एक बोधकथा

कुठल्याही काळातली ही गोष्ट आहे असं सहज म्हणता येईल. एका गावात रेल्वेनं एक मोठा, आधुनिक बऱ्याच सोयींनी युक्त असा प्लॅटफॉर्म/फलाट बांधला. खरं तर गावातील सर्वांचीच विशेषत: लहान मुलं, महिला, वृद्ध यांची रेल्वेत चढण्या-उतरण्याची, थांबण्याची अतिशय चांगली सोय यामुळे होणार होती. लोकांनी फलाट वापरायलाही सुरुवात केली. थोडय़ाच काळात गावातल्या एका धनगराला मालगाडीत शेळ्या मेंढ्या चढवण्या-उतरवण्यासाठी हीहा फलाट उत्तम आहे असे लक्षात आले आणि त्याने आपले प्राणी ठेवण्यासाठी आणि चढवण्या-उतरवण्यासाठी त्याचा वापर सुरु केला. शेळ्या मेंढ्यांच्या मागे कोंबड्या, गायी, म्हशी यायलाही वेळ लागला नाही. अर्थातच प्लॅटफॉर्म खराब व्हायला सुरुवात झाली. त्यातच एकाने मला महिन्याभरापूर्वी ढुशी दिलेली गाय तुझीच होती म्हणून दुसर्यांशी जुने भांडण उकरून काढले. पुरावा नव्हताच त्यामुळे कोर्ट कचेर्यांना सुरवात झाली. संध्याकाळी गप्पा मारताना चघळायला सगळ्यांना आता चांगलाच विषय मिळाला. ही संधी साधून अजूनही बऱ्याच जणांनी आपल्या जुन्या रागाला /वादाला रस्ता देत प्लॅटफॉर्मवरची भांडणं उकरून काढली. एकंदरीत वातावरण तापू लागले.

त्यातच एकाने वर्तमानपत्रात लेख लिहीला की या सगळ्या बिघडलेल्या वातावरणाचे मूळ कारण हा नवीन प्लॅटफॉर्म आहे, त्याची खरंच गरज होती का? मग काय वेगवेगळ्या चॅनल्सवरमासिकातून, वर्तमानपत्रातून हा प्लॅटफॉर्म योग्य की अयोग्य, चांगला की वाईट यावर चर्चेची गुऱ्हाळं आणि मतांचे प्रवाह सुरू झाले. थोड्याच काळात सर्वसामान्य लोक इतके कंटाळले की काही जणांना नको तो प्लॅटफॉर्म आपली जुनी गैरसोयच बरी होती असे वाटू लागले. उद्या प्लॅटफॉर्मवर असताना प्राण्यांच्या विष्ठेमुळे घसरून पडून माझी हाडं fracture झाली तर असेही प्रश्न अनेकांना पडू लागले.

गरज असतांना प्लॅटफॉर्म वापरायचा आणि नंतर त्याला नावे ठेवायची ही फॅशन झाली आहे असे तर खूपच जणांचे ठाम मत होऊ लागले.

मुळात प्लॅटफॉर्म बांधला होता कशासाठीत्यामुळे मदत किती लोकांना होत आहे आणि त्याचा गैरवापर करणाऱ्यांचे प्रमाण किती यांचे योग्य गणित मांडण्याची तसदी कोणीही घेतली नाही.  गैरवापर करणाऱ्या चार लोकांना शिक्षा केली किंवा चक्क दुर्लक्ष केले तर सर्वांनाच त्याचा लाभ मिळू शकेल या कुठल्याही अंगाने विचार केल्यामुळे थोड्याच दिवसात तो प्लॅटफॉर्म गावातली एक समृद्ध अडगळ बनला.

टीप -  या कथेचे # me too movement शी साधर्म्य आढळल्यास तो योगायोग समजू नये.

गंधाली सेवक

No comments:

Post a Comment