------------

वाचकांना मदत करायची असल्यास बँक माहिती खालीलप्रमाणे आहे.

Bank Details of Krutadnyata Trust are as under:--

Name of the Account :-  Krutadnyata Trust

Bank & Branch :- Bank of Maharashtra, Vadgaon Budruk Branch

Pune 411 051

S.B. A/C No.   60011420551

IFSC Code :. MAHB0001159

Donations are eligible for tax rebate.

देणगी दिल्यावर देणगीदाराचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, पॅन नंबर व ट्रांजेक्शन आयडी खालील पैकी कोणत्याही नंबर वर कळवावी. म्हणजे पावती पाठवता येईल.

+919011070503 - Ramesh Koparkar. 

+919844325122 - Manorama Joshi

----------------------------------------------------------------------------------



No comments:

Post a Comment