राजहंस प्रकाशनाचे हृषीकेश गुप्त्यांचे “दंशकाल” हे पुस्तक
चांगलेच जाडजूड. ह्या पुस्तकाचे वेगळेपण मला सर्वप्रथम त्याच्या अर्पण पत्रिकेत
जाणवले. आपण बघतो की अर्पण पत्रिका ही प्रिय व्यक्तींना अर्पण केलेली असते. आई/वडिल,
भाऊ/बहीण, पती/पत्नी, मुले, प्रिय मित्र,आदरणीय गुरू वगैरे .....पण ह्या पुस्तकाची
अर्पण पत्रिका ही चक्क पितृपंधरवड्यातल्या
पंधरा दिवसांना आहे. त्यावरून आणि अर्थातच नावावरून आपल्याला या पुस्तकाच्या गुढतेबद्दल
सुगावा लागतो आणि उत्सुकता चाळवली जाते. पुस्तकाचे मुख्पृष्ठही बरेच बोलके.एकूणच
काय,पुस्तक उचलुन चाळायचा मोह काही आवरत
नाही.
ही कादंबरी वरकोकणातल्या रायगड जिल्ह्यातल्या भूगांव या
गावाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली.कोकणातील लोकांना तसेही भूताखेतांचे भय फार! मोठाल्या
बागांमधील ती घरे आणि त्या खोल खोल विहिरी ..
ही कादंबरी ही देशमुख घराण्याच्या गावावरच्या पारंपारिक वर्चस्वाला,
बदलत्या परिस्थितीमुळे, लागू पाहणाऱ्या धक्क्याची कहाणी आहे. सगळ्यात मोठा भाऊ
कर्तबगार पण त्यांची बायको, लग्नानंतर खूप
उशिरा आलेल्या बाळंतपणानंतर अकाली मेनॉपॉजल
झाली आहे. सगळ्यात धाकटा समलिंगी आहे आणि “मला लग्न करायचे नाही" या वाक्यामागे लपतो
आहे. मधला भाऊ भानुकाका, उच्चशिक्षित, त्याची बायको सुंदर, निरोगी. पण भानुकाका
लैंगिक संबंधातला इंटरेस्ट हरवून बसला आहे आणि त्या मानसिक दबावाखाली आहे. त्याचा
उद्रेक म्हणून हा मुंबईत नोकरी करणारा, भरपूर पगार असणारा भाऊ दादुमिया आणि
भिवलीबाई नावाच्या भुतांनी ‘पछाडला’ जातो.
ह्या सर्व गोष्टींचा घरातल्या व्यक्तींवर होणारा परिणाम,
विषेशतः घरातील एकुलत्या एक मुलावर जो परिणाम होतो तो फारच परिणामकारकरितीने वर्णन
केला आहे. त्याची घालमेल, मनातील गोंधळ, याचं सुरेख, ओघवत्या भाषेतील चित्रण यात
आहे. हा अंमल उतरवण्यासाठी घरच्यांनी अगदी भानामती पासून ते डॉक्टरांपर्यंत
घेतलेली मदत, आणि फारसा उपयोग होत नाही म्हंटल्यावर हताश पणे टेकलेले हात! अगदी भानुकाकाची बायको ही घरच्या पुरुषांच्या
तावडीतून सुटत नाही. तिच्याकडे केवळ एक मादी म्हणून जेव्हा बघितले जाते तेव्हा
आपल्याला अगदी सात्विक संताप येतो.
बदलत्या परिस्थितीमुळे देसाई कुटुंबाची गावावरची सत्ता डळमळीत
होते आहे. त्यामुळे – एक भाऊ मानसिक दबावाखाली ‘भूताचं’ झाड झाला – ह्याबद्दल
काळजी करण्याऐवजी घरातले संधिसाधू त्याचा गैरफायदा घेत गावावरची सत्ता बळकट
करण्यासाठी वापर करतात! या सगळ्यात घरातले इतर काहीसुद्धा मानसिकदृष्ट्या लुबाडले
जातात आणि त्याची कोणी पर्वाही करत नाहीत. अगदी सख्ख्या आईने,बहिणीने आणि तिच्या
नवऱ्याने त्याचा बुवा करून जनतेला सर्रासपणे लुटणे, बायकांचा गैरफायदा घेणे चालू
होते. ही कादंबरी या मानसिक, आर्थिक,
हव्यासापायी सगळे नीती नियम, मूल्य धाब्यावर बसवत घातलेल्या मोकाटपणाचं विदारक
दर्शन आहे. बऱ्याच ठिकाणी वाचकाला अस्वस्थ करून सोडते – यातच लेखकाचे यश आहे.
पुस्तक पहिल्या पानापासून अगदी पकड घेते. suspense उत्कंठापूर्वक
जपलेला आहे. अगदी आपल्या अंगावर काटा येतो,धडधड वाढते . पण मग थोड्यावेळाने असे
वाटते की तेच तेच चालू आहे. घरातील व्यक्तींचे एकामागून एक संशयास्पद मृत्यू होतात
,अगदी गुरेढोरे ही मरतात, काही जण विहिरीत जीव देतात. वाताहात होते अगदी! घरातल्या मुलावर या सगळ्याचा खूपच खोलवर परिणाम
होतो, प्रचंड मानसिक तणाव आणि म्हणूनच की काय मानसशास्त्रज्ञ होतो, मुंबईला
स्थायिक होतो. घराशी, घरातल्यांशी पूर्णपणे नाळ तोडून टाकतो. सर्वांपासून अलिप्त
राहून काही कोडी सोडवायचा अयशस्वी प्रयत्न करतो. पण परिस्थितीच अशी येते की त्याला
आपल्या गावी,घरी परत यावेच लागते, आणि नुसते तेवढेच नाही तर घरच्यांची जवाबदारीही
घ्यावी लागते.
एकूणच या पुस्तकात माणसे,त्यांच्या भावनिक गरजा,एकमेकांशी
असणारे आणि परिस्थिती नुसार बदलणारे संबंध, सासू सून नात्यातला तणाव,
गावकऱ्यानकडून मिळणारा मान आणि नंतर वाट्याला आलेली छी थू, या सर्वांचा सुरेख आलेख
घेतला गेला आहे. पण हे सर्व थोडे आटोपते घेतले असते तर पुस्तकातला वाचकांचा
इंटरेस्ट अगदी शेवटपर्यंत टिकून राहिला असता. हे जरी सर्व असले तरी पुस्तक एकदा
नक्कीच वाचण्यासारखे आहे हे मात्र अगदी वादातीत.
मीनल टोणगांवकर
No comments:
Post a Comment