एक जुनी आठवण...
आठवण आहे कॉलेजच्या दिवसातली... आम्हाला एक संगीत नाटक करायचं
होतं. पण,
जुनं वर्षानुवर्षं लोकांनी पाहिलेलं नाटक करायला नको, असंही वाटत होतं. परंपरेशी नातं तर राहावं पण नवं काही try करता येईल का... हा ही विचार डोक्यात होता.
जुनी गाजलेली संगीत नाटकं, हा मराठी सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मूळ कीर्तनांमधून आणि आख्यानांमधून
सुचत आणि वाढत गेलेला story telling चा हा अफाट प्रकार... गद्यातून, संवादातून एखादी गोष्ट सांगता सांगता त्यातले महत्वाचे क्षण पद्यातून, संगीतातून highlight करणारा... सुरांमधून गोष्टीचा परिणाम वाढावा हा याचा मूळ
हेतू. पुढे संगीत रंगभूमीला अतिशय ताकदीचे गायक नट मिळत गेले आणि त्यांनी नाटकातलं
संगीत एका वेगळ्याच उंचीला नेलं. मा. दीनानाथांच्या तडफदार आणि बालगंधर्वांच्या मुलायम
गायकीने तर नाट्यसंगीताची लोकप्रियता इतकी कळसाला पोहोचवली कि लोक आवडत्या गाण्यांना
एकापाठोपाठ एक once more देत राहायचे आणि
या नाटकांचे प्रयोग रात्र रात्र चालायचे. पूर्ण चंद्रासारख्या गंधर्व सुरांनी बहरलेली
कोणतीही रात्र ही रसिकांसाठी कोजागिरीच होती.
या काळात शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीतातल्या अनेक प्रकारांना (टप्पा, ठुमरी, लावणी इ.)
"नाट्यसंगीत" या एका मोठ्या आणि लोकप्रिय brand name
खाली स्थान मिळालं. अशा प्रकारांमधून आधीच तयार असलेल्या स्वररचनांवर नाटकाला अनुकूल
असे शब्द बेतले गेले आणि एक प्रकारे हे संगीत classes पुरतं न राहाता masses पर्यंत, नुसतं पोहोचलंच नाही तर लोकप्रियही झालं. कितीतरी अनवट बांधणीच्या
बंदिशी, चीजा, अत्यंत दर्जेदार लावण्या यांना या नवीन रूपामध्ये रसिकाश्रय
मिळाला आणि हे वेगवेगळे forms काळाच्या ओघात
टिकवले गेले. या सगळ्याची मोहिनी इतकी जबरदस्त होती, कि पुढे पुढे या गीतांचे मूळ
नाटकांच्या गोष्टींशी असलेले नाट्य-संदर्भ पुसट होत गेले आणि संगीताचं पारडं जड होत
गेलं… मग नाट्यसंगीत ही एक शाखाच अस्तित्वात आली. यात झालं असं, कि ते ते नाट्यगीत मूळ ज्या form वर (टप्पा, ठुमरी इ.) बेतलं गेलं होतं, त्या form नुसार त्याच्या सादरीकरणाची पद्धत बनत गेली आणि भावनेच्या आविष्काराकडे
काहीसं दुर्लक्षच होत गेलं.
नंतरच्या काळात पं. जितेंद्र अभिषेकींनी मात्र संपूर्णपणे नवीन
आणि भावानुकूल अशा अप्रतिम चाली बांधल्या. तरीही आजही नाट्यगीतं ही एका
विशिष्ट चाकोरीतच सादर करण्याची पद्धत आहे. शास्त्रीय संगीताशी त्याचं नातं अतूट असल्याने
थोडा रागविस्तार, थोड्या गळ्याची
तयारी दाखवणाऱ्या ताना या त्यात असल्याच पाहिजेत, नाहीतर ते "नाट्यसंगीत"च नाही, असंच काहीसं
गाणारयांना आणि ऐकणाऱयांना वाटतं. असं एखाद्या गोष्टीचं "तंत्र" बनत गेलं, की कलात्मकतेपेक्षा कारागिरीवर अधिक भर दिला जातो. Aesthetically विचार करता प्रत्येक पदाला याच
पठडीत बसवणं योग्य आहे का? किंवा त्याची गरज आहे का? याचं भान राखलं जायला हवं. दुसरा विचार असाही व्हायला हवा की... कुठलाही कलाप्रकार काळाच्या
कसोटीवर टिकण्यासाठी त्यात adaptability, flexibility असायला हवी. नाही तर तो कलाप्रकार साकळत किंवा saturate होत जातो. आणि नुसताच ठेवणीतल्या वस्तूंसारखा राहातो.
असो... तर जी जुनी आठवण सांगता सांगता मी हे सगळं बोलले त्या
आठवणीकडे पुन्हा एकदा वळूया. कारण ती आठवण सुद्धा आहे अशाच मी बांधलेल्या एका नाट्यगीताची.
कोजागिरीची रात्र आणि प्रेमगीतं यांचं नातं हे चंद्र आणि चांदणं यांच्या नात्यासारखंच...
हळुवार... आपसूक उमलणारं...श्री. हिराकांत कलगुटकर यांनी लिहिलेलं "कन्या सासुरासी
जाये" हे नाटक सादर करणार होतो. नाटक मुळात गद्य... सादर करायचं होतं संगीत नाटक...
मग श्री सदानंद डबीर यांनी या मूळच्या गद्य नाटकात चपखल बसणारी आणि अतिशय सुंदर अशी
पदं लिहिली आणि मी कंपोज केली... त्यातलंच हे एक गीत... प्रचलित नाट्यसंगीताच्या बाजापेक्षा
वेगळं... रागसंगीताशी नातं राखूनही एक प्रेमगीत, युगलगीत म्हणून फुलत जाणारं... त्याचंच हे unplugged
version तुमच्यासाठी...
प्रवरा
संदीप
इ-मेल : limayeprawara@gmail.com
No comments:
Post a Comment