मधले पान


या वर्षीचा शेवटचा महिना काही छान बातम्या घेऊन आला. अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. आजवर भारतीय भाषांमधीलच साहित्यिकांना ज्ञानपीठ दिले जात होते. तीन वर्षांपूर्वी ज्ञानपीठसाठी भारतीय इंग्रजी साहित्याचाही समावेश होऊ लागला आणि यंदा इंग्रजी कादंबरीकार अमिताव घोष यांना तो जाहीर झाला आहे. आता अनेक भारतीय लेखकही इंग्रजी भाषेत लेखन करतात. बदलत्या काळानुसार केलेला बदल योग्यच आहे. अमिताव घोष यांचे साहित्य विपुल आहे. ऑक्सफर्डमध्ये सामाजिक मानववंशशास्त्रात डॉक्टरेट मिळवलेल्या घोष यांना इतिहासाचे आणि त्या अनुषंगाने बदलत्या संस्कृतीविषयी कुतूहल असणे स्वाभाविकच आहे. त्यांच्या साहित्यातून त्यांची कलकत्ता शहराशी जुळलेली नाळ सतत जाणवते.

"Imam and the Indian" या त्यांच्या निबंधसंग्रहात इंदिरा गांधींच्या हत्येच्या दिवसावर एक लेख आहे. त्यादिवशी ते दिल्लीत होते. शीख समाजाच्या ध्यानी-मनी नसताना कसे त्यांचे आयुष्य धोक्यात आले याचा 'आंखो देखा हाल' या लेखात आहे. आज ह्या लेखाची आठवण येण्याचे कारण म्हणजे ३४ वर्षांनंतर का होईना, पण या हत्याकांडाच्या सूत्रधारांना शिक्षा झाली आहे. सज्जनकुमारांना झालेल्या जन्मठेपेच्या शिक्षेमुळे शीख समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. अनेकांनी यासाठी मोठी न्यायालयीन लढाई लढली आहे. अर्थात या शिक्षेला ' justice delayed justice denied' असे म्हणायचे, की 'देर आए दुरुस्त आए' असे म्हणायचे हे ज्याने त्याने ठरवावे.

पुढील वर्षाच्या सुरुवातीला येणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांआधीच्या शेवटच्या राज्यांच्या निवडणुका डिसेंबरमध्ये पार पडल्या.  अतिशय गैरलागू विषयांना महत्व देत, आर्थिक विकास, बेरोजगारी, स्वच्छता अश्या महत्त्वाच्या मुद्यांना सोयीस्करपणे बाजूला ठेवत, सर्वच
पक्षांनी प्रचाराची धूम उठवली. लागलेले निकाल आमच्याच बाजूचे, असे म्हणत विरोधी पक्ष आता परत एकत्र यायच्या गोष्टी करत आहेत, तर राज्य आणि केंद्र या वेगवेगळ्या गोष्टी आहेत असे म्हणत सरकारी पक्ष जनमताकडे वेगळा कौल मिळेल या आशेवर आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर श्री. उर्जित पटेल यांचा राजीनामाही सगळ्यांनाच धक्का देऊन गेला. हा मुद्दाही सरकारला निवडणुकीत अडचणीत आणणारा ठरू शकतो. सुप्रीम कोर्टाच्या राफाएल वरील निर्णयाने मात्र भाजपला खूपच दिलासा मिळाला असणार.

पी.व्ही. सिंधूने BWF world बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद मिळविले ही खूपच आनंदाची घटना! विजेतेपदाच्या जवळ जाऊन हरणे असे तिच्या बाबतीत दोन-तीनदा घडले. पण ह्यावेळी मात्र तिने हा शिरस्ता मोडला. तिचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. सायना नेहवाल आणि परुपल्ली कश्यप यांचाही विवाह संपन्न झाला. हा लव्ह गेम सगळ्याच जणांना पसंत पडला. हे ह्या वर्षीचे बेस्ट लग्न आहे असे मलाही वाटते. भपकेबाज लग्न सोहळ्यांच्या पार्श्वभूमीवर हा साधा सोहळा अनेकांना भावला असणार. ह्या खेळाडू जोडप्याला चाहत्यांनीही भरभरून शुभेच्छा दिल्या.

गेल्या काही आठवड्यात भारतीय प्रसारमाध्यमांना तीन सेलेब्रीटी लग्नांनी गुंतवून ठेवून काम पुरवले. आधी दीपिका-रणवीर, मग प्रियांका-जोनास आणि मग इशा अंबानी-आदित्य. तीनही
लग्नांनी, भारतात गरिबी असेल, पण श्रीमंतही काही कमी नाहीत हे सिद्ध केले. यावरून इतका थाटमाट असावा का? किंवा त्यांच्या या अत्यंत खाजगी कार्यक्रमांमध्ये इतरांनी दखल द्यावी का, असा मतमतांतराचा गलबलाट उडाला. एकूणच  प्रसारमाध्यमांना हवेहवेसे वाटणारे खाद्य या लग्नांनी जरूर पुरवले.



बेंगळूरूमधला  डिसेंबर  महिना म्हणजे भुईमुगाच्या शेंगाप्रेमींसाठी ‘कडलेकाई परीशे’ची पर्वणी. रस्ताभर वेगवेगळ्या आकारांच्या, चवीच्या, रंगांच्या शेंगांचे ढीग बघत फिरणे ही एक  गंमत असते. अर्थात महिन्याला "पाउण किलो दाणे"च्या या जमान्यात या जत्रेत हौशे आणि नवशेच जास्त असतात. तरीही बेंगळूरूमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाने नक्कीच भेट द्यावी असा हा बेंगळूरूचा सांस्कृतिक वारसा.


कडलेकाई परीशेपाठोपाठ चित्रसंथेची चाहूल लागते. ही जत्रा आता बेंगळूरूच्या “must see” अश्या eventमध्ये गणली जाते. रस्ताभर असंख्य चित्रं, त्याबरोबर रसिकांच्या दादेची प्रतीक्षा करणारे, पुणे, कोल्हापूर, भुवनेश्वर, चेन्नई, त्रिवेंद्रम – असे लांबच्या शहरातूनसुद्धा आलेले सर्व वयोगटातले चित्रकार, प्रचंड गर्दी, घासाघीस करणारे ‘रसिक’ ; फारच आरामात असणारे ड्युटीवरचे पोलीस. चुकवू नये असं काही या सदरात मोडणारी ही चित्रांची जत्रा. पाहिली नसेल तर जरूर वेळ काढा.

वर्षाखेर असल्याने सर्वच वृत्त माध्यमांत गेलेले वर्ष कसे होते याबद्दल चर्वितचर्वण चालू आहे. पावसाळ्यात उगवणाऱ्या भूछत्र्यांप्रमाणे दरवर्षी येणारे हे लेख नक्की किती जण वाचतात ही शंकाच आहे – पण रद्दीवाल्यांची यात चांदी होते यात शंका नाही. अर्थात गेली काही वर्षं, बिग डाटा विश्लेषणामधून जास्त उपयोगी निष्कर्ष काढले जात आहेत. या तंत्रज्ञानाचा हा एक लोकाभिमुखी उपयोग.

मुंबई येथील मरीन ड्राईव्ह येथे बांधलेल्या कट्ट्याला १०३ वर्षे झाली. हा आपल्याला कदाचित आद्य कट्टा म्हणता येईल. समुद्राचे पाणी जमिनीवर येऊ नये म्हणून १०३ वर्षांपूर्वी इथे कट्टा बांधायला सुरवात झाली. १८ डिसेंबर १९१५ साली इथे बांधकामाला सुरवात झाली. सर्व मुंबईकरांचाच नव्हे तर मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला हा कट्टा आवडत असणार यात शंका नाही. गप्पा मारायलासूर्यास्त पहायलासकाळी चालायला आणि संध्याकाळी ह्या कट्ट्यावर भणाण वारा प्यायला सगळ्यांनाच आवडते. भर पावसाळ्यात इथून पाऊस अंगावर घेत चालण्याची मजा काही औरच !!!या वर्षीही ३१ डिसेंबरला इथे मावळत्या दिनकराला वर्ष अखेराचा निरोप द्यायला मुंबईकर जमतीलच. २०१८ च्या आठवणी जागवायला आणि येणाऱ्या वर्षाचे मनोमन स्वागत करायला!!!!!



स्नेहा केतकर 


No comments:

Post a Comment