भोसले सर

 

साधी राहणी व माणुसकी जपणारा दशसहस्रेषु वक्ता

 


आपल्या अमोघ वाणीने समाज प्रबोधनाचे कार्य करणारे ख्यातनाम विचारवंत प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनावक्ता दशसहस्रेषुअसेच म्हणावे लागेल. येत्या १५ जुलै रोजी त्यांची ९४ जयंती आहे. त्या निमित्ताने शब्दांजली....

आपल्या अमोघ वक्तृत्वाने महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर तसेच परदेशातही मराठी भाषकांवर मोहिनी घालणाऱ्या प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे सुमारे चार दशके अखंड कार्य केले. सरांना वक्तृत्वाचा वारसा हा वडिलांकडूनच मिळाला. त्यांचे वडिल अनंतराव हे प्राथमिक शिक्षक होते. त्यांचे मोठे बंधू व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले हे ही उत्तम वक्ते होते. वक्तृत्वाचा मानदंड समजल्या जाणाऱ्या पुण्यातील वसंत व्याख्यानमालेत दर वर्षी दोन या प्रमाणे सलग २८ वर्षे ५६ व्याख्याने देण्याचा विक्रम सरांच्या नावावर आहे. एक ख्यातनाम वक्ते म्हणून, संपूर्ण महाराष्ट्राला व महाराष्ट्राबाहेर इतकेच नव्हे तर, साता समुद्रापलीकडेही सरांची कीर्ती पसरली आहे. मात्र, त्यांच्यातील माणुसकीची, त्यांच्या साधेपणाची ओळख फारच थोड्यांना असेल.

सरांचे एक वैशिष्ट्य म्हणजे, मुधोजी महाविद्यालयात रूजू झाल्यापासून ते निवृत्त होईपर्यंत ते महाविद्यालयास घरापासून दररोज पायी चालत जात असत आणि उन्हाचा व पावसाचा त्रास होऊ नये म्हणून, त्यांच्या हातात नेहमी छत्री असे. सरांच्या घरापासून महाविद्यालय सुमार दोन किलोमीटर लांब होते. पण, संपूर्ण कारकीर्दीत त्यांनी महाविद्यालयात जाताना किंवा येताना दुचाकी, चारचाकी वाहनांचा वापर केला नाही. कोणाच्याही वाहनात बसले नाहीत. विद्यार्थ्यांना सरांविषयी आदर असे. सर महाविद्यालयात चालत जात असताना एकही वाहन त्यांना ओव्हरटेक करून जात नसे. सरांचा मान ठेवून वाहने थांबलेली असायची किंवा अन्य मार्गाने जायची. आपले सर सदैव पायी चालत जात असल्याचे पाहून आजी-माजी विद्यार्थ्यांनी सरांना त्यांच्या एकसष्टीनिमित्त झालेल्या समारंभात मोटार भेट दिली. पांढरी पँट, निळसर काळा कोट, डोक्यावर छत्री आणि पायात साध्या कातडी चपला, या त्यांच्या पोशाखात शेवटपर्यंत कधीही बदल झाला नव्हता.

सर स्वत: ग्रामीण भागातून आलेले असल्याने त्यांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी माहिती असायच्या. साधी ओळखपत्रावर सही देताना पण, ते घरातील सर्वांची नावासह चौकशी करीत असत. त्यांनी प्राचार्यपदाच्या संपूर्ण कारकीर्दीत महाविद्यालयात प्रवेश घेण्यास पैसे नाहीत, म्हणून एकाही विद्यार्थ्याला प्रवेश नाकारला नाही. विद्यार्थ्यांना सर विचारायचे, तुझ्याजवळ किती पैसे आहेत? त्यावर तो विद्यार्थी म्हणत असे, सर फक्त ५ रुपये आहेत. त्यावर सर म्हणायच,ते तेवढे ५ रुपये देऊन प्रवेश घे. बाकीचे पैसे टप्प्याटप्प्याने दिलेस तरी चालतील. जगाच्या इतिहासात केवळ ५ रुपयांत महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश देणारेपहिले प्राचार्यम्हणून सरांची सुवर्णाक्षरात नोंद झाल्याशिवाय राहणार नाही. 

कॉलेजमध्ये काही विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शिष्यवृत्ती मिळत असे. ती स्टेट बँकेत ६० रुपयांप्रमाणे दरमहा जमा होत असे. पण ते पैसे पुरत नसल्याने काही विद्यार्थी दर महिन्यांला २५ रुपये ऍडव्हान्स शिष्यवृत्ती मिळण्यासाठी अर्ज करायचे व सर ते मंजूर करायचे. अशा पद्धतीची ऍडव्हान्स  शिष्यवृत्ती कोठेही मिळत नव्हती व मिळतही नाही. केवळ सरांमुळेच फलटण येथे हे नवल घडले होते.

स्थितप्रज्ञाची व्याख्या कोणाला समजून घ्यायची असेल, त्यांनी सरांचे जीवन बारकाईने अभ्यासणे आवश्यक आहे. कितीही कठीण प्रसंग आला तरी, मन विचलीत होऊ द्यायचे नाही. अशा वेळी प्रलोभनाकडे पाठ फिरविण्याचे धैर्य सरांनी दाखविले. एक काळ असा होता की, मुधोजी महाविद्यालयातील प्राध्यापकांचे पगार जवळजवळ सहा महिने थकले होते. त्याच सुमारास सरांसाठी पुण्यातील काही महाविद्यालये प्राचार्यपदासाठी पायघड्या घालून सज्ज होती. मात्र, त्या वेळी सरांनी केवळ स्वत:चा विचार न करता, सर्व सहकारी प्राध्यापकांचा विचार केला आणि बिकट आर्थिक परिस्थितीला जिद्दीने तोंड दिले.

सरांचे विद्यार्थ्यांवर आणि विद्यार्थ्यांचे सरांवर खूप प्रेम होते. त्यांना भेटायला येणाऱ्यांमध्ये विविध क्षेत्रांतील लोकांचा समावेश असे. भेटायला येणारी व्यक्ती कितीही मोठी असो वा लहान, सरांनी कोणालाही भेट नाकारली नाही. सरांना माणसे आवडायची. ते सर्वांशी दिलखुलासपणे बोलत असत. प्रत्येकाला वाटे, फक्त आपणच सरांच्या खूप जवळ आहोत. पण, वस्तुस्थिती वेगळी असायची. माणसांच्या गर्दीत राहूनही ते सर्वांपासून अलिप्त राहायचे. व्याख्यानाला हजारोंच्या संख्येने श्रोत्यांनी गर्दी केलेली असली तरी, त्या गर्दीची नशा त्यांना कधीही चढली नव्हती.

 

नामांतराच्या यशाचे खरे शिल्पकार

सरांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा आणि गौरवास्पद कालखंड म्हणजे, औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरूपद होय. त्या काळात मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे करावे, यासाठी आंदोलने सुरू होती. तसेच या नामांतराच्या विरोधातही आंदोलने होत होती. मराठवाडा विद्यापीठाच्या स्थापनेपासून एकही कुलगुरू आपली तीन वर्षांची मुदत पूर्ण करू शकले नव्हते. आंदोलनाची तीव्रता वाढल्याने त्या विद्यापीठाचे कुलगुरूपद स्वीकारण्यासही कोणी उत्सुक नसायचे. अशा वेळी प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली.

हे कुलगुरूपद म्हणजे काटेरी मुकुट होता. पण, सरांनी ते आव्हान स्वीकारले आणि कुलगुरूपदाची तीन वर्षांची कारकीर्द पूर्ण केली. अशी कारकीर्द पूर्ण करणारे ते पहिले कुलगुरू ठरले. नामांतराची आणि विरोधाची चळवळ फोफावत असताना सरांनी ते शिवधनुष्य उचलेले. सर्वप्रथम त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मराठवाडा विद्यापीठास डॉ. आंबेडकरांचे नाव देणे किती योग्य आहे, हे त्यांनी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात जाऊन व्याख्यानाद्वारे नामांतर विरोधकांना पटवून दिले. आणि अखेर त्यांच्याच कारकीर्दीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे विद्यापीठाचे नामांतर झाले. नामांतराचे श्रेय लाटण्यास नंतर अनेक जण सरसावले परंतु, सरांनी तसा दावा कधीही केला नाही.

 

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आणि आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुण्यात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून भोसले सरांनी जाऊ नये, या साठी तत्कालीन बोरुबहाद्दरांनी आपल्या लेखण्या झिजविल्या तर, त्या समारंभास हजर राहून औचित्यभंग करू नये असे आवाहन ज्येष्ठ समाजवादी नेते ना. ग. गोरे आदींनी केले होते. मात्र, कोणत्याही दडपणास बळी न पडता सर कार्यक्रमास हजर राहिले. 

भाषणाच्या सुरुवातीसच ते म्हणाले, “डॉ.हेडगेवार जन्मशताब्दी सोहळ्यास मी हजर राहून औचित्यभंग करू नये, असे मला अनेकांनी सांगितले. वास्तविक पाहता, या समारंभास हजर राहणे हा औचित्यभंग नसून हेच तर औचित्य आहे. मला आज येथे येण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. सरांनी याच भाषणात 'हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व' असे ठणकावून सांगितले आणि त्या वरून बराच काळ वाद सुरू होता. आळंदी येथे विश्व हिंदू संमेलनात बोलतानाही सरांनी असेच ठणकावून सांगितले होते. हिंदू शब्द वगळून मी बोलू शकणार नाही पण, ज्यांना हिंदू शब्द नको आहे, अशांना वगळून बोलू शकेन, असे म्हणून सरांनी समाजवाद्यांची चांगलीच टोपी उडविली होती.

त्यांचा बराचसा प्रवास हा व्याख्यानासाठी होत होता. ते दोन वेळा परदेशात गेले तेही व्याख्यानाच्या निमित्तानेच! सरांच्या वक्तृत्वाची मोहिनी मराठी माणसांवर पडली आहे. पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेखेरीज त्यांनी मुंबईतील आझाद हिंद व्याख्यानमाला, नाशिक येथे बस्तीराम सारडा स्मृती व्याख्यानमाला, बीड येथील आई महोत्सवातही वर्षांनुवर्षे हजेरी लावली होती. सरांची मागे एकदा मी मुलाखत घेतली होती. त्या वेळी ते म्हणाले होते की, पुनर्जन्म असलाच तर, मला पुन्हा प्राध्यापकाचा जन्म आवडेल. नियतीने सरांची ही आंतरिक इच्छा पूर्ण करावी.


सर आज आपल्यात नसले तरी
, त्यांच्या वक्तृत्वाचा, माणुसकीचा, त्यांच्या साधेपणाचा सुगंध वर्षांनुवर्षे मराठी माणसांच्या मनात सदैव दरवळतच राहील, यात मुळीच शंका नाही.

श्रीराम ढवळीकर






No comments:

Post a Comment