मधले पान


ह्या महिन्यापासून कट्ट्यात 'मधले पान' हे द्यावेसे वाटले, कारण अनेक घडामोडी आजूबाजूला घडत असतात, त्यांची दखल घेणे आवश्यक असते. गेल्या महिन्यात कविता महाजन या तरुण लेखिकेचा अकाली मृत्यू झाला. मात्र या दुखःद घटनेवर फुंकर घालणारी बातमीही नुकतीच आली. ती ही साहित्यविश्वातून!!!!

प्रा. अरुणा ढेरे यांची साहित्य संमेलनाची अध्यक्ष म्हणून सर्वसंमतीने निवड झाली आहे. प्रचलित निवडणुक प्रक्रियेमुळे साहित्य संमेलनात अनेक चांगल्या साहित्यिकांना अध्यक्ष होण्यापासून वंचित रहावे लागत होते. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला होता. अनेक नामवंत साहित्यिक या निवडणूक प्रक्रियेत पडावे लागू नये म्हणून या सन्मानापासून चार हात दूरच असायचे. विंदा करंदीकर, इंदिरा संत असे मान्यवर संमेलनाध्यक्ष न झाल्याने खरे तर या संमेलनाचेच नुकसान झाले आहे. पण आता यापुढे असे होणार नाही. अध्यक्षपदी सुयोग्य व्यक्तीला मानाने विराजमान केले जाईल.अरुणा ढेरे यांच्यासारख्या कर्तृत्ववान पण प्रसिद्धी पराङमुख व्यक्तीपासून याची सुरवात व्हावी हा शुभसंकेतच होय.

साहित्य संमेलनाचे हे ९२ वे वर्ष. या संमेलनाची सुरवात १८७८ साली झाली. संमेलनाचा इतिहास शोधताना काही रंजक माहिती कळली. जसे की अरुणा ढेरे ह्या आतापर्यंतच्या फक्त पाचव्या स्त्री अध्यक्ष आहेत. याआधी, कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके आणि विजया राजाध्यक्ष ह्यांनी अध्यक्षपद भूषवले आहे. कवी अनिल उर्फ आ.रा. देशपांडे आणि कुसुमावती देशपांडे या पतीपत्नींनी, दोघांनीही हे अध्यक्षपद भूषवलेले आहे.  हा एक विलक्षण योगायोगच म्हणायला हवा. असो. आता अरुणा ढेरेंसोबत साहित्यातील राजकारण विरहित पर्वाला सुरवात होईल अशी आशा करूया.

या दिवाळीतच 'आणि डॉ.काशिनाथ घाणेकर' हा सिनेमा प्रदर्शित झाला. रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनाच हा सिनेमा म्हणजे मेजवानी ठरली. रंगभूमीकडे प्रेक्षकांना खेचून आणण्यात डॉ.घाणेकरांचा मोठा सहभाग होता. मराठी रंगभूमीच्या इतिहासात ६०,७०, ८० ही दशके महत्वाची आहेत. रंगभूमीचा हा संक्रमण काळ होता असे म्हटले तरी चालेल. या कालखंडातील 'लालन सारंग' हे एक महत्वाचे नाव होते. त्यांचे दुख:द निधन झाल्याचीही बातमी आली. वेगवेगळ्या भूमिका विलक्षण ताकदीने त्यांनी सादर केल्या. मग ती चंपा असो, रथचक्र मधील आई असो किंवा कमलातील सरिता असो. नाट्य परंपरांना छेद देणाऱ्या नाटकांत त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रचंड गाजल्या. 

जाहिरात विश्वातील आद्य गुरु मानल्या गेलेल्या अलेक पदमसी यांचेही नुकतेच निधन झाले. जाहिरातीची ताकद, ब्रँड म्हणजे काय या बाबतीत अनभिज्ञ असलेल्या लोकांना त्यांनी एक नवी दिशा दाखविली. आपला ठसा त्यांनी जाहिरात विश्वावर उमटवला. सर्फ ची ललिताजी आठवतेय ना? आणि लिरिल मधील धबधब्याखाली नाहणारी ती प्रसन्न मुलगी? आणि हमारा बजाज ही टॅग लाईन? त्यांचा इंग्रजी रंगभूमीवरही वावर होता. त्यांनी 'गांधी' सिनेमात मुहम्मद अली जिन्नांचीही भूमिका केली होती. लालन सारंग आणि अलेक पदमसी ही कलाविश्वातील मोठी माणसे गेली याचे दुखः आहेच. पण या दोघांनीही जगाचा निरोप एका सार्थक भावनेने घेतला.

मात्र श्री. अनंतकुमार यांचे अकाली निधन अनेकांना चटका लावून गेले. भाजपातील महत्त्वाचे नेते होते ते. राजकारणात सर्वांशी सामोपचाराने वागणारे म्हणूनच त्यांना संसदीय कार्यमंत्री पद दिले होते. सामान्य कार्यकर्त्यापासून ते उच्चपदापर्यंत पोचलेले नेते होते. ते गेल्यावर 'कर्नाटकाचा दिल्लीतील बुलंद आवाज गेला' असे काँग्रेस व जनता दलातील त्यांचे प्रतिस्पर्धीही म्हणाले. मोदी, अमित शहा, अडवाणींपासून सगळेजण त्यांच्या अंत्यदर्शनाला येऊन गेले. कॉंग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या कर्नाटकात भाजपने पाय रोवले यात श्री. अनंतकुमार यांचा मोठा वाटा होता. त्यांची उणीव भाजपला नक्कीच जाणवेल.
मधल्या पानात सध्यातरी इतकेच.
स्नेहा केतकर

No comments:

Post a Comment