तिळगुळ आणि मैत्री – मीनल टोणगांवकर, बंगळुरू


जानेवारी महिना लागला! कॅलेंडर चे आणखीन एक पान उलटले आणि २०१९ साल उजाडले!  नव्या वर्षाची सुरुवात नव्या जोमाने करायची म्हणजे सर्वात आधी तिळगुळ करायचा! सर्व सामानाची जमवा जमव करून तिळगुळ करायला घेतला आणि मन एकदम भूतकाळात गेले. मुलं लहान होती ना; तेव्हा खंडीने तिळगुळ करावा लागायचा. मुलांना साखरेच्या पाकातल्या खुसखुशीत वड्या ही आवडायच्या आणि गुळाच्या पाकातली खुटखुटीत चिक्कीसुद्धा! आम्ही सर्व आणि आमचा मित्रपरिवार  या सगळ्यांना पुरेल एवढा तिळगुळ करणे म्हणजे एक दिव्यच होते.

आमचे हे चिंटू पिंटू आता मोठे झाले. इंडिपेंडंट; स्वतःची ठाम मते असणारे; आयुष्याची वाटचाल एका निश्चित दिशेने करायला लागले!  ही माझी मुले म्हणजे माझे मित्र. अगदी सख्खे मित्रच. अगदी कोणत्याही विषयावर चर्चा, वादविवाद करायला लागले.  कधी लाड करून घ्यायला, हट्ट पुरवून घ्यायला दोन्ही लाडोबा अगदी छोटी बाळं होतात पण पुढच्या क्षणी मित्राच्या भूमिकेत शिरून आमच्या पाठीशी ठामपणे उभी राहतात.

कथा कादंबऱ्यातून वाचले होते, चर्चांमधून ऐकले होते की आई बापाच्या चपला मुलांना यायला लागल्या की मुलांना आपले मित्रच बनवावं. पण नुसतेच ऐकणे किवा वाचणे वेगळे पण प्रत्यक्षात अनुभवणे हे स्वर्ग सुखासारखेच!  माझ्या अनेक मित्रमैत्रिणींमध्ये ही दोस्त मंडळी एकदम स्पेशल आहेत!

जितकी मुलं माझी स्पेशल; तितकाच जवळचा आणि माझा जिवाभावाचा मित्र म्हणजे माझा परमप्रिय नवरा! जेव्हा लग्न झाले तेव्हा आम्ही फक्त एकमेकांचे नवरा बायको होतो. पण हळूहळू अगदी नकळत पणे आम्ही एकमेकांचे मित्र कधी झालो ते कळलंच नाही.

जे प्रश्न, वाद, आम्हाला नवरा बायको म्हणून सोडवायला कठीण गेलं, किंवा सोडवता आले नाहीत तेच आम्ही मित्र मैत्रीण बनून अगदी चुटकी सारखे सोडवले. आमच्या नात्यात एक प्रचंड मोकळेपणासमंजसपणाआणि प्रचंड विश्वास आहे. आणि याच्याच पायावर आमचे घर भक्कमपणे उभे आहे.

मित्र मैत्रिणी ही आपल्या आयुष्याची अत्यंत महत्त्वाची support system असते. मला असे वाटते की या आपल्या मैत्रीचा कक्षा आपण थोड्या रुंदावल्या आणि आपल्या दीर/जाऊ, भाऊ/भावजय यांच्यापर्यंत नेल्या तर? या नात्यांनाही मैत्रीचा भक्कम पाया मिळेल आणि ती एका वेगळ्याच लेव्हल वर जाऊन पोहोचतील. अगदी खऱ्या अर्थाने तिळगुळाची गोडी, स्नेह, खमंग चव, आपल्या सगळ्यांच्या घरात पोहोचल्या शिवाय राहणार नाही...

तिळगुळ घ्या गोड गोड बोला!

मीनल टोणगांवकर, बेंगळूरू

No comments:

Post a Comment