भोंडला


अश्विन महिन्यात सूर्याचा हस्त नक्षत्रात प्रवेश झाला की दुसऱ्या दिवसापासून भोंडला किंवा हादगा खेळला जातो. 'भोवंडल' या प्राकृत शब्दावरून हा शब्द पश्चिम महाराष्ट्र व कोकणात प्रचलित झाला. 'भोवंड ' म्हणजे गोल फिरणे. म्हणून यात फेर धरला जातो.
अश्विन महिन्यात आपली भूमाता म्हणजे जमीन भरघोस पिकांनी बहरून आलेली असते. जमिनीसारखीच स्त्रीकडे सृजनशक्ती म्हणजे निर्मितीची क्षमता असते. कुमारिका या सुफल होणार असतात.म्हणून या फेरांमध्ये स्त्रिया आणि मुली यांचा सहभाग असतो. 
फेऱ्यांच्या मध्यभागी पाटावर रांगोळी अथवा धान्याचा हत्ती काढला जातो. फुलांनी सजावट केली जाते. हत्ती हा मेघांचे किंवा ढगांचे प्रतिक. पावसाशिवाय सृजनशीलता नाही. पाणी आणि जमीन यांच्यामुळे पृथ्वीवरचे सजीव जीवन फुलते. म्हणून पाटावर हत्तीचे चित्र काढले जाते. पाटाभोवती फेर धरून गाणी म्हटली जातात.

पूर्वीच्या काळी स्त्रिया-मुलींना मोकळीक मिळावी, हसता-खिदळता यावे यासाठीचा हा प्रपंच. माहेरच्या आठवणींनी, मायेने भिजलेले शब्द उमटताना गळ्याला आगळा गोडवेपणा येतो. तर सासरचा उणेपणा सांगताना तोच आवाज बदलतो. रोज एकेक गाणे वाढवत सोळा दिवस हा भोंडला खेळला जातो. आपले पाककौशल्य इतरांना दाखविता यावे यासाठी 'खिरापत' नामक उत्तम संधी देखिल उपलब्ध असते. वऱ्हाड, खानदेश या ठिकाणी गुलोजी-गुलाबाई, भुलोबा-भुलाबाई म्हणजेच शिव-पार्वती यांच्या मातीच्या चित्रांची पूजा केली जाते. फेर धरून गाणी म्हटली जातात. कपबशा, काचेच्या बांगड्यांचे तुकडे मातीत रोवून रांगोळी काढली जाते.
ऋतूबदलाचे स्वागत, निसर्गाशी माणसाचे नाते निर्माण करून कसे करावे, कृतज्ञता कशी व्यक्त करावी हे आपल्या पूर्वजांकडून आपल्याला शिकण्यासारखे आहे. तर असा हा आपला भोंडला. कालानुरूप गाण्यांमध्ये बदल झाले. भोंडल्यामागच्या मूळ उद्देशाची फारशी गरज राहिली नाही तरीही खाजगी भोंडले कमी होऊन सार्वजनिक भोंडल्याची संख्या वाढली. आजच्या धकाधकीच्या, धावपळीच्या दिवसात ह्या भोंडल्याकडे विरंगुळा म्हणून बघायला काहीच हरकत नाही.



संकलन - रुपाली गोखले.

No comments:

Post a Comment