आम्ही ग्राउंडवर पोहोचलो आणि झेंडा वंदन आणि राष्ट्रगीत हे कार्यक्रम
प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडले. भल्या मोठ्या ग्राऊंडच्या दुसऱ्या
टोकाला लांबून बँडचे पथक आणि मुली, मुले
वेगवेगळ्या युनिफॉर्ममध्ये अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने उभे दिसत होते.
आमच्या बाजूला तात्पुरते उभारलेले स्टेज होते. त्यावर प्रमुख पाहुणे
स्थानापन्न झाले आणि झेंडावंदन व राष्ट्रगीत झाल्यानंतर पोलिसांचा बँड, पोलीस दल, स्काऊट हे पुढे, आणि विविध शाळांमधून निवड झालेली मुले मुली मागे अशी २६ जानेवारीच्या
परेडची सुरुवात झाली. या परेडमध्ये तिच्या शाळेतून निवड झाल्याने माझी मुलगीही
होती. त्यामुळे आम्ही तिची परेड बघण्यासाठी सुरतच्या पोलीस ग्राउंडवर सकाळी सात
वाजताच पोहोचलो होतो.
ग्राउंडच्या एका बाजूला कडेने पेंडॅाल टाकून आमंत्रितांची सोय केलेली होती.
बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था होती. गेले अनेक दिवस तिची प्रॅक्टिस चालू होती.
तिला परेडमध्ये बघण्यासाठी आमची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. तिच्या शाळेच्या
टीममध्ये आमची नजर तिला शोधत होती. एक सारख्या युनिफॉर्म मुळे आणि वेण्यांमुळे
आम्हाला ती पटकन दिसत नव्हती. शेवटी एकदाची ती दिसली. ऊर अभिमानाने भरून आला. ती
ग्रुप लीडर होती. अतिशय सुंदर व शिस्तबद्ध,आखीव-रेखीव
हालचाली! बँडच्या तालावर विविध सूचना, स्थिर नजर आणि
हातापायांच्या शिस्तबद्ध व डौलदार हालचाली.... ते सगळं वातावरणच भारलेलं होतं.
आता शालेय विद्यार्थ्यांची रांग दृष्टीपथात येऊन पोहोचली होती. आता आम्हाला
आमची लेक डोळे भरून बघता येणार होती. प्रत्येक ग्रुप लीडर प्रमुख पाहुण्यांच्या
स्टेजपाशी किंचित थबकून त्यांना मानवंदना देऊन ती टीम पुढे सरकत होती.
अचानक मला खुर्चीच्या मागील बाजूने कोणीतरी खुर्ची पुढे ढकलते आहे असे
वाटले. सुरुवातीला चुकीने पाय लागला असेल असे समजून मी दुर्लक्ष केले. पण परत लगेच
तोच प्रकार घडू लागला. थोड्या वेळात खुर्ची फारच जोरात हलल्याने मी रागाने मागे
वळून बघितले, तर मागे एक वयस्कर जोडपे शांतपणे
बसले होते. मला फार आश्चर्य वाटले. ही लोकं असं करणं शक्य नाही. चुकून धक्का लागला
असेल. एवढ्यात मला एकदम गरगरल्यासारखे वाटायला लागले. जोरात चक्कर येणार असे
वाटायला लागले. काय होते हे कळेनासे झाले. मी सुहासच्या, माझ्या
नवऱ्याच्या खुर्चीला घट्ट धरले व कसेबसे म्हणाले... मला काहीतरी होतंय.... बहुधा
चक्कर येतेय.... त्यावर तो म्हणाला, अगं... मला पण
तुझ्यासारखंच होतंय.... मी जास्तच घाबरून गेले. दोघांनाही एकाच वेळेस असा त्रास
कसा होऊ शकतो? आपल्या खाण्यात तर काही आले नाही ना? असाही एक विचार तेवढ्यात डोकावून गेला.
आमच्या आजूबाजूला बहुतेकांना असाच त्रास होत असावा. पण प्रत्येक जण स्वतःतच
मग्न असल्यामुळे काय होतंय हे कोणाच्याच लक्षात आलं नसावं. माझे दोन्ही पाय
जमिनीवर ठेवलेले होते. अचानक पायाखालून पाण्याची लाट जावी तशी जमिनीखालून एक जोरात
लाट पुढे सरकलेली जाणवली. मी नखशिखांत घाबरले. काय होतंय हे कळण्याच्या आत परत
दुसरी... तिसरी अशा लाटा येतच राहिल्या. आता बहुधा जमीन दुभंगणार की काय असे मला
वाटत असतानाच, अचानक सगळे स्थिरस्थावर झाले. माझे
गरगरणे हळूहळू थांबले. नजर स्थिर झाली. तेवढ्यात स्टेजवरून अनाउन्समेंट झाली......
सुरतला भूकंपाचा धक्का बसलेला आहे. त्यामुळे यापुढील कार्यक्रम आम्ही रद्द करत
आहोत. प्रेक्षकांनी घाबरून जाऊ नये. आपण सगळे शहराच्या सगळ्यात सुरक्षित ठिकाणी
आहोत. आपण आपापल्या घरी तातडीने निघावे.
झोपेतून उठल्यासारखे लोक भानावर आले. आणि एकच गडबड आणि गोंधळ तिथे सुरू
झाला. सगळ्यांनी पार्किंगकडे धाव घेतली. तेव्हा मोबाईल फोन नुकतेच आले होते.
सगळ्यांकडे मोबाईल फोन नव्हते. त्यामुळे घाबरून प्रत्येकाने घराकडे धाव घेतली.
आम्हीही घाईघाईने घरी निघालो. रस्त्यावर लोकांची प्रचंड गर्दी होती. आजूबाजूच्या
इमारतीमधून सगळी लोकं बाहेर पडून रस्त्यावर आली होती. त्यांच्यात प्रचंड भीती दिसत
होती. काही ठिकाणी इमारतींची किरकोळ पडझड नजरेस पडत होती. त्या भीतीच्या सावटातच
आम्ही आमच्या घराजवळच्या रस्त्यावर पोहोचलो. रस्ता पोलिसांनी बंद केलेला होता.
आम्ही याच रस्त्यावर पुढे राहतो याचा पुरावा आम्हाला पोलिसांना द्यावा लागला.
त्यानंतरच आम्हाला आत जाऊ देण्यात आले.गुजरात मधे भूजजवळ या भूकंपाचे
केंद्रस्थान होते. ६.९ रिक्टर स्केल इतक्या तीव्रतेचा हा भूकंप होता असे नंतर
कळले.
आमच्या इमारतीच्या बाहेर आमचे सगळेच शेजारी उभे असलेले दिसले. आणि पोटात
धस्स झाले. ते ही सगळे इमारत हलायला लागल्यामुळे घाबरून पळत रस्त्यावर येऊन उभे
राहिले होते. आमच्या समोरच्या घरातील काकू ओक्साबोक्शी रडत होत्या. इमारतीच्या
बाहेर पळत आल्यानंतर आमच्या मागच्या बाजूला असणारी अकरा मजली उंच इमारत जोरात आवाज
होऊन त्यांच्या डोळ्यासमोर कोसळत असताना त्यांना दिसली होती. त्याचा प्रचंड मानसिक
धक्का त्यांना बसला होता. शेवटी त्यांना ट्रीटमेंटसाठी डॉक्टरांच्याकडे नेण्याची
वेळ आली होती. आमच्या इमारतीला ही लहान-मोठे तडे गेले होते. पार्किंगमधील खांबांना
मोठमोठे तडे गेले होते. आम्ही सगळा धीर एकवटून घर गाठले. टेबलवरील सामान जमिनीवर
अस्ताव्यस्त पडले होते. टीव्ही कधीही पडू शकेल अशा बेतात शोकेस मध्ये स्थिरावला
होता. माळ्यावरील सामान खाली पडले होते. काही वस्तू फुटल्या होत्या. घराच्या
भिंतींना लहान-मोठे तडे गेले होते. खूप नुकसान झाले नाही हे पाहून आम्हाला हायसे
वाटले. थोड्या वेळाने शाळेतून मुलीला घरी घेऊन आलो. ती पण घाबरलेली होती.
भीतीमुळे कोणीच घरात जायला तयार नव्हते. परत भूकंपाचा धक्का बसला तर काय
होईल या कल्पनेने सगळे लोक हवालदिल झाले होते. पण जसजशा सगळ्यांना भुका लागायला
लागल्या तसे लोक परत घरात जाऊ लागले. आम्ही देवाचे नाव घेऊन घरात गेलो व घाबरतच
अक्षरशः फक्त वरण भात खाल्ला व परत खाली रस्त्यावर जाऊन उभे राहीलो. आमची बिल्डिंग
चारच मजली असल्याने आणि बांधकाम अतिशय चांगले असल्याने आमच्या बिल्डिंगचे फारसे
नुकसान झाले नव्हते. आमच्या इमारतीत सगळ्यात वरच्या मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबातील
एका अतिशय वयस्कर आजारी आजोबांना त्यांच्या पलंगासकट खालच्या गार्डनमध्ये सावलीची
सोय करून पंधरा दिवस ठेवले होते. लोक जेवण-खाण आणि अत्यावश्यक गोष्टींसाठीच घरात
जात होते. सगळ्यांच्या घराची दारं दिवस-रात्र उघडी असायची.
घरात काम करताना मधूनच घर हलल्याचा भास व्हायचा.... आणि आम्ही जिन्यावरून
खाली धावत सुटायचो. रात्री झोपेतही जमीन हलते आहे असे भास व्हायचे. नीट झोप लागत
नव्हती. लोकांनी लिफ्टचा वापर बंद केला होता. कारण भूकंपाचा धक्का बसला तेव्हा जी
लोकं लिफ्ट मध्ये होती ती अनेक तास लिफ्टमध्येच अडकली होती. त्यासाठी फायर
ब्रिगेडची मदत घ्यावी लागली होती. त्यामुळे अनेक मजली इमारतींमध्ये वरच्या
मजल्यावर राहणाऱ्या लोकांना फार त्रास सहन करावा लागला.
आमच्या घराच्या बाल्कनीतून मागच्या बाजूला पडलेली इमारत जवळून बघितली आणि
नकळत डोळ्यातून पाणी वाहू लागले. थोड्या दूरवर दिसणारी ती इमारत इतके दिवस
माणसांनी, लहान मुलांनी गजबजलेली बघितली होती. ती अशी जमीनदोस्त
झालेली बघताना भावना अनावर झाल्या होत्या. काही मजले अर्धवट कोसळले होते.
विटांच्या मातीच्या ढीगात लोकांचे सामान आडवेतिडवे, अस्ताव्यस्त
पडले होते. अजूनही मृतदेह काढण्याचे काम २४ तास चालू होते. त्याचे आवाज आमच्या
घरात ऐकू यायचे. त्याचा खोलवर परिणाम आमच्या मनावर झाला होता. त्या बिल्डिंगच्या
खिडक्यांमधून घरातील सामान, देवाच्या तसबिरी, त्याच्यापुढे लावलेले दिवे यापुढे कधीच दिसणार नव्हते. बाल्कनीत वाळत
घातलेले कपडे कधीच दृष्टीस पडणार नव्हते, मुलांचा, बायकांचा, हाका मारण्याचा आवाज यापुढे कधीच ऐकू
येणार नव्हता. जेसीबी फायर ब्रिगेड आणि अँब्युलन्स यांच्या आवाजांनी आयुष्य
व्यापले होते. रोज मृतांचा आकडा कळायचा.
एक सरदारजी सतत त्या इमारतीजवळ बसलेला दिसायचा. त्याचं संपूर्ण कुटुंब
त्याने गमावलं होतं. त्यादिवशी त्याच्या धंद्याशी संबंधित काही महत्त्वाच्या
कामासाठी तो लवकर घराबाहेर पडल्याने एकटाच वाचला होता. बायका मुलांच्या मृतदेहाची
तो वाट बघत होता. त्याच्या मनस्थितीची कल्पना मला करवत नव्हती.
हळूहळू आमच्या ओळखीत, मैत्रिणींकडून रोज
त्यांच्या परिसरातील बातम्या कळायच्या. ज्या इमारती खूप उंच होत्या तेथे जास्त
नुकसान झाले होते. भूकंप झाला तेव्हा जिने लक्ष्मण झूल्यासारखे झुलत होते. लोकांना
तोल सावरता येत नव्हता. म्हातारी माणसं जी पळू शकत नव्हती किंवा चालू शकत नव्हती
ती घरात अडकून पडली होती. त्यांना वाचवण्यासाठी जी तरुण मंडळी घरात शिरली
त्यांच्यापैकी बरीचशी त्याच वेळेस घर कोसळल्यामुळे प्रियजनांच्या डोळ्यासमोर
ढिगा-याखाली गाडली गेली. अनेक लोकांच्या मनावर या घटनांचे वाईट मानसिक आघात झाले.
त्यानंतर बऱ्याच काळपर्यंत लोकांना त्यासाठी उपचार घेण्याची आवश्यकता भासली. मला
स्वतःला या सगळ्या घटनेनंतर निद्रानाशाचा आजार जडला होता. माझी मनःस्थिती नीट
नसायची. मला सुद्धा यातून बाहेर पडण्यासाठी उपचारांची मदत घ्यावी लागली.
मनात सतत दहशत असल्यामुळे या घटनेनंतर जवळजवळ महिनाभर आम्ही कोणीही नीट
झोपू शकलो नाही. सतत इमारत हलती आहे असेच भास आम्हाला व्हायचे. हळूहळू परिस्थिती
सामान्य झाली. पण आयुष्यातील हा भयानक काळ आम्ही कधीच विसरू शकणार नाही. काळाबरोबर
जखमा बऱ्या होतात पण व्रण मात्र कायमसाठी शिल्लक राहतात. टीव्हीवर शहरांमधल्या आणि
गुजरात मधल्या विविध शहरांमध्ये झालेली मालमत्तेची आणि जीवित हानी बघून मन विषण्ण
झाले होते.
पायाखालची जमीन सरकणे म्हणजे काय असते याचा प्रत्यक्ष अनुभव त्या दिवशी मी
घेतला होता. भूकंपाच्या लाटांचा तो स्पर्श अजूनही आत्ताच झाल्यासारखा मी अनुभवू
शकते, इतका तो माझ्या स्मरणात राहिला आहे. परमेश्वराचे आभार
मानावे तेवढे थोडे आहेत. त्याकाळात माझे संपूर्ण कुटुंब मोकळ्या मैदानावर सुरक्षित
होते.
एक गोष्ट मात्र आयुष्यात लहान वयात शिकले, माणसाने
कधीच कोणताच अहंकार बाळगू नये. तुमचा अहंकार एका क्षणात जमीनदोस्त करण्याची ताकद
निसर्गात आहे. हे प्रत्येकाने कायम लक्षात ठेवावे. जे आज, आत्ता
आहे ते पुढच्या क्षणाला नसूही शकेल आणि असे कधीही आणि कोणाच्याही आयुष्यात घडू
शकते याची जाणीव सतत मनात असावी.
निसर्ग वारंवारआपल्याला सुधारण्यासाठी सूचना देत असतो. त्याची आपण गांभीर्याने
दखल घ्यायला पाहिजे.
माधुरी राव
No comments:
Post a Comment