तेजस्विनी अनंत कुमार
नावाप्रमाणेच तेजस्वी, 'अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा' प्रत्यक्षात उतरवणारे व्यक्तिमत्व. लहानपणी आई-वडिलांकडून मिळालेले सुसंस्कार, इंजिनिअरिंगचे शिक्षण, एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी मध्ये मिळालेला कार्यानुभव, स्वर्गीय अनंत कुमार यांच्या सारख्या तत्वनिष्ठ, कर्तव्यनिष्ठ व कर्तृत्ववान व्यक्तीशी झालेला विवाह, सासू-सासरे यांकडून मिळालेला सामाजिक कार्याचा व अध्यात्मिक वारसा या सर्वांचा सदुपयोग करून व या सर्वांविषयी कृतज्ञ राहून आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटविणारे, अदम्य उत्साही, साधी राहणी व उच्च विचारसरणी याचे मूर्तीमंत प्रतीक म्हणजे तेजस्विनी अनंतकुमार!
अगदी रोजच्या जीवनातील छोट्या छोट्या
गोष्टींमधून, सामान्य माणूस सुद्धा पर्यावरण संतुलनाला, सामाजिक कामाला कसा हातभार
लावू शकतो हे त्यांच्याकडून ऐकून अनेक जणांना काहीतरी सकारात्मक करण्याची प्रेरणा
नक्कीच मिळाली असेल. रोजची दुधाची पिशवी योग्य रीतीने कापून प्लास्टिकचा कमीत कमी
वापर करणे, घरातील कचरा कमी करणे, अशा वरकरणी साध्या वाटणाऱ्या गोष्टींमधून
त्यांनी पर्यावरण पूरक चळवळ निर्माण केली. पर्यावरणासाठी हरित भूमी चळवळी अंतर्गत
शेकडो वृक्षांचे रोपण केले.
इंजीनियरिंग क्षेत्रात भारताचा
अभिमान ठरलेल्या तेजस कॉम्बॅट एअरक्राफ्ट तयार करण्याच्या प्रतिष्ठित व अभिनंदनीय
प्रोजेक्टवर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. तेथे त्यांनी टेस्टिंग,
व्हॅलिडेशन, इन्व्हेस्टीगेशन ग्रुप मध्ये काम केले. यावेळी अंगी बाणलेल्या सखोल व ऍनालिटिकल
माइंडने विचार करणे, सर्व बारीक सारीक मुद्दे विचारात घेऊन उत्तम नियोजन करणे,
योग्य अंमलबजावणी, कार्यात काही अडचणी आल्या तर त्यावर मात करण्यासाठी पर्याय तयार
ठेवणे या सर्व गुणांचा त्यांनी आपल्या आयुष्यात सदुपयोग केला.
घरच्या अडचणीमुळे नोकरी सोडायला
लागली तरी स्वर्गीय अनंत कुमार, दिवंगत सासुबाई व वडील यांच्याकडून आपल्याला
सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळाली अशी कृतज्ञता त्या व्यक्त करतात. त्यांनी
आपल्या सामाजिक कार्याला २० बाय १० फुटाच्या खोलीतून सुरुवात केली.
शाळा सोडलेल्या मुलींसाठी कॉम्प्युटर व शिलाई शिकवणे, सरकारी शाळांतल्या मुलांना अभ्यास व खेळ या
दोन्हीसाठी मदत करणे, अशा कामांना गिरीजा शास्त्री मेमोरियल ट्रस्ट च्या
माध्यमातून सुरुवात केली.
२००३ मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या
सरकारने सुरू केलेल्या सरकारी शाळातील मुलांना मोफत जेवण देण्याच्या उपक्रमात
त्यांनी १०,००० मुलांना जेवण देऊन सहभाग घेतला. आज त्यांची संस्था दोन लाख
मुलांना भारताच्या वेगवेगळ्या राज्यात मोफत जेवण पुरवते. कुठलाही भेदभाव न करता
रोज १५०
लोकांना जेवण दिले जाते. कोविडच्या महामारीत हजारो प्रवासी कामगारांना व कोविड
नियंत्रणासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवकांना त्यांच्या संस्थेतर्फे जेवण पुरविले
गेले. हे जेवण सकस, स्वच्छ व पौष्टिक असावे असा त्यांचा कटाक्ष असतो. यासाठी केवढे
नियोजन, खर्च ,कष्ट, सामाजिक बांधिलकीची भावना, मुलांविषयी कळवळा मनात असायला
पाहिजे याची कल्पना करून नतमस्तक व्हायला होते. हे स्वयंपाक घर कचरामुक्त ठेवणे
स्वयंपाकासाठी हवा दूषित न करणाऱ्या जळणाचा उपयोग करणे स्वयंपाक घरात तांदूळ
धुतलेल्या पाण्याचा हरित भूमि योजने अंतर्गत लावलेल्या वृक्षांसाठी उपयोग करणे
एवढे नियोजन बघून थक्क व्हायला होते.
लोकांनी प्लास्टिक किंवा पेपरच्या
थाळ्या, कप, पेले वापरू नयेत म्हणून त्यांनी काही ठिकाणी प्लेट बँक्स तयार केल्या
आहेत. त्यातून कोणीही या वस्तू मोजून नेऊन, वापरून, स्वच्छ करून परत देऊ शकतात. ही
सेवा मोफत आहे.
एवढे सर्व करत असताना त्यांना
लहानपणापासून आवड असलेल्या भारतीय साहित्य, तत्वज्ञान, इतिहास, वास्तुशास्त्र
यांचा त्या अभ्यास करतात व त्यासाठी प्रवासही करतात. अशा तऱ्हेने भारतीय अन्न,
अक्षर, आरोग्य, प्रकृती, संस्कृती या सर्वांचा समावेश त्यांच्या कार्यात झाला आहे.
त्यांनी आपले दिवंगत पती यांचे
नेतृत्व,
कर्तृत्व व व्यक्तित्व यापासून प्रेरणा घेऊन, श्री अनंत कुमार प्रतिष्ठानची
स्थापना केली आहे. या तर्फे Nation
First Dialog हा ऑनलाईन कार्यक्रम सादर केला जातो. तसेच Anantkumar
National Institute of Leadership and Public Policy याचीही स्थापना
केली आहे. या मागे भारतीय पद्धतीचे नेतृत्व निर्माण व्हावे, लोकांनी देशाच्या
बांधणीचा विचार करावा व त्यामध्ये सहभागी व्हावे असा उद्देश आहे. सध्या त्या
कर्नाटक भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्ष व लेजिस्लेटिव्ह कौन्सिलच्या सदस्य आहेत
व भविष्यात देशाच्या उपयोगी ठरणार असेल तर राजकारणात प्रवेश करण्याचीही त्यांची
तयारी आहे.
एक
स्त्री म्हणून आपल्यात असलेल्या क्षमतांचा पूर्णपणे सदुपयोग करून समाजासाठी काम
करा, आलेल्या संधींचा उपयोग करा, आत्मविश्वास राखा व मोठे ध्येय पुढे ठेवा असे
आवाहन त्यांनी स्त्रियांना केले. जे त्यांनी स्वतःच्या उदाहरणाने दाखवून दिले आहे.
अशा तेजस्विनीला विनम्र अभिवादन.
मुलाखत पहाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
मनोरमा जोशी
No comments:
Post a Comment