आठवण कविताची



अलिकडेच कविताने एक पोस्ट दिली होती -- "माणसं गेली की, उत्सुकतेने ढीगभर काव्यात्म श्रद्धांजल्या वाहणारे आपण...
जी माणसं हयात आहेत त्यांच्यासाठी कधी, कुठे आणि किती असतो
उत्सुकतेचं भाषिक कवच काढून फेकलं तर आत काय सापडतं? दुटप्पीपणा सापडला तर आपण स्वत:चं काय करतो?"
त्यावर मी लिहिलं होतं, "खरंय -- जिवंत असताना साधी विचारपूस करणंही घडत नसताना, ते गेल्यानंतर उपचारापुरतं त्यांच्या कुटुंबियांना भेटणं हेही तसं निरर्थकच!"
आज तिच्याविषयी लिहिताना हेच मनात ठेवून लिहिण्याची वेळ येईल, हे अर्थात अज्ञातच होतं की! 

इतक्या अचानक आणि अकाली ती इथून निघून जाईल हे मनात तरी कसं यावं? त्यामुळेच बहुधा, तिच्या मृत्युविषयीच्या पोस्ट्स, कविता वाचून वाटायचं की तिला सतत का आकर्षित करतोय तो’? आतून कुठून तरी त्याच्या येण्याची चाहूल तिला लागली होती का? तिच्या पुढ्यात असणार्या लेखन-वाचनाच्या इतक्या योजनांविषयी वाचून वाटायचं की तिच्या जवळच्या व्यक्तीला त्याने तिच्यापासून हिरावून नेल्यामुळेच तिला त्याची आठवण इतकी सातत्याने येत असेल का? तिच्याजवळ शब्दांचं सशक्त माध्यम असताना ती जर त्याच्या विषयी इतकं लिहित असेल तर ते व्यक्त होणं साहजिकच! मनाची अशी समजूत घालून घेत राहिलं तरी आता ती खरंच त्याच्या अधीन झाली हे मान्य करणं जड जातंच.

तिची माझी ओळख झाली तेव्हा मी गौरी देशपांडे, सानिया, मिलिंद बोकील यांच्या लेखनाच्या प्रभावाखाली होते. गौरीचे समजूतदारपुरूष आणि त्यांच्या साथीने स्वतंत्रपणे जगणार्या स्त्रिया... सानिया बोकीलांच्या पुरूषांच्या साथीसह वा साथीशिवाय जगणार्या स्त्रिया... हे सगळं पुस्तकातलं आहे, प्रत्यक्षातलं नाही हे समजत होतं.  

कविता आधी ब्रआणि भिन्नमधून भेटली. ती तिच्या खर्याखुर्या अनुभवांतून लिहित होती. म्हणजे ती स्वत:विषयीच लिहित होती असं नक्कीच नव्हतं. पण, नंतर आमच्या प्रत्यक्ष भेटींत भेटली ती मात्र थेटच! 
एकटी, स्वत:च्या हिकमतीवर पूर्ण विश्वास ठेवून समर्थपणे आयुष्य पेलणारी अशीच -- कथा-कादंबरीत जगणार्या नायिकांच्या जराही जवळपास नसणारं तिचं खरंखुरं जगणं-वागणं जवळून बघत असताना माझ्यासारख्या अति-सुरक्षित कोषात वाढलेल्या-जगणाऱ्याची दृष्टी कायम विस्फारलेलीच रहात असेल तर त्यात नवल करण्यासारखं काहीच नाही ना! 

दादर-माटुंगा कल्चरल सेंटरतर्फे दोन दिवसांचं महिला साहित्य संमेलन भरवण्यात आलं होतं. त्यात तिला बोलताना ऐकली. तसंच संध्याकाळच्या एका परिसंवादाच्या वेळी समन्वयक बाई, त्या वेळच्या पाहुण्यांना बोलण्याची संधी देता स्वत: बोलत राहिल्या तेव्हा त्यांना थांबवण्याचं अवघड कामही तिनेच केलं. नंतर सगळ्यांनी तिला साथ दिली, पण पहिला आवाज तिनेच चढवला. त्यावेळची एक गंमत --- कार्यक्रमाच्या मधल्या वेळात तिला भेटायला म्हणून आम्ही मैत्रीणी मागच्या ऑफिसमधल्या खोलीत गेलो. तेव्हा तिथे सानिया, आशा बगे, संपदा जोगळेकर-कुलकर्णी, स्मिता तळवलकर अशा इतर मान्यवरही होत्या. 
कविताशी त्यावेळी कामाचं बोलायचं म्ह्णून मी तिच्या शेजारच्या खुर्चीवर बसले होते. त्याच सुमारास ह्या संमेलनाचे संयोजक सुरेश खरे आत आले. त्यांच्याशी बोलताना काहीतरी हास्य-विनोद झाला आणि कविता मोठ्याने बोलून इतकी खळखळून हसली, की ती लागण तिथे असलेल्या आम्हां सर्वांनाच होऊन सगळ्याजणी हसत सुटलो. ते बघून सुरेश खरे इतके आश्चर्यचकीत झाले, म्हणाले, `इतक्या स्त्रिया एकाचवेळी इतक्या मोकळेपणाने हसताहेत.. मला आधी फोटो घेऊ देत.' असं म्हणत त्यांनी घाईघाईने बाहेर जाऊन फोटोग्राफरला पकडून आणलं आणि फोटो क्लिक करायला लावले. हसणं हवेत विरून गेलं पण हसरे चेहरे तर टिपले गेले! त्यावेळी स्मार्ट फोन नव्हते नाहीतर इतक्या जणींचा तो हास्य-धबधबा आवाजासहित कायमचा टिकून राहिला असता.

सुरूवातीच्या नवलाईच्या ओळखीनंतर मात्र फोनवरच्या तिच्या बोलण्यातून, मेघना पेठेंशी झालेल्या प्रकट मुलाखतीतून ती जास्त समजत गेली. तिच्या विचारांशी, म्हणण्याशी प्रामाणिक राहून ती जगत होती हे जाणवत होतं, त्यात नसत्या आविर्भावाचा लवलेशही नव्हता.
फेसबुकवर आल्यानंतर ती भेटत राहिली तिच्या पोस्ट्स मधून, ज्या आश्वासक असत तशाच आधारादायीही असत. आपल्याच मनात निर्माण होत राहणारे गुंतेही सोडवत तर कधी नवीच नजर देत. तिची अधिकाधिक ओळख होत राहिली ती इथूनच!

कुहूच्या वेळची त्यात असणारी तिची शारीरिक, मानसिक, आर्थिक गुंतवणूक आणि स्वीकारलेली जोखीम अफाट होती. तसंच प्रकाशनानंतर तिच्या पेंटिंग्जच्या प्रदर्शनांच्या प्रकल्पाविषयीचे आराखडेही उत्तम होते. त्यामानाने पुस्तकाला मिळालेला प्रतिसाद अपुरा होता. त्याने तिच्या आर्थिक स्थैर्यावर आणि तब्बेतीवरही बराच ताण आला. पण अशा गोष्टींनी खचून जाण्यातली ती होती थोडीच? ते सगळं बाजूला सारून तिच्या अनेक लेखन प्रकल्पांविषयी आणि मी त्यात सहभागी होऊ शकते का याविषयी एकदा ती सविस्तर बोलली. परंतु, मी माझ्याच व्यापांत इतकी अडकलेली होते की मला तिच्यासोबत असणं अशक्य होतं. 
अधून-मधून फोन झाला की म्हणायची, ‘चित्रा, तूच आता गाडी चालवायला शिक आणि ये निघून! कशाला ड्रायव्हरवर अवलंबून रहायचं? मनात येईल तेव्हा आपल्याला भेटता येईल.

हे लिहिताना सारखं मनात येतंय की आपल्याला हे इथे का द्यावंसं वाटतंय? तिची-आपली मैत्री आपण फक्त आपल्याच मनात का ठेवत नाही आहोत? जाहीर प्रदर्शन करतोय का आपण? ती म्हणाली तसं, ती जिवंत असताना तिच्यासाठी आपण आपल्याला कितीसं देऊ केलं होतं? ती हे वाचेल तर काय म्हणेल

एक मन फार हळहळतं तर दुसरं म्हणतं, कविता खळखळून हसेल आणि म्हणेल, ‘जाऊ दे ! इतका विचार नको करूस. तुझ्या मनाशी प्रामाणिक आहेस ना, इतकं बघ नि दे सोडून!’ 

मी दुसर्या मनाचं ऐकायचं ठरवलंय---

- चित्रा राजेन्द्र जोशी

No comments:

Post a Comment