‘रांगोळी’ विषय निघाला आणि मन आजोळी जाऊन पोहोचले. कौलारू घर, मातीची शेणाने सारवलेली जमीन, ओसरी,
माजघर, कोठीची खोली, देवघर, स्वयंपाकघर, आड सगळे
अगदी
एखादया चित्रफिती सारखे डोळ्यासमोर आले. ह्या सगळ्या बरोबर आठवली ती दारासमोरची ठिपक्यांची रांगोळी, देवासमोरची शुभ चिन्ह असलेली रांगोळी,पोतेरं केलेल्या स्वच्छ चुलीसमोरची चंद्र सूर्य, कमळ, स्वस्तिक असलेली रांगोळी आणि ह्याच बरोबर "आजी, असे का
ग" ह्या
प्रश्नांना आजीने न कंटाळता दिलेली उत्तरे.
माझ्या आजोळी सिद्धीविनायक असल्याने घरात सोवळे ओवळे पाळले जायचे आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या अनेक रितीभाती मनाची शिस्त ह्या सदराखाली अमलात आणल्या जायच्या. तीनही ऋतुत पहाटे उठून, आंघोळ करून, दारात, तुळशी समोर सडा रांगोळी, चुलीला, वैल
चुलीला पोतरं करून त्यासमोर रांगोळी, जेवायच्या ताटा भोवती नाजुक वेलबुटटी हे
सगळे
रोजच्या दैनंदिनीचा भाग होते. लहान असताना आजी कसे करते हे मी बघायचे, थोडी मोठी झाल्यावर आजीला हातभार लावू लागले आणि पुढे शिंग फुटल्यावर आपण असे का करतो हे तिच्याकडून जाणून घ्यायला लागले.

दरवाज्या नंतर रांगोळी च्या दृष्टीने लक्ष वेधणारी दुसरी जागा म्हणजे देवघर. माझे आजोळचे घर खूप मोठे आहे त्यामुळे देवघर म्हणजे एक व्यक्ती आरामात बसून पूजा करु शकेल इतपत छोटेखानी खोली. देवघरात शांत तेवणारा नंदादीप. फुले, गंध, उदबत्ती ह्यांचा मंद दरवळ आणि शंख, चक्र, कमळ, स्वास्तिक असलेली रांगोळी. सर्वच मंगलदायी आणि शुभ!
ओटयावर शेगडी समोर रांगोळी ही कल्पना आपल्या शहरवासीयांना खूपच विचित्र वाटेल कारण जागेची आणि वेळेची कमी. माझ्या आजोळी स्वयंपाक घरात चुली समोर चंद्र, सूर्य,कमळ आणि स्वास्तिक रांगोळी असायची. मी आजीला ह्या मागचे कारण विचारले. आजी म्हणाली, "कावेरी, अग चंद्र आणि सूर्य अविनाशी आहेत तसेच ऊर्जेचे स्रोत आहेत. ती ऊर्जा ह्या चुलीवर शिजलेल्या अन्नातून खाणाऱ्यास मिळू दे आणि त्यांचे आरोग्य उत्तम राहू दे ही ह्या मागची भावना. कमळ हे सात्विकतेचे प्रतिक आहे. हे अन्न ग्रहण करणाऱ्याचे मन सात्विक राहो. स्वस्तिक हे स्थिर चित्ताचे चिन्ह आहे. स्वयंपाक करणारीला आणि खाणाऱ्याला ही चिन्हे सतत सकारात्मक विचार करायला प्रवृत्त करतात."

पुढे काही वर्षानी मी बंगलोरला वास्तव्यास आले. समोरच्या प्लॅट मध्ये रहाणाऱ्या तामिळ भाषिक जया शी छान मैत्री झाली. जयाचा दिवस रविवार सकट रोज ५ वाजता सुमधूर कर्नाटकी भक्ती संगीताने सुरु व्हायचा. सकाळी साधारण ६ च्या आधी दारासमोर तांदुळाच्या पिठी ने कोलम रेखाटलेली असायची. माझा प्लॅट अगदी समोरच असल्याने सकाळी दुधाच्या पिशव्या घरात घेताना रांगोळीचे आपसूकच दर्शन व्हायचे आणि मन नकळत प्रसन्न व्हायचे. जयाने पेट्रोकेमिकल मध्ये डॉक्टरेट केले होते आणि एका नामांकित कंपनीत मोठया हुद्यावर नोकरी करत होती.ती दिवसाचे बारा तास घराबाहेर असायची पण एकही दिवस दारातली कोलम चुकली नाही.
एका रविवारी तिच्या घरी फिल्टर कॉफीचा आस्वाद घेताना रांगोळीचा विषय निघाला आणि तिच्या चेहऱ्याच्या बदललेल्या भावावरून माझ्या लक्षात आले की कोलम रेखाटणे ही तिला प्रचंड आवडणारी गोष्ट आहे. म्हणाली,"कावेरी, अग सकाळी रांगोळी काढणे हे माझ्यासाठी मेडीटेशन आहे. It teaches me importance of'now'. कोलम ची डिझाईन, ती रेखाटणाऱ्याला आणि बघणाऱ्याला दोघांच्या मेंदूला खूप soothing effect देतात, मन शांत करतात. तुला सांगू माझ्या होम टाऊनला मुलींना लग्नाच्या आधी सिक्कल कोलम शिकवतात because this kolam pattern tunes your mind in such a way
that any type of problem can easily solved.
मला मनात हसू आले. चार बुकं शिकलेली, खेडयात रहाणारी माझी आजी आणि डॉक्टरेट केलेली बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणारी जया ह्या दोघींच्या विचारात किती हे साम्य. दोन भिन्न प्रांत पण संस्कृती व त्यामागचा विचार मात्र एकच ..
कावेरी
No comments:
Post a Comment