तनुश्री दत्तापासून सुरु झालेली ही #me too चळवळ पाहता पाहता इतका जोर पकडेल
याची कोणालाही कल्पना नव्हती. एक एक मोठी नावे समोर येत गेली. Me too असे
म्हणणाऱ्या महिलाही आपापल्या क्षेत्रांत नाव कमावलेल्या होत्या. अनेकांनी या
चळवळीला पाठींबा दर्शवला आणि अक्षय कुमार सारख्या नटांनी साजिद खान सारख्या या
प्रकरणात गुंतलेल्या व्यक्तींबरोबर काम न करण्याचा निर्णय घेतला. एखादी वावटळ
पसरावी, वणवा पसरावा तसे या चळवळीचे झाले. या चळवळीवर मग सोशल मिडिया व अनेक न्यूज
चॅनेलवरही चर्चा सुरु झाल्या. सामान्य लोकांपासून ते तालेवार लोकांपर्यंत
सगळ्यांनीच यावर प्रतिक्रिया दिल्या.
कट्ट्यावर मी हा विषय दिला कारण वाचकांनी या चळवळीबद्दल जाणून घ्यावे असे मला
मनापासून वाटत होते. त्यांनी यावर सखोलपणे विचार करावा असे वाटत होते. काही
प्रमाणात हा हेतू साध्य झाला असे म्हणायला
हरकत नाही. अनेकांनी या संदर्भात मला व्यक्तिश: काही मेसेज पाठवले. "फारच
कठीण विषय आहे ग हा!!!", ही अनेकांची प्रतिक्रिया होती. "काय ग लिहिणार
यावर?" असेही अनेकांनी म्हटले. तर काही जणांनी मला धडाधड त्यांना me too वर
आलेले मेसेज, लेख forward करण्याचा सपाटा लावला. माझ्या अभ्यासाला याची मदत झालीच.
पण शेवटी "तुमची काय प्रतिक्रिया आहे ते लिहून पाठवा. तुमचे काही यावर मत,
विचार आहे का तो पाठवा" असे मला वारंवार काहीजणांना सांगावे लागले. पण एकूणच
स्वतः विचार करण्याची, अनेक बाजू जाणून घेऊन त्यावर अभ्यासपूर्ण विवेचन करण्याची क्षमताच
लोकांनी गमावली आहे किंवा असे करण्यात त्यांना रस नही असे दिसले.
काही जणांनी मात्र यावर अभ्यास करून आपल्या प्रतिक्रिया पाठवल्या. प्रथम त्या
सर्वांचे मनापासून आभार मानते. विद्याताई बाळ यांना मी फोन करून त्या प्रतिक्रिया
देतील का असे विचारले. त्यांनी आनंदाने होकार दिला. त्याच्यासारख्या अधिकारी
व्यक्तिचे मत हे माझ्यासाठीच नव्हे तर या चळवळीच्या दृष्टीनेही महत्वाचे आहे. त्या
म्हणाल्या, की आपण ज्या आदिवासी समाजाला मागासलेले समजतो, त्या समाजात बलात्कार
सहसा होत नाहीत. लग्नाआधी लैंगिक संबंध या समाजात मान्य आहेत. थोडक्यात या भावनेला
नैसर्गिक समजल्याने या गोष्टीवरून शोषण होत नाही.
सारंग घड्याळ पाटील यांनी थोडी मोठी पण खरोखरच या प्रश्नाचा साकल्याने विचार
करून प्रतिक्रिया दिली आहे. प्राची वेलणकर यांनी आता बदललेल्या काळात पुरुषांवर
जवाब देण्याची वेळ आली आहे हे नमूद केले. स्त्रियांचे 'न बोलणे' ही आतापर्यंत
पुरुषांची ढाल होती ती आता तुटली आहे, हे सांगितले. अरुंधती कुलकर्णी यांनी हा प्रश्न हाताळण्यासाठी सामायिक प्रयत्नांची
गरज आहे, आणि यामुळेच समाजमनात बदल होईल हे सांगितले. नितीन ठाकूर या माझ्या मित्राने
अगदी मुलभूत प्रश्नालाच हात घातला. ज्या दिवशी लैंगिकता हा विषय समाजात वर्ज्य
मानला जाणार नाही, जेव्हा या भावनेला एक नैसर्गिक भावना म्हणून स्वीकारले जाईल,
तेव्हाच यातील लपवाछपवी निघून जाईल. अशा गोष्टींशी आपण जोडलेली पापपुण्याची भावना
हे या अत्याचार लपवण्यामागचे सर्वात मोठे कारण आहे असा मुद्दा मांडला. नंदिनी
देवरे ही तिशीतील, नोकरी करणारी मुलगी! ती स्वतः वकील ही आहे. हा प्रश्न फक्त
चित्रपट सृष्टीतच आहे असे अनेकांना वाटते. पण हा प्रश्न काम करणाऱ्या
स्त्रियांच्या रोजच्या जीवनाशी निगडीत आहे हे ती स्पष्टपणे सांगते. कसे वागावे,
कसे बोलावे, कोणते कपडे घालावे, रात्री उशिरा कामासाठी थांबावे लागले तर घरी
जाण्यासाठी सोय करणे या सर्व गोष्टींचा सगळया महिलांना ताण असतो. कॉर्पोरेट
क्षेत्रांतही विशाखा मार्गदर्शक तत्वे किंवा POSH (Prevention of Sexual Harrasment) कायदा लागू करूनही असे प्रसंग घडतात हे संतापजनक आहे.
(प्रतिक्रिया वेगळ्या पानावर छापल्या आहेत. वर थोडक्यात त्यातील मुद्दे मांडले
आहेत).
एकूणच झालेल्या चर्चेत २/३ मुद्दे परत परत मांडले जातात ते असे - एक म्हणजे
यातील स्त्रिया इतक्या उशिरा का पुढे आल्या? दुसरे म्हणजे या स्त्रिया न्यायालयीन
चौकशीला सामोऱ्या जायला तयार आहेत का? आणि तिसरा प्रश्न म्हणजे या चळवळीने काय
साध्य होणार आहे?
#me too चळवळीने स्त्रियांना सामोरे यायचे बळ दिले आहे. आपल्यावर झालेल्या
अन्यायाला वाचा फोडली तरीही समाज फक्त आपल्यालाच दोषी धरणार नाही, याची त्यांना
खात्री आहे. असे सामोरे येणे हे एक दुधारी शस्त्र आहे. ह्या शस्त्राने आपणही घायाळ
होऊ शकतो, आपलीही न्यायालयीन चौकशी होऊ शकते हे त्या जाणतात. तरीही त्या पुढे
आल्या आहेत, येत आहेत, कारण आपले गप्प राहणे हे अत्याचारी पुरुषांचे सर्वात मोठे
संरक्षक कवच आहे हे या बायकांनी जाणले आहे. अत्याचार झाल्यावर समाजाच्या भीतीने
आता महिला गप्प राहणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे.
यातील काही स्त्रियांनी आपले अनुभव कथन केले आहेत. आलोक नाथ हे दारू पिऊन
बेताल वागत असत हे अनेकींनी सांगितले आहे. न्यायालयात विनता नंदा यांना ह्या
माहितीचा उपयोगच होणार आहे. अकबर यांनी ९५ वकिलांची फौज स्वतःपाठी उभी केली आहे असे
म्हणतात. मात्र अशीच प्रतिष्ठित महिला आणि पुरुष वकिलांची फौज या महिलांच्यापाठीही
उभी राहील यात मला शंका नाही.
ह्या चळवळीने काय साध्य होणार, असे जेव्हा कोणी म्हणते, तेव्हा मला ज्योतिबा
फुले, महर्षी कर्वे यांची आठवण होते. स्त्री-शिक्षण, विधवा विवाह या चळवळी त्यांनी
सुरु केल्या तेव्हा कितीजण होते त्यांच्या बरोबर? किती स्त्रिया होत्या त्यांच्या
शाळेत? कोणत्याही चळवळीने काय साध्य होणार याचे उत्तर काळावर सोपवावे. आजच्या घडीला, आपण जर असभ्य वर्तन केले तर ते
आपणाला महागात पडू शकते ही जाणीव पुरुषांना झाली आहे, हेच अत्यंत महत्वाचे आहे.
महिलांना आपल्यावर झालेले लैंगिक अत्याचार बोलल्याने, समाज आपल्याला वाळीत टाकणार
नाही, तर आपल्या वेदनेला समजून घेईल हा दिलासा मिळालेला आहे. माझ्या मते सुसंस्कृत
समाजाच्या दिशेने टाकलेले हे आणखी एक पाऊल आहे.
स्नेहा केतकर
No comments:
Post a Comment